मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशात दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) चर्चेत आले आहेत. एमआयडीसीच्या प्रश्नासाठी रोहित पवार उपोषणाला बसले होते. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहासमोर रोहित पवार यांना फटकारलं. तसंच उद्योग मंत्री उदय सामंत यांनी त्यांची समजूत काढली. यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. मात्र आंदोलन मागे घेताच रोहित पवार यांनी अजित पवार यांना काही मिनिटात प्रत्युत्तर दिलं. (MLA Rohit Pawar vs DCM Ajit Pawar in rainy assembly session 2023)
आमदार रोहित पवार उपोषणाला बसले असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. आपल्या सदनाचे सदस्य रोहित पवार बाहेर पावसात पाटेगाव आणि खंडाळा तालुका कर्जत येथील एमआयडीसीसाठी उपोषणाला बसले आहेत. गत अधिवेशनात त्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून लक्ष वेधलं होतं. त्यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अधिवेशन संपायच्या आधी आदेश काढू असं सांगितलं. मात्र दुसरे अधिवेशन आले तरी अजून त्याबाबत निर्णय झालेला नाही. त्याची शासनाने दखल घ्यावी, अशी विनंती देशमुख यांनी केली.
अनिल देशमुख यांनी मांडलेल्या मुद्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, 1 जुलै 2023 रोजी उदय सामंत यांनी रोहित पवार यांना पत्र दिलं होतं, हे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. यात उदय सामंत यांनी म्हंटलं होत की, तुमचं 22 जुन रोजीचे पत्र मिळाले. यानुसार येत्या पावसाळी अधिवेशनात या एमआयडीसीसाठी बैठक घेतली जाईलं, असं त्यांनी म्हंटलं होतं. यावर अजित पवार यांनी अद्याप अधिवेशन संपायचे आहे, उद्योग विभागाचे मंत्री, एमआयडीसीचे यांनी पत्र दिलं आहे, याचा अर्थ गांभीर्याने दखल घेतली आहे, असं उपोषणाला बसण्याची गरज नसल्याचं म्हंटलं.
यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रोहित पवार यांच्याशी चर्चा केली. उद्याच्या उद्या या एमआयडीसीसाठी बैठक घेतली जाईल. अधिसूचना काढण्यासाठी उद्योग विभाग सकारात्मक आहे. त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला आहे, असं सामंत यांनी सांगितलं. तर रोजगाराच्या अडचणी सुटव्या म्हणून आज आंदोलन केलं. वर्षभरात अनेक वेळा उदय सामंत, CM, DCM यांना भेटून अधिसूचना काढावी यासाठी विनंती करत होतो. मागे काय झालं त्यात न जाता आज अनेक नेते येऊन भेटले. उदय सामंत साहेब यांनी येऊन उद्या बैठक घेण्याचा शब्द दिला आणि अधिवेशन संपण्या अगोदर अधिसूचना काढणार असाही शब्द दिला. महाराष्ट्राचे मंत्री म्हणून विश्वास ठेवणं ही आमची जबाबदारी आहे. मी माझं आंदोलन मागे घेत आहे, असं रोहित पवार यांनी सांगितलं.
मा. @AjitPawarSpeaks दादा धडाडीने निर्णय घेणारे नेते म्हणून आपली ओळख आहे. #MIDC चा विषय हा आजचा नाही तर केवळ अधिसूचना काढून पुढील कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून मी वारंवार मुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांना भेटून विनंती केली, निवेदनं दिली, विधानसभेतही आवाज उठवला.… pic.twitter.com/4u1quC8BGT
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 24, 2023
आंदोलन मागे घेताच रोहित पवार यांनी ट्विट करत अजित पवार यांना प्रत्तुत्तर दिलं. मा. अजितदादा धडाडीने निर्णय घेणारे नेते म्हणून आपली ओळख आहे. एमआयडीसीचा विषय हा आजचा नाही. केवळ अधिसूचना काढून पुढील कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून मी वारंवार मुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांना भेटून विनंती केली, निवेदनं दिली, विधानसभेतही आवाज उठवला. परंतु राजकीय दबावाला बळी पडत सरकारने प्रत्येक वेळी माझी आश्वासनावर बोळवण केली. त्यामुळं नाईलाजाने उपोषणाला बसण्याचा निर्णय घ्यावा लागला. माझी आपणास विनंती आहे की, उपमुख्यमंत्री म्हणून आपणच याकामी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावला तर माझा संपूर्ण मतदारसंघ आपला कायमस्वरूपी आभारी राहील! कर्जत-जामखेडकरांचं एकच मिशन मंजूर एमआयडीसीचं हवं नोटिफिकेशन!, असं रोहित पवार म्हणाले.