महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का; प्रचारगीतातील ‘भगवा’ शब्दावर निवडणूक आयोगाचा आक्षेप

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपने प्रचारासाठी खास तयार केलेले प्रचारगीत निवडणूक आयोगाने नाकारले.

  • Written By: Published:
Untitled Design (220)

Big blow to BJP in the backdrop of municipal elections : महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपने प्रचारासाठी खास तयार केलेले प्रचारगीत निवडणूक आयोगाने नाकारले आहे. या गीतामध्ये वापरण्यात आलेल्या ‘भगवा’ या शब्दावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाने या गीताला परवानगी नाकारल्याचे समोर आले आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे भाजपमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, प्रचाराच्या ऐन तोंडावर पक्षाची मोठी अडचण निर्माण झाली आहे. भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी विशेष प्रचारगीताची निर्मिती केली होती. या गीताला मराठी संगीतसृष्टीतील लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांचा आवाज लाभला होता. प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर वापरण्याची तयारी सुरू असतानाच, निवडणूक आयोगाने या गीतातील काही शब्दांवर आक्षेप घेत गीत नाकारल्याचा निर्णय घेतला.

निवडणूक आयोगाने विशेषतः ‘भगवा’ या शब्दावर आक्षेप नोंदवला असून, याचबरोबर ‘श्रीराम’ या शब्दालाही परवानगी नाकारण्यात आल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे भाजपाची प्रचार यंत्रणा काहीशी विस्कळीत झाली असून, आता नव्याने प्रचारगीत तयार करण्याची वेळ पक्षावर आली आहे. दरम्यान, या निर्णयावर भाजपकडून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

विरोधी पक्षांना आणखी एक मोठा धक्का; प्रतोदांनाही आता मंत्रिपदाचा दर्जा आणि सुविधा नाहीत.

‘निवडणूक आयोग जर धर्मनिरपेक्ष असेल, तर तो रंगनिरपेक्षही असायला हवा. निवडणूक आयोगाला भगव्याचे वावडे का?’ असा थेट सवाल उपाध्ये यांनी केला आहे. ‘जर एखाद्या गीतामध्ये ‘हिरव्या रानात’ अशी ओळ असती, तर निवडणूक आयोगाने त्यावर आक्षेप घेतला असता का? मग केवळ ‘भगवा’ शब्द वापरला म्हणून भाजपाचे प्रचारगीत नाकारले जाते, हे कसे योग्य आहे?’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसेच, ‘भगवा आणि श्रीराम ही या देशाची सांस्कृतिक ओळख आहे. ती कुणाची खासगी मक्तेदारी किंवा कॉपीराईट नाही. काही पक्षांना भगवा आणि श्रीराम यांचे वावडे असू शकते, पण त्याला भाजप काय करणार?’ असा टोला त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना लगावला.

‘तुम्ही प्रचारगीताला परवानगी नाकारू शकता, पण सकाळी आकाशात दिसणारा भगवा रंग आणि लोकांच्या मनात असलेले श्रीराम कसे नाकारणार?’ असा सवाल करत केशव उपाध्ये यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर तीव्र शब्दांत टीका केली. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपकडून या प्रकरणावर पुढील कायदेशीर किंवा प्रशासकीय भूमिका घेतली जाते का, तसेच आयोग आपल्या निर्णयावर ठाम राहतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us