परळी : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली आहे. घरामध्ये पाणी देणारा नेता पाहिजे की चपटीची बाटली देणारा नेता पाहिजे असे म्हणत त्यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर टीका केली आहे. यावेळी त्या परळी येथे बोलत होत्या.
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा परळी तालुक्यातील कौठळी येथे कार्यक्रम होता. जलजीनव मिशन योजनेच्या कामाच्या शुभारंभाच्यावेळी त्यांनी उपस्थित लोकांसमोर मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी केंद्रात व राज्यातील सरकारमुळे परळीमध्ये किती कामे झाली, याची माहिती दिली.
यावेळी बोलताना त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता टीका केली. काही नेते हे आमच्या सरकारच्या योजनांचे भूमीपुजन व शुभारंभ करण्यासाठी पुढे येतात. तसेच पैसे वाटप करणारा, तमाशा दाखवणारा, मते विकत घेणारा, भ्रष्टाचार करणारा, खोटे गुन्हे दाखल करणारा, चारित्र्यहीन व्यक्ती ही राजकारणातील व्हिलन असते, असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडेवर सडकून टीका केली आहे.
विरोधकांनी विकासाच्या नावाखाली फक्त परळीतील भुयारी गटारयोजनेच्या नावाखाली रस्ते फोडून ठेवले. तुम्हाला कसा विकास पाहिजे. जनतेला पिढी घडवणारा नेता पाहिजे, पिढी वाया घालवणार नेता नको आहे, अशा शब्दात त्यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.
कसब्यात रासनेंच्या झालेल्या पराभवाचं खापर ‘या’ 6 नेत्यांवर फुटणार
दरम्यान 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. पंकजा मुंडे यांनी त्यांच्या दसरा मेळाव्यात 2024 साली पुन्हा विधानसभेत जाण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार त्या मतदारसंघात विविध कामे करताना सध्या दिसत असल्याची चर्चा आहे.