लोकसभेचा (Lok Sabha Election) निकाल लागला. त्यानंतर लगेचच शरद पवार (Sharad Pawar) विधानसभेच्याही तयारीला लागले. त्यांचा नाशिक दौरा पाडला. जिल्ह्याच्या पहिल्याच दौऱ्यात त्यांनी थेट निफाड गाठले. इथे अजित पवार यांना साथ दिलेल्या आमदार दिलीप बनकर (Dilip Bankar) यांना पवारांनी पहिले लक्ष केले. पवारांच्या जोडीला स्टेजवर शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम (Anil Kadam) हेही होते. गत काही दिवसांपासून कदम यांची पवारांशी जवळीक वाढलेली दिसते. लोकसभेच्या प्रचारातही कदम यांनी भास्कर भगरे यांच्यासाठी कुठेच कसर ठेवली नाही. त्यामुळे कदम आगामी काळात पवार यांचे उमेदवार असू शकतात, हे जवळपास स्पष्ट होते.
त्यामुळे कदम आगामी काळात पवार यांचे उमेदवार असू शकतात, हे जवळपास स्पष्ट होते. इकडे लोकसभा निवडणुकीतच भारती पवार यांना निफाडमध्ये मताधिक्य मिळाले नाही. प्रचंड आटापीटा करुनही महायुतीचाच उमेदवार मायनस गेल्याने दिलीप बनकर अस्वस्थ झाल्याचे बोलले जाते. पण त्यांना रिप्लेस करु शकेल असा चेहरा अजितदादांकडे नाही. त्यामुळेच निफाडमध्ये पुन्हा एकदा दिलीप बनकर विरुद्ध अनिल कदम यांच्यातच सामना रंगण्याची शक्यता आहे. यात निफाडकर कोणाला घरी बसवणार हे बघणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे… (Niphad assembly constituency, there will be a fight between MLA Dilip Bankar and former MLA Anil Kadam)
निफाडच्या राजकारणात दोन दशकांपूर्वी बोरस्ते आणि मोगल गटाचा प्रभाव होता. शरद पवार यांचे अत्यंत जवळचे सहकाही असलेले मलोजीराव मोगल हे इथून तीन टर्म आमदार होते. मोगल यांनी पडत्या काळात, अनेक आमदार सोडून गेल्यानंतरही शरद पवार यांची साथ दिली होती. याची आठवण सांगताना शरद पवार आजही थकत नाहीत. निफाडच्या दौऱ्यातही पवार यांनी आमदार सोडून गेल्यानंतर “आम्ही दोघांनी जिल्ह्यात, तालुक्यात जाऊन संवाद साधला. नाशिकची सूत्रे मालोजीराव यांनी खांद्यावर घेतली होती. संबंध जिल्हा पालथा घातला होता. नाशिकमधील सर्व जागा आम्ही निवडून आणल्या होत्या” अशी आवर्जून आठवण सांगितली होती.
1995 मध्ये भाजप-शिवसेनेच्या झंझावातात पहिल्यांदाच मतदारसंघात रावसाहेब कदमांनी विजय मिळवला. मात्र, साधारण दीड दोन वर्षातच त्यांचे अपघाती निधन झाल्याने निफाड मतदारसंघात पोटनिवडणूक होऊन मंदाकिनी कदम यांना निफाडने निवडून दिले. 1999 मध्येही शिवसेनेने जागा राखली. पण इथे राष्ट्रवादीच्या दिलीप बनकर यांचे नेतृत्व उभे राहू लागले. त्यांनी मोगल गटाचे अस्तित्व संपुष्टात आणण्याचे काम हाती घेतले. या दरम्यान 2002 मध्ये रावसाहेब कदम यांचे पुतणे अनिल कदम यांनी जिल्हा परिषदेच्या ओझर गटामधून विजय मिळवून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली.
इकडे चुलती मंदाकिनी कदम आमदार. अनिल कदम यांचा राजकीय प्रवेश त्यामुळे तालुक्यात कदम यांचाच शब्द होता. पण बनकर यांना हे मान्य नव्हते. त्यांनी काँग्रेसची ताकद खाऊन 2004 मध्ये पहिल्यांदाच विजय मिळविला. पण अनिल कदम यांनी पुढच्याच निवडणुकीत चुलतीच्या पराभवाचे उट्टे काढले. 2009 मध्ये बनकर यांचा पराभव करत कदम यांनी विधानभवनात प्रवेश केला. 2014 मध्येही त्यांनी वर्चस्व सिद्ध केले. थोडक्यात निफाड हा शिवसेनेचा बालेकिल्ला बनला होता. 2019 मध्ये मात्र बनकरांनी दोन्ही पराभवांची सव्याज परतफेड केली. दोनवेळा हुकलेला विजय त्यांनी 18 हजारांचे मताधिक्य घेत खेचून आणलाच. आता या मतदारसंघात कदम विरुद्ध बनकर अशी लढाई पुन्हा बघायला मिळू शकते. यात कदम यांचा ओढा शरद पवार गटाकडे असल्याचे बोलले जाते. याला कारणेही तशीच आहेत.
दिलीप बनकर यांनी अजित दादांची साथ दिल्यापासून कदमांनी शरद पवारांशी स्नेह वाढविण्यास सुरुवात केली. राजकारणात भीष्माचार्य समजल्या जाणाऱ्या पवारांनी देखील कदमांना दिल्ली आणि नाशिक येथे वेळ देत चर्चा केली. कांद्याची निर्यातबंदीनंतर खुद्द पवारांच्या नेतृत्वाखालील चांदवड येथे शेतकऱ्यांचा रस्ता रोको आंदोलन झाले. या आंदोलनावेळी देखील पवारांनी कदम यांना मोर्चासमोर बोलण्याची संधी दिली. दुसर्याच दिवशी पवारांनी अनिल कदम यांच्यासोबत नागपुरला विमानात एकत्रित प्रवास केला. दोघांचा एकत्रित विमान प्रवास हा तसा योगायोग म्हणता येणार नाही. लोकसभा निवडणुकीत भास्कर भगरे यांच्या प्रचारात ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम हे शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांपेक्षा अधिक सक्रिय होते.
आता लोकसभेमध्ये इथून शरद पवार गटाच्या भास्कर भगरे यांना मताधिक्य आहे. तालुक्यातील संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. अशात निफाडमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळे निफाडची जागा शिवसेना ठाकरे गटाला न सुटल्यास कदम हेच राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे उमेदवार असतील, अशीही शक्यता आहे. पण कदम यांच्या वाट्यात दोन प्रमुख अडसर आहेत. पहिला अडसर आहे तो भाऊबंदकीचा. गतवेळी आमदार बनकर जेवढ्या मतांनी विजयी झाले त्याहून जास्त मते अनिल कदम यांचे बंधू यतीन कदम यांनी घेतली होती. यंदाही विरोधकांकडून या भाऊबंदकीला खतपाणी कसे मिळेल, असे जोरदार प्रयत्न पडद्यामागून होत आहेत.
शिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनीही उमेदवारी मागितली आहे. उमेदवारी न मिळाल्यास क्षीरसागर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरण्यावर ठाम आहेत. या दोन अडसरांवर अनिल कदम यांनी मात केली तर ते विजयापर्यंत पोहचू शकतात. मात्र भाऊ यतिन कदम यांचा विरोध आणि क्षीरसागर यांची बंडखोरी रोखण्यात अपयश आले तर बनकर पुन्हा आमदार होतील यावर दुमत असण्याचे कारण नाही.
मराठा बहुल असलेल्या या मतदारसंघात वंजारी आणि माळी समाजाचीही मते निर्णायक ठरते. कांद्यावरूनही शेतकरी बराच नाराज आहे. इथं ऊस पट्टा देखील मोठा आहे. निफाड सहकारी साखर कारखाना हा एक मतदारसंघातील कळीचा प्रश्न आहे. द्राक्ष, बेदाणे आणि टोमॅटो यांची प्रमुख बाजारपेठ असलेला पिंपळगाव बसवंत हा भाग या मतदारसंघात येतो. निफाड तालुका आणि तालुक्यातील गावे सोबतच ओझर विमानतळ, हिंदुस्थान एरोनोटिक्स आदी कंपन्यांच्या वसाहती या मतदारसंघाचे वैशिष्ट्य होय. मतदारसंघातील रस्त्यांचा प्रश्न देखील गंभीर आहे. त्यामुळे यंदा या निवडणुकीत काय होणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.