मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना (Sanjay Raut) लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात संजय राऊतांनी मुंबई पोलिसांना (Mumbai Police) माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांनी त्यासंदर्भात तपास सुरू केला आहे. संजय राऊत यांच्या मोबाईलवर हा धमकीचा मेसेज आला आहे. त्यामध्ये एके ४७ ने हत्या करण्याची धमकी देण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.
शुक्रवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास हा मेसेज आला असून त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊतांना लॉरेन्स बिष्णोई गँगकडून हा धमकीचा मेसेज आला असल्याचे त्या मेसेजमध्ये नमूद करण्यात आलं आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Museva) प्रमाणेच दिल्लीत संजय राऊतांचीही हत्या करण्याची धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली.
यासंदर्भात संजय राऊतांनी मुंबई पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याचा तपास चालू असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊतांनी गृहमंत्र्यांना यासंदर्भात सूचना दिली आहे की, त्यांच्या जीवाला धोका आहे. शिंदे- फडणवीस सरकार या सगळ्या धमकी प्रकरणाला गांभीर्याने न घेता ज्या प्रकारे वक्तव्य केली गेली, ती चुकीचीच होती. संजय राऊत या सगळ्याच्या विरोधात तीव्र लढा देत आहेत. या कारणाने अशा धमक्या येत आहेत. सरकारने याची लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.