Download App

Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : सुजय विखे-निलेश लंके राजकीय वैर खरंच संपलंय का?

माजी खासदार सुजय विखे यांनी दिलेल्या चॅलेंजनंतर खासदार निलेश लंके यांनी लोकसभेत इंग्रजीतून शपथ घेत पूर्ण करुन दाखवलंय. लंके यांनी राजकीय खुन्नसपोटी हा सगळा पराक्रम केला की काय? अशी चर्चा रंगलीयं.

Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) नगर जिल्ह्यात धक्कादायक निकाल समोर आले. राज्यात चर्चेत ठरलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe) यांचा पराभव केला. निवडणूक काळात एकमेकांवर टीका-टिप्पणी करण्यात आली. मात्र, निवडणुकीतील विजयानंतर हेवेदेवे सोडून, झाले गेले ते विसरून जायचं. तसेच विखे कुटुंबियांविषयी मला आभिमान आहे, असे खासदार निलेश लंके म्हणाले होते. मात्र, निवडणूक काळात इंग्रजीतून भाषण करण्याचा गाजलेला मुद्दा व विखेंकडून देण्यात आलेले आव्हान पूर्ण करण्याच्या उद्देशाने निलेश लंके यांनी मराठी मातृ भाषेला डावलत इंग्रजी भाषेतून खासदारकीची शपथ घेतली. एकीकडे झालं गेलं विसरायचं म्हणणारे लंके यांनी मात्र, इंग्रजी भाषेतून शपथ घेत विखे यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर दिलंय, म्हणजेच राजकीय खुन्नसपोटी हा सगळा पराक्रम केला की काय? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगलीयं.

‘इंडिया’चा हिट फॉर्म्युला ‘मविआ’ रिपीट करणार; विधानसभेत महायुतीच्या कोंडीचं खास प्लॅनिंग

लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला व नवनिर्वाचित खासदार यांचा शपथविधी कधी पार पडणार? याकडे देशाचे लक्ष लागले होते. अखेर 18 व्या संसदेच्या सदस्यांचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला. यावेळी अनेक नवनिर्वाचित खासदारांनी आपल्या मातृभाषेतून शपथ घेतली. महाराष्ट्रातील अनेक खासदारांनी मराठीतून शपथ घेतली. मात्र, यामध्ये सगळ्यात चर्चेत राहिलेला विषय म्हणजेच अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी इंग्रजी भाषेतून घेतलेली शपथ होय.

दरम्यान, शपथविधी झाल्यानंतर निलेश लंके म्हणाले, निवडणुकीच्या वेळीच मी ठरवलं होतं की, संसदेत जाईल तेव्हा पहिल्यांदा इंग्रजी भाषेत बोलणार आहे. त्याप्रमाणे मी खासदारकीची शपथ ही इंग्रजी भाषेत घेतली. मात्र, हे विरोधी उमेदवाराला प्रत्युत्तर म्हणून ही कृति होती का? असा सवाल करण्यात आला. त्यावर ते म्हणाले, विरोधी नेत्याला हे उत्तर म्हणता येणार नाही. पण माझ्यासाठी इंग्रजी बोलणं अवघड नव्हतं, म्हणून मी इंग्रजी भाषेतून शपथ घेतली असल्याचं खासदरा लंकेंनी सांगितलंय.

साईबाबांच्या मूर्ती हिंदू मंदिरांमधून हटवा, उच्च न्यायालयात याचिका, सरकारला नोटीस

विखेंचे आव्हान…लंकेंनी राजकीय खुन्नस काढली..
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर उमेदवारांची घोषणा झाली. नगर दक्षिण लोकसभेत महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके असा सामना झाला. यावेळी प्रचारादरम्यान एका सभेमध्ये विखे यांनी लंके यांना जाहीर आव्हान केले. प्रतिस्पर्धी असलेल्या समोरच्या उमेदवाराने एक महिना पाठांतर करून तरी असं इंग्रजीमध्ये बोलून दाखवलं तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असं सुजय विखे म्हणाले होते. त्यांचं हे विधान अहमदनगरच्या लोकसभा निवडणुकीत चर्चेत राहिलं. त्यानंतर विजयाचा गुलाल घेतलेल्या लंके यांनी खासदारकीची शपथ इंग्रजी भाषेतून घेतली. एकीकडे मराठी भाषेविषयी अस्मिता बाळगणाऱ्या अनेक आमदारांनी मराठी भाषेतून शपथ घेतली. मात्र विखे यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर म्हणून लंके यांनी इंग्रजीतून भाषण करून राजकीय खुन्नस पूर्ण केली अशी चर्चा झाली.

झालं गेलं सोडून द्यायचं…हे फक्त बोलण्यापुरतंच..
सुजय विखे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केल्यानंतर निलेश लंके यांनी प्रथमच विखे कुटुंबियांविषयी वक्तव्य केलं होतं. विशेष म्हणजे एका जाहीर कार्य्रक्रमामध्ये त्यांनी विखे कुटुंबियांचे गोडवे गायले. विखे कुटुंबियांचा मला अभिमान आहे. राज्याच्या राजकारणात त्यांचे असलेले योगदान हे नक्कीच कौतुकास्पद आहे. तसेच निवडणुकीमध्ये असलेले माजी खासदार यांच्याविरोधात आम्ही टीका टिपण्णी केली. मात्र, उमेदवार म्हणून ते योग्य होते.

दरम्यान, आता निवडणूक झाली निकाल लागला यामुळे निवडणूक काळात काय झालं गेलं ते सोडून द्यायचं, या शब्दात लंके यांनी या वादावर पडदा टाकला, असा विषय रंगला होता. मात्र लंके यांच्या इंग्रजी भाषेतील शपथ विधीवरून लंके यांचे ते वक्तव्य केवळ बोलण्यापुरतेच मर्यादित होते की काय? असा सवाल उपस्थित होतोयं. दरम्यान, लंके यांच्याकडून सध्या पराभूत उमेदवार सुजय विखे यांच्याकडून कोणतेही भाष्य केले जात नाही. यामुळे येत्या काळात विखे यांच्याकडून लंके यांच्या वक्तव्यांवर काय भाष्य केले जाणार का? हे पाहणे देखील महत्वाचे आहे.

follow us