Rais Shaikh’s letter to CM Devendra Fadnavis : ‘स्वराज्याचे संस्थापक’ छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे वडील शहाजी राजे भोसले आणि आजोबा मालोजी भोसले यांची अनुक्रमे ‘होदगिरे’ आणि ‘वेरूळ’ येथील समाधी स्मारके साडेतीनशे वर्षे उपेक्षित आहे. राज्यशासन ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशातील आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बांधणार आहे, त्याच धर्तीवर या मराठा वीर पुरुषांच्या समाधी स्थळी स्मारक बांधून परिसराचा विकास करावा, अशी मागणी समाजवादी पक्षााचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख (Rais Shaikh) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना (CM Devendra Fadnavis) पत्राव्दारे केली आहे.
आमदार रईस शेख यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केले. त्यांचे वडील शहाजी भोसले (इ. स. 1594-1664) यांना इतिहासात ‘स्वराज्य संकल्पक’ म्हटले जाते. दक्षिणेत अत्यंत पराक्रम गाजवलेल्या शहाजी भोसले यांचे शिकारी दरम्यान घोड्यावरुन पडून अपघाती निधन झाले. त्यांची समाधी कर्नाटकातील होदगिरे येथे आहे. सदर समाधी स्थळाचा जिर्णोद्धार करण्याची महाराष्ट्र अन् कर्नाटकातील अनेक सरकारांनी घोषणा केली, प्रत्यक्षात समाधी उपेक्षीत आहे. बेळगाव सीमाभागातील मराठी -कन्नड वादाचा समाधीस्थळाच्या विकासाला फटका बसला आहे.
रत्नागिरीला भाजपचा बालेकिल्ला बनवणार; मंत्री राणेंच्या मनात नक्की काय?
छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजी भोसले (इ.स. 1952-1605) यांची समाधी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ येथे घृष्णेश्वर मंदिर परिसरात आहे. या परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. पण येथे साधा फलकही नाही. मालोजी भोसले यांनी तत्कालीन अहमदनगरच्या निजामशाहीचा वजीर मलिक अंबर यांच्या साथीने आदिलशाही विरोधातील लढ्यात मोठा पराक्रम केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे-सुपे जहागिरीतून स्वराज्याचे रणशिंग फुंकले, ती जहागीर मालोजी भोसले यांना मिळालेली होती.
मालोजी भोसले यांच्या येथील गढीला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा आहे, तसा दर्जा समाधीला देण्यात यावा. कर्नाटकातील शहाजी राजे यांचे स्मारक केंद्रीय संरक्षित स्मारक आहे. शहाजी राजे यांच्या समाधी स्थळाच्या विकासासाठी केंद्र सरकारला विनंती करावी. तसेच वेरूळ आणि होदगिरे या दोन्ही समाधी स्थळांचा उत्तर प्रदेशात आग्रा येथील नियोजित छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या धर्तीवर स्मारक बांधून विकास करण्यात यावा, अशी मागणी आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.