Download App

ठाकरेंच्या फोन प्रकरणावर पंकजा स्पष्टच बोलल्या; ‘…माझा प्रचार पाहावत नाही तेच अफवा पसरवत आहेत’

  • Written By: Last Updated:

पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर दिलेल्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. एकीकडे भाजपचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका करत आहेत, मात्र दुसरीकडे भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) फोन करुन विचारपूस केली होती. या फोन प्रकरणावरुन चर्चेला तोंड फुटल्यानंतर दोघांमध्ये नक्की काय बोलणं झालं हे सांगण्यात त्यांनी नकारही दिला होता. पण आज त्यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी (Kasba by-election) त्या आज मतदारसंघात भाजपच्या प्रचारात सामिल झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं.

कसबा पोटनिवडणूकीचा प्रचार सर्वच पक्षांकडून जोरदार सुरु आहे. आज सोमवारी महाविकास आघाडीसह भाजप-शिवेसेनेचा जोरदार प्रचार रॅली पार पडल्या. यावेळी भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडेंनी देखील प्रचार केला. कसबा पोटनिवडणुकी भाजपचा विजय निश्चित आहे. मागील तीन दिवसांपासून मी पुण्यात मुक्काम ठोकून आहे. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा मी प्रचार करत आहे. ज्यांना माझा प्रचार पाहावत नाही ते अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहेत. मी करत असलेला प्रचार ज्यांना आवडत नाही, तेच अशा प्रकारच्या बातम्या करत आहेत, अस पंकजा मुंडे म्हणाल्या.

खासदार गिरीश बापट सध्या आजारी आहेत. त्यांच्या नाकाला ऑक्सिजनची नळी बसविलेली आहे. व्हिलचेअर बसून त्यांनी मेळावा घेतला. त्यांना थेट प्रचारात उतरविल्याने भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेसने सडकून टीका केली. यावर बोलताना पंकजा मुंडे यांनी संयमी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, भाजपच्या जन्मापासून गिरीश बापट भाजपसोबत आहेत. आजवर त्यांनी पक्षासोबत काम केलं विधानसभेत काम केलं आहे. ते लोकसभेत गेले. एवढं आयुष्य पक्षासाठी वेचल्यानंतर निवडणुकीत भाग घेण्याची उत्सुकता त्यांनाही असेल. हेमंत रासनेंना आशीर्वाद देण्याची त्यांचीही इच्छा असेल तर यात वावगे काय?

पंकजा मुंडे म्हणाल्या, अजित पवार यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले आहेत. त्यामुळं आपल्या उमेदवाराचा प्रचार ते चांगल्या प्रकारेच करणार. परंतु आमचा आत्मविश्वास अतिशय दांडगा आहे. परिस्थिती अतिशय सकारात्मक आहे. सरकार आमचं आहे. आपल्याला विकास मिळेल या भावनेतून लोकं देखील आम्हाला निवडून देतील. राज्यातली सत्ता आणि स्थानिक सत्ता जेव्हा एकत्र मिळून काम करतात तेव्हा विकास हा नक्कीच होत असतो.

दरम्यान, पदवीधर निवडणुकीवर भाष्य करताना त्या म्हणाल्या, पदवीधर निवडणुकीतील निकाल नक्कीच निराशाजनक होता. त्यामुळं आता कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचाच अशी भावना आता कार्यकर्त्यांच्या मनात आहे.

Dhananjay Munde : कंपन्या गुजरातला पळवल्या… आता देव पळवतात

अमोल मिटकरी यांनी अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना मुंडे म्हणाल्या, महाराष्ट्रातले राजकीय नेते दुसऱ्या राज्यात जेव्हा प्रचारासाठी जातात तेव्हा इतरांनी देखील असंच म्हणायचं का? राष्ट्रीय नेता हा कोणत्याही एका राज्याचा नसतो तर तो देशाचा असतो. जेव्हा 370 कलम हटवलं तेव्हा अमित शहा संपूर्ण देशाचे होते. या देशाला स्वतंत्र आणि सुरक्षित सरकार देण्यासाठी पाऊल उचलली तेव्हा अमित शाह देशाचे होते. त्यामुळं त्यांच्याविषयी असं विधान करणं चुकीचं आहे, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

Tags

follow us