दिंडोरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narahari Zirwal) यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ (Gokul Zirwal) हे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या जनसन्मान यात्रेकडे पाठ फिरवल्याने पुन्हा एकदा चर्चेत आलेत. गत काही दिवसांपासून गोकुळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवू शकतात, असे बोलले जात आहे. मी काहीही झाले तर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सोबत राहणार अशी प्रतिक्रिया, काही दिवसांपूर्वी गोकुळ यांनी दिली होती. नरहरी झिरवाळ यांनी मात्र या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे सांगितले होते. अशात गोकुळ यांच्या आजच्या अनुपस्थितीने या चर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे. (Narahari Jirwal’s son Gokul Jirwal Absence from Deputy Chief Minister Ajit Pawar’s Jansanman Yatra)
गत काही दिवसांपासून नरहरी झिरवाळ लवकरच अजित पवार यांची साथ सोडून शरद पवार यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत दिंडोरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे यांना मिळालेले मताधिक्य, निवडणुकीदरम्यान झिरवाळ यांनी शरद पवार गटाच्या बैठकीला लावलेली हजेरी, त्यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दिलेला पाठिंबा यावरुन या चर्चांना सुरुवात झाली होती. अशात अशात गोकुळ झिरवाळ यांनी मी काहीही झालं तर शरद पवार यांच्या सोबत राहणार अशी प्रतिक्रिया दिली होती.
मात्र झिरवाळ यांनी “मी आजही, उद्याही आणि शेवटपर्यंत अजित पवार यांच्या सोबतच राहणार आहे” असे सांगितले होते. इतकेच नाही तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तर झिरवाळ यांची उमेदवारीच जाहीर केली होती. तर मुलाच्या वक्तव्यावर बोलताना त्यांनी “ते माझं पोरगं आहे. मी त्याचा बाप, तो माझा बाप नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. “तो सत्कार करून पुढे जाणार होता म्हणून मी त्याला जाब विचारला. सांगायचे इकडे आणि जायचे तिकडे अशातले आम्ही नाही. मात्र तो कुठेही वावगा बोलला नाही याचा मला अभिमान आहे” असेही झिरवाळ यांनी सांगितले होते.
तसेच “गोकुळ माझा मुलगा आहे. त्याला आमदार व्हायचे असेल तर मी दादांना सांगेन, त्याला आमदार करा. मी आता थांबतो. पण तो दादांनीच दिलेल्या फ्लॅटवर मुंबईत काम करत आहे”, असेही स्पष्टीकरण नरहरी झिरवाळ यांनी दिले होते. याच घडामोडींदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नरहरी झिरवाळ यांची उमेदवारीही जाहीर केली होती. पण आता गोकुळ यांनी जनसन्मान यात्रेकडे पाठ फिरवल्याने पुन्हा एकदा त्यांच्या पक्षांतराची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे यंदा दिंडोरी विधानसभा मतदारसंघात नरहरी झिरवाळ विरुद्ध गोकुळ झिरवाळ अशी लढत पाहायला मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.