Download App

वेशांतर करून अजितदादांची शहांसोबत भेट; सुळेंच्या मागणीने एअरपोर्ट अधिकारी गोत्यात येणार?

एकीकडे भाजपाचा विरोध करत होतात आणि दुसरीकडे मात्र अमित शहांना भेटत होतात. याचा अर्थ तुम्ही महाराष्ट्राशी बेईमानी केली.

Supriya Sule Criticized Ajit Pawar : राज्यात महायुतीचं सरकार आहे. आधीच्या डबल इंजिन सरकारला मागच्या वर्षी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं तिसरं इंजिन जोडलं गेलं. या घटनेला एक वर्ष उलटलं आहे. अजित पवार यांनीच (Ajit Pawar) महायुतीत सहभागी होण्याचा एक खास किस्सा दिल्लीतील पत्रकारांना सांगितला होता. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली होती. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनीही अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. दिल्ली आणि मुंबईतील विमानतळ, एअरलाइन यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सुळे यांनी यानिमित्ताने केली.

महायुतीत सहभागी होण्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठका झाल्या. वेगळं नाव घेऊन विमानातून दिल्ली गाठावी लागत होती. मास्क आणि टोपी घालून  बैठकीला हजर राहत होतो अशी माहिती अजित पवार यांनी पत्रकारांना दिली होती. यानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. सुप्रिया सुळे यांनी अजितदादांवर जोरदार टीका केली.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

मी वर्तमानपत्रात अशी बातमी वाचली की महाराष्ट्राचे त्यावेळचे विरोधी पक्षनेते (अजित पवार) वेशांतर करून दिल्लीत यायचे असा खुलासा त्यांनी केला. आता मला काही प्रश्न विचारायचे आहेत. तुम्ही विरोधी पक्षनेते असताना अमित शहांना का भेटत होतात? तु्म्हीच कबूल करता की तुम्ही चोरून भेटत होता. म्हणजे तुम्ही विरोधी पक्षनेते असताना महाराष्ट्राला कॉम्प्रोमाइज करत होतात. एकीकडे तुम्ही भाजपाचा विरोध करत होतात आणि दुसरीकडे मात्र मागच्या दाराने अमित शहांना भेटत होतात. याचा अर्थ तुम्ही विरोधी पक्षनेते पदाशी आणि महाराष्ट्राशी बेईमानी केली असा त्याचा अर्थ होतो.

मास्क, टोपी अन् दिल्लीतील बैठका; महायुतीतील एन्ट्रीचा किस्सा अजितदादांनीच सांगितला..

दुसरी गोष्ट मला प्रसारमाध्यमांकडून मला समजली. खरं खोटं मला माहिती नाही. यानुसार ते सातत्याने नाव बदलून येत होते. हा या देशात राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. एका राज्याचा विरोधी पक्षनेता नाव बदलून बुकिंग करतो. विमानतळावर जातो तेव्हा त्याचं नाव आधारकार्डला मॅच होतं का? अग अजित पवारांनी असं केलं उद्या एखादा दहशतवादीही असं करेल. तो नाव बदलून आला तर याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला.

follow us