मुंबई : राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका (Mid-Term Elections) लागतील, असा अंदाज विरोधी पक्षातल्या नेत्यांकडून गेल्या काही दिवसांत सातत्यानं व्यक्त करण्यात आला. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यापासून महाविकास आघाडीतील लहानमोठे अनेक नेत्यांनी मध्यावधी निवडणुका लागण्याचा अंदाज व्यक्त केला होता. महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका कधीही घोषित होण्याची शक्यता असल्याचं उद्धव ठाकरे यांनी दिवसांपूर्वी म्हटलं होतं. तेव्हा ठाकरेंनी मध्यावधी निवडणुकीची शक्यता व्यक्त करताना कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. दरम्यान, आता पुन्हा उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज्यात मध्यावधी निवडणुका लागू शकतात, असं विधान केलं आहे.
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी मतदारांना ऑनलाइन पद्धतीने संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, राज्यात मध्यावधी निवडणुका लागू शकतात. सध्या अपात्रतेच्या विषयावरती सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. सुप्रीम कोर्टात जर अपात्रतेचा निकाल लागला तर राज्यात निवडणुका लागतील, असं ते म्हणाले.
ते म्हणाले, मी प्रत्यक्ष व्यासपीठावर उपस्थित नाही आहे. बऱ्याच दिवसांनंतर मी या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत आहे. जेव्हा आपलं सरकार होतं तेव्हा याच माध्यमातून आपण महाराष्ट्र सांभाळलं. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. अजित पवार उपमुख्यमंत्री होते. जयंतराव माझे मंत्रिमंडळातील सहकारी होते. आता सगळ्यांचा कठीण काळात साथ देणाऱ्या सहकाऱ्यांनो असा उल्लेख करतोय.
ठाकरे म्हणाले, वाटलं नव्हतं अशा पध्दतीने पोटनिवडणूक लढवावी लागेल. विरोधकावर मात करणं ही जिद्द बाळगावी लागते. पण आपला विरोधक निघून जावा आणि पोटनिवडणूक लागावी असं कोणालाच वाटत नाही. लक्ष्मण आणि मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहतो. आजची पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. त्या मताचा आदर करतो. पण लोकशाही मधला मोकळेपणा आता उरला आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
Pune Bypoll Election : पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस
दरम्यान, ते म्हणाले, ज्यांना असं वाटत की ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. कारण आम्ही त्यांच्या घरातला उमेदवार दिला. हे सगळं ठीक आहे. पण, अशा पद्धतीने सहानभूतीचे राजकारण तिकडून होत असेल तर लोकमान्य यांच्या घरात उमेदवारी न देता दुसऱ्याला दिली तेव्हा सहानुभूती कुठे गेली? भाजपाने आत्तापर्यंत वापरा आणि फेकून द्या असंच धोरण अवलंबलं आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपाने टिळक कुटुंबीयांना वापरून फेकून दिलं. लोकमान्य टिळकांच्या वंशजांवर हा अन्याय करून भाजपा थांबली नाही. कसब्यातून भलत्याच उमेदवाराला उमेदवारी दिल्यानंतर आजारी गिरीश बापटांना प्रचारात उतरवलं. त्यांची अवस्था पाहून तर मला भाजपाचं क्रौर्य किती भयंकर आहे, ते जाणवलं. असं म्हणत कसबा पोटनिवडणुकीवरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे.