Download App

सत्यजित तांबेंचा गेम, नाना पटोलेंचं एकच वाक्य…

मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघात आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तांबे पिता-पुत्राकडून मोठा ड्रामा पाहायला मिळालाय. नाशिक पदवीधरचे विद्यमान आमदार असलेले कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांना देण्यात आलेली उमेदवारी नाकारुन त्यांनी मुलाचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. दरम्यान, सत्यजित तांबेकडून आम्ही महाविकास आघाडी सरकारच्यावतीने अर्ज दाखल केल्याचं सांगितलंय. त्याचप्रमाणे त्यांनी एक अर्ज अपक्ष देखील भरला आहे. मात्र, महाविकास आघाडीचा एबी फॉर्म त्यांनी जोडलेला नसल्याची माहिती समोर आलीय.

तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपच्या नेत्यांचा पाठिंबा घेणार असल्याचं स्पष्ट केलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे प्रदेशाध्य़क्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राधाकृष्ण विखे यांनी पाठिंबा मागितल्यास आम्ही पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलंय.

या संपूर्ण घडामोडीवर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबद्दल सर्व माहिती घेतल्यानंतरच प्रतिक्रिया देणार असल्याचं स्पष्टीकरण प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलंय. ते म्हणाले, आम्ही ही बातमी मीडीयामध्ये पाहिली असून सुधीर तांबे यांची प्रतिक्रिया देखील आम्ही ऐकली आहे. ही घटना चांगली नसून तांबे यांनी का अर्ज भरला नाही याबाबत माहिती घेऊन स्पष्टीकरण देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

तसेच या प्रकरणाची माहिती घेऊन त्याची काय कारणं असू शकतात तसेच पक्षपातळीवर संपूर्ण घटनेची चर्चा आम्ही करणार आहे. माझं यासंदर्भात सुधीर तांबे यांच्याशी काहीच बोलणं झालेलं नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

सुधीर तांबे यांनी फॉर्म का नाही भरला? तसेच त्यावेळी तिथे नेमकी काय परिस्थिती होती. याबाबत मी वरिष्ठ नेत्यांशी बोलणार असून त्यानंतर मी स्पष्टीकरण देणार आहे, असंही त्यांनी म्हंटलय. यावेळी त्यांनी भाजपच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडलं असून ते म्हणाले भाजपचे लोकं काहीही बोलू शकतात.

दरम्यान, तांबे पिता-पुत्रांकडून नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अशी खेळी खेळण्यात आल्याने आता निवडणुकीत पुढे काय होणार? याकडं राज्यातील जनतेसह सर्वच राजकीय पक्षाचं लक्ष लागून राहिलंय.

Tags

follow us