Pankaja Munde : गेल्या काही दिवसांपासून प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) राज्याचा राजकारणात चर्चेचा विषय ठरले आहे. पूजा खेडकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप देखील करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या पूजा खेडकर यांची पोलिसांकडून चौकशी देखील सुरु करण्यात आली आहे. यातच विधानपरिषद आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या देखील या प्रकरणात नाव आल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांनी पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान या ट्रस्टला मोठी देणगी दिली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळावी यासाठी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर (Dilip Khedkar) यांनी पाथर्डीतील मोहटादेवीला चांदीचा मुकुट अर्पण केला होती असा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. तर आता या प्रकरणात पंकजा मुंडे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी मोठा खुलासा केला आहे.
आज माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाले, पूजा खेडकर प्रकरणात जाणूनबुजून माझ्याबद्दल खोट्या बातम्या चालवण्यात येत आहे. मी आता कायदेशीर मार्ग अवलंबणार असून माझ्याबद्दल खोट्या बातम्या चालवणाऱ्यांबद्दल मानहानीचा दावा करणार आहे. मला विधानपरिषद मिळाली यामुळे माझ्याबद्दल चुकीच्या आणि बदनामीकारक बातम्या जाणीवपूर्वक चालवल्या जात आहे असं मला वाटतं. खेडकर यांच्या चेकचा एकही रुपया माझ्या ट्रस्टला आलेला नाही.
गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण सुरु आहे मात्र आता अचानक या प्रकरणात माझा नाव येत आहे. अशा पद्धतीने बातम्या करणं योग्य नाही, माध्यमांनी विश्वासार्हता जपायला हवी. मी आता या प्रकरणात कायदेशीर पाऊल उचलणार आहे असं पंकजा मुंडे म्हणाले.
माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे पुढे म्हणाले की, मी इतकी मोठी नाही की एखाद्याला आयएसएस अधिकारी बनवू शकेल. गेल्या काही वर्षांपासून मी कुठल्याही संविधानिक पदावर नाही. मी कोणाला कसं आयएसएस अधिकारी करू शकते? या प्रकरणात खोटी डॉक्युमेंट्स काढल्याचा जो आरोप होत आहे त्यांची चौकशी व्हायला हवी. जर एवढ्या मोठ्या संस्थेवर आरोप होत असेल तर चौकशी झाली पाहिजे आणि जे कोणी या प्रकरणात दोषी असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. असेही यावेळी पंकजा मुंडे म्हणाले.
तसेच माझा खेडकर कुटुंबाशी कसलाही संबंध नाही. सोशल मीडियावर जो फोटो आज व्हायरल होत आहे तो फोटो मंदिरातला आहे. मंदिरात कोणीही येऊ शकते. त्यावरून संबंध जोडणे योग्य नाही.
हरभजन सिंगचा ‘तो’ व्हिडिओ, प्रचंड विरोध अन् जाहीर माफी, जाणून घ्या नेमकं प्रकरण
राज्यात कितीतरी अधिकारी नेते असे आहे जे स्वतःच्या खासगी गाड्यावर स्टिकर लावून फिरतात याचा देखील तपास झाला पाहिजे आणि मी खेडकरचे समर्थन करणार नाही असं देखील माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या.