Prasad Lad Warning to Rohit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघातावरून आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांनंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. रोहित पवार यांनी 16 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत ‘मफलर मॅन’च्या छायाचित्राचा संदर्भ देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याबाबत संशय व्यक्त केला होता. याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना पत्र लिहिले आहे. रोहित पवार यांनी केलेले आरोप ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे का, याबाबत त्यांनी थेट सवाल उपस्थित केला आहे. तसेच रोहित पवारांनी जाहीरपणे माफी मागावी, नाहीतर रोहित पवार दिसेल तिथे कार्यक्रम करू, असे प्रसाद लाड म्हणाले आहेत.
प्रसाद लाड यांनी पत्राद्वारे शरद पवार यांच्याकडे पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. कोणत्याही दुर्घटनेची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि सत्य जनतेसमोर यावे, याबाबत दुमत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, या संवेदनशील प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेबाबत संशय निर्माण करणारे आरोप केले जात असतील, तर त्यामागील तथ्ये आणि पक्षाची भूमिका स्पष्ट होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
रोहित पवारांची भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका आहे का?
रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत मांडलेली भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची अधिकृत भूमिका आहे का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत त्यांनी केलेल्या आरोपांशी पक्षाचे नेतृत्व सहमत आहे का? असे प्रश्न प्रसाद लाड यांनी उपस्थित केले आहेत.
शरद पवार हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, तर खासदार सुप्रिया सुळे या पक्षाच्या कार्याध्यक्ष असल्याने या प्रकरणात पक्षाची भूमिका जनतेसमोर मांडण्याची जबाबदारी त्यांची नाही का, असा सवालही त्यांनी केला आहे.
‘रोहित पवारांची भूमिका वैयक्तिक असेल तर खुलासा करा’
रोहित पवार यांनी मांडलेली भूमिका वैयक्तिक असेल, तर पक्षाने त्याबाबत स्पष्ट खुलासा करावा. तसेच पक्षाचा त्यांना पाठिंबा असेल, तर तोही जाहीरपणे व्यक्त करावा, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे.
शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद, अधिकृत निवेदन किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. ‘मौन हे अनेकदा संभ्रम निर्माण करते,’ असे म्हणत या संवेदनशील विषयावर पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने मौन न बाळगता जनतेसमोर स्पष्ट भूमिका मांडणे आवश्यक असल्याचे प्रसाद लाड यांनी पत्रात म्हटले आहे.
आता प्रसाद लाड यांच्या या पत्रावर शरद पवार आणि सुप्रिया सुळे काय भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
