Download App

Nagpur : स्वतःची झोळी रिकामी अन् शिंदेंच्या शिलेदारांची ठाकरेंच्या आमदाराला मंत्रिपदाची ऑफर

Nagpur : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनात एक खास गोष्ट दिसत आहे. खोके सरकार म्हणत आंदोलन करणारा अजित पवार गट सत्ताधारी (Nagpur) बाकांवर आहे. अजितदादांसह त्यांचे आमदार मंत्री झाले आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटही सोबत आहे. मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत ताटकळलेले आमदारही सोबत आहेत. या आमदारांना आता मंत्रिपद मिळेल याची शक्यता फारशी राहिलेली नाही. त्यातच आता असा एक प्रसंग घडला ज्याची खमंग चर्चा सुरू झाली आहे. शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी थेट ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांना मंत्रिपदाची ऑफरच देऊन टाकली. खरंतर अजित पवार गट येण्याआधी भरत गोगावले आणि संजय शिरसाट (Sanjay Shirsat) या दोन आमदारांचं नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर होतं. पण, त्यांना मंत्रिपदानं हुलकावणी दिली. आता तेच मंत्रिपदापासून वंचित असलेले आमदार ठाकरेंच्या आमदारांना मंत्रिपदाची ऑफर देत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

आज नागपूर विधिमंडळाच्या आवारात खास प्रसंग पाहण्यास मिळाला. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्याचवेळी तिथे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आले. दोघांत हास्यविनोद आणि गप्पा सुरु असतानाच आमदार भरत गोगावलेही येऊन धडकले. त्यांनी नाईक यांना शिंदे गटात येण्याची आणि मंत्रिपदाची ऑफरच देऊन टाकली.

Maharashtra Politics : अजितदादांच्या दोन शिलेदारांंनी वाढवली शिंदे सरकारची डोकेदुखी?

त्यानंतर या तिघांत जी चर्चा झाली ती कॅमेऱ्यात टिपली गेली. वैभव नाईक शिरसाट यांना म्हणाले,आम्ही अनेक अधिवेशनात एकत्र बसून काम केलं आहे. आता तर या सरकारचे शेवटचेच अधिवेशन आहे. तरीसुद्धा शिरसाटांना मंत्रिपद मिळालं नाही. तुमचे विरोधक असलो तरी तुमच्या मंत्रिपदाची आम्हालाही उत्सुकता आहे. यावर संजय शिरसाट यांनीही उत्तर देताना म्हटले की हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. माझा मित्र (नाईक) ही परंपरा जपतोय याचा मला अभिमान वाटतो. मला मंत्रिपद मिळाले नाही तरी माझ्या मित्राने ज्या भावना व्यक्त केल्या त्याचा मला आनंद वाटतो.

ही चर्चा सुरू असतानाच तिथे आमदार भरत गोगावले आले. त्यांना पाहून नाईक म्हणाले, भरतशेठ गोगावले आधी अधिवेशनात विविध रंगांचे कोट घालून यायचे पण, आता त्यांनी कोट घालणं सोडून दिलंय. त्यांनीह मंत्रिपदाची अपेक्षा सोडून दिली का असा प्रश्न आम्हाला पडला आहे, असा खोचक सवाल केला. त्यावर गोगावले यांनीही हजरजबाबी उत्तर दिले. मी वैभवला सांगतो की वैभवला जर माझा कोट चढविण्याची इच्छा असेल तर त्याला मी माझा कोट देऊन टाकतो. मंत्रिपदाची वाट मी पाहतच आहे वैभव जर आमच्याकडे येत असेल तर त्याच्यासाठीही मी थांबायला तयार आहे.

Telangana Election : तेलंगणात विद्यमान अन् भावी मुख्यमंत्र्यांना पराभूत करणारा जायंट किलर कोण?

त्यांच्या या वक्तव्यावर नाईक म्हणाले, ज्यांना मंत्रिपद मिळालं नाही ते मला मंत्रिपदाची ऑफर देत आहेत. भरत गोगावले माझे मित्र आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एन्ट्रीमुळे त्यांचे आणि संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळू शकलं नाही. याचं दुःख आहे. आता तर काँग्रेसचेही लोक सरकारमध्ये येणार असल्याचं आम्ही ऐकून आहोत. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळेल की नाही, असा खोचक सवाल वैभव नाईक यांनी विचारला.

Tags

follow us

वेब स्टोरीज