Chandrashekhar Bawankule यांनी अजितदादांना पुन्हा डिवचलं ; म्हणाले, ‘४४० चा करंट…!’
पुणे : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Chinchwad By Poll Election) उमेदवार अश्विनी जगतापांच्या प्रचाराकरिता गुरूवारी दिवसभर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मतदारसंघात मॅरेथॉन दौरा केला. खरं तर ही लक्ष्मण जगतापांच्या (Laxman Jagtap) निधनानंतर ही पोटनिवडणूक होत असल्यामुळे आपण बिनविरोध निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) विनंती केली होती. पण शेवटी निवडणूक लागली. यामुळे २६ फेब्रुवारीला कमळासमोरच बटन जोरात दाबा, अजित पवारांना (Ajit Pawar) ४४० व्होल्टचा असा करंटच लागला पाहिजे, की पुन्हा त्यांनी चिंचवडचे नावच घेऊ नये, असं वक्तव्य करून चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांना डिवचलं आहे.
सध्या चिंचवड विधानसभेत भाजप प्रदेशाध्यक्षांकडून मॅरेथॉन बैठका घेतल्या जात आहेत. सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत तब्बल १७ ठिकाणी ते प्रचार करणार आहेत. अश्विनी जगतापांना निवडून आणण्यासाठी भाजप चांगलीच कंबर कसत आहेत. तसेच मनसेनं भाजपला पाठिंबा दिल्यानंतर पत्रकार परिषदेत अजित पवारांनी मनसेची खिल्ली उडवली. मनसेच्या पाठिंब्यामुळे आमचे धाबेच दणाणले, असे म्हणत त्यांनी भाजपची खिल्ली उडवली.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांची उमेदवारी जाहीर केली. चिंचवडच्या पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होणार असल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. चिंचवड पोटनिवडणुकीकरिता महाविकास आघाडीने देखील जोरदार कंबर कसली आहे.
चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची यंग ब्रिगेड मैदानात उतरणार आहे. रोहित पवार, धीरज देशमुख, इम्रान प्रतापगढी यांची आज प्रचार रॅली निघणार आहे. तसेच काही ठिकाणी सभासुद्धा होणार आहे. तर दुसरीकडे अमित शाह पुण्यातही येणार असल्यानं भाजपच्या गोटात तयारीची लगबग आहे. कालच गिरीश बापट प्रचारात उतरल्याने भाजपचं टेन्शन काहीसं कमी झाले आहे. जरी कसबा आणि चिंचवड या भाजपच्या जागा असल्या तरी देखील भाजपनं दोन्ही जागांवर आपली ताकद पणाला लावल्याचे दिसत आहे.