Uddhav Thackeray : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वाधिक चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी म मराठीचा नाही तर म महापालिकेचा आहे अशी खोचक टीका केली होती. त्यांच्या या टिकेला आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विजयी मेळाव्यातून प्रत्युत्तर दिले. ‘म’ महापालिकेचा नाही तर ‘म’ महाराष्ट्राचाही आहे. आम्ही महाराष्ट्रही आता काबीज करू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
आता मराठे मराठेतर, ब्राह्मण ब्राह्मणेतर, कोकण कोकणेतर असा कोणताही भेदभाव न ठेवता मराठी माणसांची एकजूट करा. आपली ताकद एकजुटीसाठी असली पाहिजे, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. या वक्तव्यांतून त्यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना (उबाठा) युतीचे संकेत दिले. त्यांच्या या वक्तव्याची आता राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
जे बाळासाहेब यांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ‘म’ महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे आम्ही महाराष्ट्रही काबीज करू. सत्ता येते आणि जाते असं शिवसेनाप्रमुख म्हणायचे. आपली ताकद एकजुटीत असली पाहिजे. विधानसभेत त्यांनी (भाजप) जे काही केलं बटेंगे तो कटेंगे. हिंदू-मुसलमान केलं. त्यांनी खरंतर मराठी आणि मराठीतरांत फूट पाडली. गुजरातमध्येही त्यांनी असंच केलं. पटेलांना वेगळं केलं आणि बाकीचा समाज एकत्र केला.
महाराष्ट्रातही तेच केलं. मराठी माणूस मराठी माणसाशी भांडला आणि दिल्लीच्या गुलामांनी सत्ता काबीज केली. त्यांचे डाव ते करतच असतात. आमचे पंतप्रधान जगभरात फिरतात. स्टार ऑफ घाणाचा पट्टा घालतात. इकडं घाण आणि तिकडं घाणा. आपला शेतकरी नांगराचं जोखड घेऊन शेती करतोय पण तिकडे पंतप्रधान स्टार ऑफ घाणाचा पट्टा घालतात. लाज वाटली पाहिजे.
आमच्यावर भाषेची सक्ती का करता. आम्ही कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही. पण जर तुम्ही सक्ती केली तर आम्हीही आमची शक्ती दाखवू. आता आपण एककत्र आलोय. त्यामुळे त्यांच्याकडून काड्या घालण्याचे उद्योग होत राहतील. मी तर म्हणतो या भाजपवाल्यांना लग्नाला सुद्धा बोलावू नका. येथेही भांडणं लावून दुसऱ्या लग्नाला निघून जातील, असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
“एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी, आमच्यातील अंतरपाट..”, राज साक्षीने उद्धव ठाकरेंची घोषणा