रत्नागिरीला भाजपचा बालेकिल्ला बनवणार; मंत्री राणेंच्या मनात नक्की काय?

Nitesh Rane Speech in Ratnagiri : ‘आगामी काळात आपल्याला रत्नागिरीत मोठं काम उभं करायचं आहे. आपला रत्नागिरी जिल्हा भविष्यात भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला गेला पाहीजे यादृष्टीने आपल्याला वाटचाल करायची आहे.’ अशा शब्दांत मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) रत्नागिरीच्या भाजप कार्यकर्त्यांना बळ दिलं. त्यांच्या या वक्तव्याची रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. रत्नागिरीत शिवसेनेच्या शिंदे गटाचं वर्चस्व आहे. जिल्ह्याचं पालकमंत्रिपदही शिंदे गटाकडेच आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उद्योगमंत्री उदय सामंत तर राजापूर मतदारसंघातून त्यांचे बंधू किरण सामंत आमदार आहेत. एक प्रकारे हा जिल्हाच शिंदे गटाच्या ताब्यात असताना मंत्री राणे यांच्या वक्तव्याने महायुतीत धुसफूस वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
नितेश राणे एका कार्यक्रमानिमित्त रत्नागिरीत आले होते. यावेळी कार्यकर्त्यांना चार्ज करण्याच्या निमित्ताने त्यांनी भविष्यातील रोडमॅपच सांगून टाकला. राणे पुढे म्हणाले, मी मंत्री आणि आमदार या सगळ्या गोष्टी नंतर आहेत. पण हिंदू म्हणून माझी जी जबाबदारी आहे ती मी न चुकता पार पाडतो. रत्नागिरीतल्या भाजप कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी मी येथे आलो आहे. आगामी काळात आपल्याला रत्नागिरीत मोठं काम उभं करायचं आहे. आपला रत्नागिरी जिल्हा भविष्यात भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला गेला पाहीजे यादृष्टीने आपल्याला वाटचाल करायची आहे.
रत्नागिरीत भाजपला नंबर वन करायचं
हिंदुत्वाचा बालेकिल्ला कुठला असेल तर तो आमचा रत्नागिरी आहे. या दिशेने आपल्या सगळ्यांना काम करायचं आहे. आगामी प्रत्येक निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात भाजप एक नंबरचाच पक्ष राहील असा विश्वास वाटतो. एकमेकांना सहकार्य करत जिल्ह्यात पक्षाचं काम करण्याची जबाबदारी वरिष्ठांनी दिली आहे. मला रत्नागिरीचा संपर्कप्रमुख करण्यामागचा रवींद्र चव्हाण साहेबांचा हा हेतू आहे. भाजप कार्यकर्त्याला रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक बाबतीत स्थान मिळालं पाहिजे. ताकद मिळाली पाहिजे. जिल्हा नियोजन पासून ते एसईओपर्यंत पदांचं वाटप करत असताना मानाचं स्थान भाजपला मिळालंच पाहिजे या भूमिकेने आज मी येथे उभा आहे.
मला संंपर्कमंत्री का केलं, लवकरच कळेल
मी आज जसा तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी ताकद देण्यासाठी येथे आलोय तसा आगामी काळात समित्या तयार होतील तेव्हा नितेश राणेला संपर्कमंत्री का केलं याचं उत्तर त्यावेळी तुम्हाला मिळेल. म्हणून भाजप कार्यकर्त्याने स्वतःला कुठेही कमी समजू नये असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
नितेश राणे ते नरहरी झिरवाळ.. चर्चेतल्या पाच मंत्र्यांना वजनदार खाती, जाणून घ्या..