Gulabrao Patil : महायुती सरकारचं मंत्रिमंडळ विस्तारानंतर आठवडा उलटून गेला तरी (Maharashtra Cabinet Expansion) अजूनही मंत्र्यांना खाते मिळालेले नाहीत. मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी हिवाळी अधिवेशन सुरू झालं. आता अधिवेशन संपल्यानंतर खातेवाटप होईल असे सांगण्यात येत आहे. मात्र या घडामोडी घडत असतानाच शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी (Gulabrao Patil) खातेवाटपावर मोठं वक्तव्य केलं आहे. खातेवाटप का रखडलं, याचं उत्तर पाटील यांनी दिलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. येत्या एक ते दोन दिवसांत तिघे जण एकत्र बसून चर्चा करतील. त्यानंतर एक ते दोन दिवसांत खात्याचे वाटप होईल असे गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.
मंत्रिमंडळाच्या विस्तारात महायुतीच्या ३३ आमदारांनी कॅबिनेट तर ६ आमदारांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर या मंत्र्यांना कोणतं खातं मिळणार याची चर्चा सुरू झाली. परंतु, शपथविधीनंतर लगेचच हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यामुळे खातेवाटपाचा मुद्दा मागे पडला. आता या अधिवेशनानंतर खातेवाटप होईल असं सांगितलं जात आहे. याआधी कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं द्यायचं यावर पुन्हा चर्चा होईल त्यानंतर आपसी सहमतीने अंतिम निर्णय घेण्यात येईल.
याच पार्श्वभुमीवर गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पाटील पुढे म्हणाले, वरिष्ठ नेत्यांकडे पालकमंत्रिपद किंवा अन्य कोणत्याही मंत्रिपदाची मागणी मी केलेली नाही. नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे. त्या विश्वासाला पात्र राहण्याचा प्रयत्न मी करणार आहे. कॅबिनेट मंत्री होणं एवढं सोपं नाही. परंतु, पाच वर्षांचा मंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर मला पुन्हा कॅबिनेट मंत्रिपदी संधी मिळाली आहे. दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रिपद मिळणं ही बहुधा जळगाव जिल्ह्यातील पहिलीच घटना असावी.
रविवारी भारतीय जनता पार्टीच्या चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक उईके, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे आणि संजय सावकारे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दत्तात्रय भरणे, अदिती तटकरे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ यांनी शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, उदय सामंत, शंभूराज देसाई, प्रताप सरनाईक, भरत गोगावले आदींनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
“भुजबळांचं वाईट होतं तेव्हा मी खूश असतो”, कट्टर विरोधकाचा टोला; अजितदादांंचीही घेतली भेट