पुणे : कसबा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवर रवींद्र धंगेकर यांचा 11 हजार 40 मतांनी विजय झाला आहे. तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला आहे. कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला होता. तो आता काँग्रेसच्या ताब्यात गेला आहे. भाजपच्या या पराभवाचे विश्लेषण करणारा लेख मुक्त पत्रकार विश्वनाथ गरुड यांनी लिहिलेला आहे.
ते म्हणतात की, कसब्यात केवळ भाजपाचे हेमंत रासने यांचा पराभव झालेला नाही तर कोल्हापुरात ज्यांना फारसे काही जमले नाही आणि राज्यात सत्ता उपभोगूनही ज्यांना आपल्या जिल्ह्यात स्वतःचा मतदारसंघ तयार करता आला नाही, त्या पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा मोठा पराभव आहे. खरंतर त्यांनी हा पराभव झाल्यावर पुण्याचे पालकमंत्रीपद सोडून द्यायला हवे. पण ते तसे करणार नाहीत. यापुढेही माध्यमांचे बूम समोर दिसल्यावर काहीतरी वायफळ बडबड करत बसायला मागे कोणते तरी पद हवे ना… जर ते पद नसेल तर कॅमेरे समोर येतील कशाला? कारण चंद्रकांतदादा पाटील हे अगदी बिचकुलेंसारखेही नाहीत.
कसब्यातील निकालातून या भागातील पुणेकरांनी चंद्रकांतदादा पाटील यांचे नेतृत्व नाकारले आहे, हे सुद्धा स्पष्ट होते. पुण्यातील भाजपच्या कोणत्याही नेत्याशी बोलल्यावर किंवा आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांशी बोलल्यावर त्याला चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून कशी ट्रिटमेंट दिली जाते, हे ऐकल्यावर ही निवडणूक काय येत्या काळातील सगळ्याच निवडणुका पुण्यात भाजपासाठी अवघड असणार, हे नक्की.
या निवडणुकीत म्हणे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपाने सर्व्हे केला होता. या सर्व्हेच्या आधारावरच हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली. आता ही सीट हातातून गेल्यावर तरी तो सर्व्हे कोणी केला होता, हे पक्षाने जाहीर करावे आणि त्यामधील निष्कर्ष कसब्यातील जनतेसमोर ठेवावे. कारण सर्व्हे ही भाजपासाठी मोठी पळवाट झाली आहे. सर्व्हे असा सांगतो आणि सर्व्हे तसा सांगतो, असे सांगत पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर कायमच अन्याय करायचा आणि आपल्या दत्तूंना तिकीट द्यायची असा प्रकार होतो आहे, आता हे सांगण्यासाठी राजकीय तज्ज्ञ असण्याची गरज नाही. ज्या उमेदवाराला सलग चार टर्म स्थायी समितीचे अध्यक्षपद देऊनही स्वतःच्या प्रभागात निर्णायक आघाडी घेता येत नाही. तो जर एखाद्या सर्व्हेच्या आधारावर निवडणुकीत जिंकेल, असे वाटून घेणे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना फोन केल्याने त्यांनी युक्रेन युद्ध थांबवले असे वाटून घेण्यासारखे आहे. मतदारांनी रविवारी मतदान करून एवढेच दाखवून दिले की तुम्ही कितीही सर्व्हे वगैरे केला असला तरी ग्राऊंड रिॲलिटी वेगळी आहे.
Election Results 2023 Live : नागालॅंड भाजपपुढे पण मेघालयमध्ये एनपीपी ठरणार मोठा पक्ष
गेल्या काही वर्षांपासून भाजपाची एक शैली तयार झाली आहे. न्यूसन्स व्हॅल्यू किंवा उपद्रव मूल्य नसलेल्या व्यक्तीला मोठं करायचं किंवा दुसऱ्या शब्दांत जनतेत काहीच स्थान नसलेल्या व्यक्तीला मोठं करायचं. एकतर अशी माणसं दिल्लीतून वरिष्ठांचा फोन जरी आला तरी जिथं असतील तिथं खुर्चीवरून उठून बोलायला लागतात इतकी ती वरिष्ठांना घाबरतात. दुसरे म्हणजे अशी माणसं स्वतःचं डोकं फारस वापरत नाहीत. वरून आदेश आले की इथे तेवढं काम करायचं. कारण या लोकांना स्वतःला मोठं व्हायचंच नसतं. एकतर जे पद मिळाले तेच या लोकांसाठी घबाड मिळाल्यासारखे असते. मग कशाला स्वतःची प्रतिमानिर्मिती करायची आणि वरिष्ठ नेतृत्त्वाची खफामर्जी करून घ्यायची. भाजपाने गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या राज्यात दिलेले मुख्यमंत्रीपदाचे नेते बघितल्यावर हे लगेच कळेल. कसब्यात उमेदवार निवडताना या पेक्षा काही वेगळी स्थिती नव्हती. तुलनेत स्वतःची जबराट प्रतिमा निर्मिती करण्यात यशस्वी ठरलेले रविंद्र धंगेकर पहिल्यापासून प्रचारात आघाडीवर होते आणि आज निकालाच्या फेऱ्यांमध्येही आघाडीवरच राहिले.
पुण्यातील भाजपा म्हणजे मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक, गणेश बीडकर आणि हेमंत रासने हे काही योग्य नाही. याचाही निकाल कसब्यातील मतदाराने दिला आहे. पुण्यातील भाजपाचे नेतृत्व करायला आणि विविध पदांवर चांगले काम करायला इतरही नेते आहेत. पण त्यांचा विचार का होत नाही, त्यांना दरवेळी का नाकारण्यात येतं हे सुदधा या निमित्ताने शोधले पाहिजे. हवं तर भाजपाने त्यासाठी एक अंतर्गत सर्व्हे करावा. ज्याला आपल्या प्रभागात मतदान घेता येत नाही त्याला आपण सलग चार टर्म स्थायी समिती देऊन चूक केली हे सुदधा मनातल्या मनात का होईना पक्ष नेतृत्त्वाने मान्य केले पाहिजे. कसब्यातील निवडणुकीतून बोध घेऊन शहरात सतत वेगवेगळ्या पोस्टरवर दिसणाऱ्या या चार-पाच स्थानिक नेत्यांना तूर्त विश्रांती दिली पाहिजे. नाहीतर आज कसबा गेला उद्या पुणे हातातून जाईल, हे निश्चित.
झाले गेले विसरून बदल करायचा असेल तर मुळात चुका शोधल्या पाहिजेत आणि त्या सुधारल्या पाहिजेत. पण भाजपाच्या नेतृत्त्वाला आम्ही सर्वगुणसंपन्न आहोत. आम्ही चुकूच शकत नाही, असा जो भ्रम झाला आहे तो पहिला दूर केला पाहिजे. कारण चुका मान्य केल्या तर सुधारणा करता येतात. पण गेल्या काही वर्षांत आम्हीच तेवढे शहाणे असे सांगत वावरणाऱ्यांसाठी कसब्यातील निकाल डोळ्यांत अंजन घालणारा आहे. तसेच विरोधकांना बळ देणारा आहे. शेवटी लोकशाहीत विरोधकही प्रबळ हवेतच ना…