Prakash Solanke retirement : बीड जिल्ह्यामध्ये सातत्याने मराठा समाज राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठीराखा राहिला. गेल्या अनेक निवडणुकीचे दाखले देता येतील. केवळ आणि केवळ मराठा समाजाने राष्ट्रवादीला खंबीर पाठींबा दिला. मात्र, मंत्रिपद देताना शरद पवारांपासून ते आता अजित पवारांपर्यंत प्रत्येकाने ओबीसीला संधी दिली. मराठा समाजाकडे ढुंकूनही बघितले नाही. ही वस्तूस्थिती आहे. मी पाच टर्म आमदार राहिलोय. 35 वर्षांपासून राजकारण अनुभवतोय, त्या अनुभवातूनच बोलतोय. कदाचित पक्षाच्या दृष्टीने बीड जिल्हा ओबीसीसाठी राखीव असावा, अशा शब्दात अनेकदा राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी पक्षावर ताशेरे ओढले. माजलगाव मतदारसंघातून तब्बल पाच टर्म आमदार राहिलेले प्रकाश सुंदररावजी सोळंके यांनी या पुढे विधानसभा न लढविण्याचा निर्णय जाहीर केलाय. त्यांनी आपला राजकीय वारस म्हणून पुतणे जयसिंग धैर्यशील सोळंके यांचे नाव जाहीर केलंय. प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांचे राजकारण कसे राहिले, त्यांनी पुतण्याला राजकीय वारसदार म्हणून का जाहीर केलंय हेच पाहुया..
पाच टर्म आमदार, एकदा राज्यमंत्रीपद
काँग्रेसचे सुंदररावजी सोळंके राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री राहिलेले. त्यांचा राजकीय वारस त्यांचा मुलगा प्रकाश सोळंके हे चालवत आहेत. त्यांची राजकीय कारकीर्द जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुरू झाली. विधानसभेच्या पहिल्याच निवडणुकीत ते काँग्रेसकडून पराभूत झाले होते. त्यानंतर 1999 च्या विधानसभा निवडणुकीत माजलगाव मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर विजयी झाले होते. त्यानंतर 2004 ला भाजपच्या तिकीटावर ते दुसऱ्यांदा आमदार झाले. पण 2009 च्या विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार झाले. त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. ते महसूल, भूकंप पुनवर्सन आदी खात्यांचे राज्यमंत्री होते. परंतु 2014 ला ते पराभूत झाले आणि 2019 ला राष्ट्रवादीकडून आमदार झाले. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ते अजित पवार यांच्याबरोबर गेले पण त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. 2024 ला प्रकाश सोळंके यांनी विधानसभा लढणार नसून, पुतणे जयसिंह सोळंके यांचे नाव पुढे केले होते. पण पक्षाने त्यांनाच उमेदवारी दिली आणि ते निवडून आले. पण पक्षाकडून कॅबिनेट मंत्रिपद मिळत नसल्याने त्यांनी उघड नाराजी व्यक्त केलीय. शिवाय मंत्री पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे नेते व आमदार धनंजय मुंडे यांच्यावर ते टिका करत राहिले आहे. पण आता वय आणि आजारपणामुळे आमदार प्रकाश सोळंके कमी सक्रीय आहेत. त्यामुळेच त्यांनी विधानसभेच्या तीन वर्ष आधीच आपला राजकीय वारसदार घोषित केलाय.
वारस म्हणून पुतण्याच का ?
प्रकाश सोळंके यांचे बंधू धैर्यशील सोळंके यांनी स्थानिक राजकारण पाहिले आहे. सहकारी कारखान्याच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय राहिलेले आहेत. ते कायम दुय्यम भूमिकेत राहिलेत. तर धैर्यशील सोळंके यांचा मुलगा व प्रकाश सोळंके यांचा पुतण्या जयसिंह सोळंके मात्र स्थानिक राजकारणात जास्त सक्रीय आहेत. काकांकडून राजकीय धडे घेणारे जयसिंह सोळंके यांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत अनेक महत्त्वाची पदे भूषविलेली आहेत. तर माजलगाव, वडवणी आणि धारूर तालुक्यात ते चांगलेच सक्रिय आहेत. बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे.
घरात संघर्ष नको म्हणून पुतण्याचे नाव ?
प्रकाश सोळंके यांचा मुलगा विरेंद्र सोळंके हे माजलगाव कारखान्याचे चेअरमन आहेत. तसेच स्थानिक राजकारणात सक्रीय आहेत. परंतु पुतपणे जयसिंह सोळंके हे राजकारणात जास्त सक्रीय आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यामुळे सोळंके यांनी पुतण्याला विधानसभेसाठी वारसदार म्हणून घोषित केले आहे. काका-पुतण्याचा संघर्ष बीड जिल्ह्याने मुंढे, क्षीरसागर घराण्यात बघितलेला आहे. त्यामुळे भविष्यात आपल्या घरात संघर्ष होऊ नये पुतण्याने विधानसभा आणि मुलाने स्थानिक राजकारण बघावे, असे प्रकाश सोळंके यांचे राजकीय गणित असल्याचे स्थानिक पत्रकारांचे मत आहे. परंतु विधानसभेसाठी तीन वर्षांचा कालावधी बाकी आहे. तोपर्यंत माजलगाव वेगळे राजकीय समीकरणहे समोर येऊ शकतात.
