Chhagan Bhujbal : मला वाटतं आता बाकीच्या गोष्टी करण्याची काही गरज नाही. सगळेच मराठा समाजाचे लोक कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत आणि ओबीसीत येत आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात मराठा शिल्लकच राहणार नाही. सगळेच कुणबी होणार आहेत. त्यामुळे आता बाकीच्या उपायांची गरजच राहणार नाही असं मला वाटतं. तु्म्ही क्युरेटिव्ह पिटीशन करा किंवा आणखी एखादं बिल आणा पण जर सगळेच ओबीसीत येत असतील तर बाहेर कोण राहणार?, असा सवाल राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला. मंत्री छगन भुजबळ यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यवर मत व्यक्त केले. तसेच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर पुन्हा टीका केली.
छगन भुजबळ यांच्यामुळेच मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण मिळू शकलं नाही असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. याबद्दल भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले, की त्याचं हे रोजचंच काम आहे. त्याशिवाय त्याचं भाषण कोण ऐकणार नाही. हरिभाऊ राठोड हे फक्त ओबीसीत फूट पाडण्यासाठी गेली कित्येक वर्ष प्रयत्न करत आहेत. आता ज्या पद्धतीने दादागिरीने कुणबी प्रमाणपत्र लावतात. खोटी प्रमाणपत्रे घेत आहेत. तसंच पुढं सुद्धा होणार आहे. पुढे जात पडताळणीच्या वेळी सुद्धा हेच होणार आहे. कोण फोन करणार, कोण दादागिरी करणार जात पडताळणी सुद्धा अशीच होणार आहे. आता तर आयोगाचे सगळेच लोक राजीनामे देत आहेत. आता हा ओबीसीचा आयोग राहिलेला नाही तर मराठा आयोग झाला आहे, अशी टीका भुजबळ यांनी केली.
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ गो बॅक! घोषणाबाजी करत मराठा आंदोलकांनी रस्त्यावर शिंपडलं गोमूत्र
उद्यापासून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे. तशीच चर्चा ओबीसींवरही व्हावी अशी मागणी होत आहे. यावर भुजबळ म्हणाले, अधिवेशनात ओबीसींवर चर्चा करून आता करायचं तरी काय. सगळेच मराठा ओबीसीत येऊ घातलेत. सगेळच प्रमाणपत्र घेत आहेत. त्यासाठी सगळ्याच बाजूंनी प्रयत्न सुरू आहेत. न्यायमूर्ती शिंदे गावागावात फिरत आहेत. मग आता बाकीच्यांची गरज काय, झालं सगळं आता. सगळे ओबीसी झाले. मराठा आता महाराष्ट्रात शिल्लक नाही. सगळे कुणबी झाले.
राठोडांनी ओबीसीत फूट पाडू नये
अ,ब,क,ड चा अभ्यास भुजबळांनी करावा असं हरिभाऊ राठोड यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा भुजबळांनी तिखट शब्दांत समाचार घेतला. मी सगळा अभ्यास केलाय. अबकड चौकटी दिल्या आहेत. विमुक्त जातींना वेगळं आरक्षण दिलं आहे. भटक्या समाजाला वेगळं आरक्षण दिलं आहे. धनगर समाजाचंही त्यात आहे. वंजारी समाजाचंही आहे. पवार साहेबांच्या वेळेसच हे सगळं केलं आहे. याचा अभ्यास त्यांनी (हरिभाऊ राठोड) अगोदर करावा आणि ओबीसीत फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये.
Narhari Zirval, Chhagan Bhujbal शिंदे सरकारसाठी डोकेदुखी का ठरत आहेत? पाहा व्हिडिओ