Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड घडवून अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांचे समर्थक आमदार सरकारमध्ये सामील झाले. आता अजितदादा उपमु्ख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहत आहेत. त्यानंतर आता भाजप नेत्यांनी शरद पवार (Sharad Pawar) लवकरच भाजपसोबत येतील अशी वक्तव्ये करणे सुरू केले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी 2024 च्या निवडणुकीआधी शरद पवार भाजपबरोबर येतील, असा दावा केला होता. त्यांच्या याच दाव्यावर आज प्रसारमाध्यमांनी शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारली. त्यावर पवार मात्र काहीसे संतापल्याचे दिसून आले.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2024 च्या निवडणुकीआधी शरद पवार भाजपबरोबर येतील असे वक्तव्य केले होते, त्यावर ‘काहीही प्रश्न विचारता, तुम्ही अक्कल तरी वापरा’, असे उद्गार शरद पवार यांनी काढले. या प्रश्नावर ते काहीसे संतापल्याचेही दिसून आले.
‘अजित पवार आमचेच नेते, वेगळा निर्णय घेतला म्हणजे फूट नाही’; शरद पवारांच्या वक्तव्याने खळबळ!
अजित पवार आमचे नेते आहेतच त्यात काही शंकाच नाही. फूट पडणे याचा अर्थ पक्षात फूट कधी होते? जर पक्षातच एक मोठा वर्ग देशपातळीवर वेगळा झाला तर. पण, आज येथे तशी स्थिती नाही. काही लोकांनी पक्ष सोडला, वेगळी भूमिका घेतली त्यामुळे पक्षात फूट पडली असं म्हणण्याचं काहीच कारण नाही. त्यांचा निर्णय त्यांनी घेतला, आहे असे पवार यांनी स्पष्ट केले.
इंडिया टुडे सी व्होटरच्या सर्वेनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीला लोकसभेच्या सर्वाधिक जाग मिळणार आहे. केंद्रात मात्र मोदी सरकारच येईल असा सर्वे आला आहे, असे त्यांना विचारण्यात आले. त्यावर मला याबाबत काही माहिती नाही. किती लोकांना त्यांनी विचारून हा सर्वे केला हे देखील मला माहिती नाही. पण, आम्ही जी माहिती विविध संस्थांकडून घेत आहोत त्यातून असं दिसत आहे की महाविकास आघाडीला जास्त जागा मिळतील, असे शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.