शिवसेना ठाकरे गटाचे ( Shivsena Thackarey Camp ) खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) हे आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे देखील होते. पत्रकार शशीकांत वारीसे ( Shashikan Warise ) यांची हत्या झाल्याचा आरोप राऊतांनी यावेळी केला. रिफायनरीला विरोध करत असल्याने वारीसे यांची हत्या करण्यात आली, असे राऊत म्हणाले.
याआधी बिहारमध्ये अशा घटना घडायच्या पण आता महाराष्ट्रातही अशा घटना घडत आहेत. लोकांची भूमिका मांडणारा पत्रकार आपल्यातून निघून गेला. वारीसे यांच्या हत्येमागे कोणाचा हात आहे याचा शोध लागला पाहिजे. नेमके वारीसे यांच्या हत्येच्या वेळेसच सीसीटीव्ही कसे बंद पडले, असा प्रश्न राऊत यांनी विचारला. तसेच सिंधुदूर्गामध्ये राजकीय हत्यांची परंपरा आहे, तसे प्रकार आत रत्नागिरीतही व्हायला लागले आहेत, असे म्हणत राऊतांनी नाव न घेता केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर निशाणा साधला आहे. या हत्येत कुणाकुणाचा सहभाग आहे, हे समोर आले पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली.
रिफायनरी परिसरात राजकीय नेत्यांचा जमिनी आहेत. पत्रकार वारीसे यांची हत्या ही त्यामुळेच झाली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेऊन रिफायनरी होणारच असे म्हटले होते. तसेच कोण आडवा येतो ते पाहू असे देखील ते म्हणाले होते आणि दुसऱ्या दिवशी ही हत्या होते, हा योगायोग नाही. या हत्येची कसून चौकशी झाली पाहिजे, असे राऊत म्हणाले आहेत.
शशिकांत वारीसे यांच्या कुटुंबाला 50 लाख रुपये राज्य सरकारने द्यावेत अशी आमची मागणी आहे. त्यांची पत्नी, मुलगा, आई यांचा आक्रोश सरकारने ऐकावा, असे राऊत म्हणाले आहेत.