मिलिंद मुरली देवरा. मुंबईच्या वर्तुळात राजकीयदृष्टा अत्यंत मोठे, श्रीमंत पण तितकेच सुसंस्कृत नाव. राजकीय घराणे, राजकीय ताकद, गाठीला अमाप पैसा अशा गोष्टी असूनही ते कधी वागवे वागताना सापडले नाहीत किंवा कोणत्या वादातही अडकल्याचे ऐकण्यात नाही. 2004 च्या सुमारास राहुल गांधी (Rahul Gandhi) ज्यावेळी काँग्रेसमध्ये (Congress) आणि निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय झाले त्याचवेळी ज्योतिरादित्य सिंधिया, मिलिंद देवरा (Milind Deora), सचिन पायलट अशा तरुण फळीची साथ त्यांना लाभली. खासदार, केंद्रीय मंत्री असे करत राहुल गांधींसोबत ही तरुण फळीही एक एक राजकीय पायरी चढत वर गेली.
ज्या मुंबईत आपली अख्खी हयात घालवली तरी ओळख तयार करता येत नाही त्या मुंबईतील उच्चंभ्रूंची वसाहत असलेल्या दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा हे वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी खासदार झाले. अवघ्या 35 व्या वर्षी केंद्रीय मंत्रीही झाले. तरुण वयातच मुंबई काँग्रेसचे अध्यक्षही झाले. हेच मिलिंद देवरा आता काँग्रेससोबतचा घरोबा संपवून शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने त्यांच्या या पक्षप्रवेशाकडे पाहिले जात आहे. दक्षिण मुंबईतून त्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
मिलिंद देवरा आपल्या वडिलांचा वारसा घेऊन राजकारणात आले. मुरली देवरा आणि गांधी कुटुंब यांचे नजिकचे संबंध होते. मुंबईत मुरली देवरा यांनी काँग्रेसची अनेक वर्षे धुरा सांभाळली. ते तब्बल 22 वर्षे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष राहिल्याचे एकही नाव नाही. 25 वर्ष ते संसदेचे सदस्यही होते. मुंबईच्या राजकारणावर जेवढी देवरांची पकड होती तेवढीच इथल्या अर्थकारणावरही. मुंबईतील अनेक बड्या उद्योगपतींशी त्यांचे संबंध होते. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतून काँग्रेसची तिजोरी भरण्याची मोठी जबाबदारी देवरा यांनी सलगपणे सांभाळली. पुढे ते केंद्रिय पेट्रोलियम मंत्री झाले.
पण याच मुरली देवरा यांनाही कधी काळी शिवसेनेचे पहिल्यांदा ओळख मिळवून दिली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठिंब्यावरच मुरली देवरा 1977 मध्ये मुंबईचे महापौर झाले होते. त्यानंतर त्यांना संपूर्ण मुंबईत ओळख मिळाली. त्यानंतर ते लोकसभेला उभे राहिले. पराभूत झाले. पुन्हा उभे राहिले, तिथून चारवेळा लोकसभेवर निवडून आले, दोनवेळा राज्यसभेवर निवडून गेले, केंद्रीय मंत्री झाले. आता त्यांचा मुलगाही राजकारणात पुन्हा सक्रिय होण्यासाठी आणि खासदार होण्यासाठी शिवसेनेची मदत घेताना दिसणार आहेत.
1966 साली स्थापन झालेल्या शिवसेनेने 1967 राजकारणात एन्ट्री केली. ठाणे नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला पहिला नगराध्यक्ष मिळाला. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत ताकद वाढवायला सुरुवात केली. 1968 च्या महापालिका निवडणुकीत 140 पैकी शिवसेनेने 42 जागा जिंकल्या. त्यावेळी निवडणुकीत शिवसेनेची राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असलेल्या प्रजा समाजवादी पक्षाची युती झाली होती. मधू दंडवते आणि ना. ग. गोरे हे त्या पक्षाचे नेते होते. त्याच टर्ममधील 1971 मध्ये डॉ. हेमचंद्र गुप्ते यांच्या रुपाने शिवसेनेचा पहिल्यांदा मुंबईत महापौर झाले.
याच 1967 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षातून मुरली देवरा यांनीही नगरसेवक म्हणून विजय मिळविला होता. मूळचे राजस्थानच्या असलेल्या देवरा यांनी मुंबईला आपली कर्मभूमी बनवली होती. मुरली देवरा यांनी अर्थशास्त्रात पदवी तर मिळवली होतीच पण प्रत्येक व्यापारी माणसात असतो तो व्यवहारिक शहाणपणा त्यांच्याकडे भरपूर होता. हा व्यावहारिक शहाणपणा घेऊनच ते राजकारणात आले. त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांनी दुसऱ्यांदा विजय मिळविला.
1977 मध्ये देवरा यांना महापौरपदाची संधी खुणावू लागली. बाळासाहेब ठाकरे आणि देवरा यांचे अत्यंत निकटचे संबंध होते. असे म्हणतात की आणीबाणीदरम्यान इंदिरा गांधींची आणि शिवसेना प्रमुखांची भेट देवरांच्या मध्यस्तीने झाली होती. त्यानंतर बाळासाहेब यांच्यावर पहिली शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी देवरा यांनीच पुढाकार घेतल्याचे सांगण्यात येते. देवरा यांनी बाळासाहेबांकडे मदत मागितली. बाळासाहेबांनीही देवरा यांना मदत करण्याचे मान्य केले. देवरा मुंबईचे महापौर झाले. 1977 ते 1978 असे एक वर्षे देवरा महापौर होते.
त्यानंतर देवरा यांचे नाव मुंबईमध्ये परिचित झाले. ते 1980 साली लोकसभेला उभे राहिले. पराभूत झाले. पुन्हा 1984 साली उभे राहिले, तिथून 1984, 1989, 1991, 1998 असे चारवेळा लोकसभेवर निवडून आले, दोनवेळा 2002 ते 2014 असे सलग दोनवेळा राज्यसभेवर निवडून गेले, केंद्रीय मंत्री झाले. 22 वर्षे मुंबई काँग्रेसचे अध्यक्षही राहिले.
देवरा यांच्या नावाला शिवसेनेच्या पहिल्या महापौर बनलेल्या हेमचंद्र गुप्ते यांचा विरोध होता. त्यांच्या मते त्यावेळी महापौरपदासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी सोहनसिंग कोहली या समाजवादी कार्यकर्त्यास पाठिंबा देण्याचे मान्य केले होते. पण त्यांनी हा शब्द फिरवत देवरा यांना मदत केली. यानंतर गुप्ते यांनी यांनी तर जनता पक्षात प्रवेश केला आणि विधानसभा निवडणुकीत मनोहर जोशी यांना पराभूत केले.
मध्यंतरीच्या काळात महाविकास आघाडी जन्माला येण्यापूर्वी मिलिंद देवरा यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. तेव्हा उद्धव ठाकरे यांनीही या मदतीची आठवण देवरा यांना करुन दिली होती. मिलिंद देवरा आज पाळण्यात असतील नाहीतर गोधडीत असतील. त्यांच्या वडिलांना बाळासाहेबांनी ओळख दिली. त्यांना महापौर केलं. नाहीतर मुरली देवरांना कोणी ओळखले असते? असा सवाल विचारत ठाकरे यांनी देवरांना खिंडीत गाठले होते. आता त्यांच्यापाठोपाठ त्यांचे पुत्र मिलिंद देवराही शिवसेनेच्या मदतीने पुन्हा लोकसभेची पायरी चढण्यासाठी सज्ज झाले आहेत.