कोकणातील जमीन गुजराती उद्योगपतींच्या घशात? नार्वेकरांवर संजय राऊतांचा थेट हल्ला

राहुल नार्वेकर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत.

Untitled Design 43

Untitled Design 43

Sanjay Raut’s serious allegations against Rahul Narvekar : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावात घडलेल्या एका घटनेमुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटला आहे. राहुल नार्वेकर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये म्हात्रोळी गावातील एका दाम्पत्याने नार्वेकर यांच्या सहकाऱ्यांना जाब विचारल्याचे दिसत आहे. आम्ही घरी नसताना आमच्या जमिनीची मोजणी कशी केली? असा सवाल ते करताना दिसतात. या वादानंतर राहुल नार्वेकर तेथून निघून गेल्याचेही व्हिडीओमध्ये दिसते.

या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत नार्वेकरांवर थेट आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, गुजरातमधील एका उद्योगपतीला त्या ठिकाणी फार्महाऊस उभारायचे होते आणि त्यासाठी संबंधित जमीन पसंत करण्यात आली होती. जमीन मालक कुटुंबातील कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले असताना, विधानसभा अध्यक्षांच्या उपस्थितीत सरकारी अधिकाऱ्यांकडून जमिनीची मोजणी सुरू करण्यात आली, असा आरोप राऊतांनी केला.

राऊत पुढे म्हणाले की, या प्रकरणात अधिकाऱ्यांशी झटापट झाल्याचेही समोर येत आहे. आमच्या जमिनी बळकावल्या जात असतील तर आम्ही शांत बसणार नाही, असे ते म्हणाले. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांत अशा प्रकारे जमिनी गुजरातमधील उद्योगपतींसाठी घेतल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. कोकणात बाहेरील उद्योगपतींना आणून स्थानिकांच्या जमिनी ताब्यात घेतल्या जात आहेत, असा दावा त्यांनी केला.

वर्ल्डकपमध्ये भारत-पाक पुन्हा भिडणार; सामन्याचं थेट प्रक्षेपण कुठे पाहाल?

या घटनेवरून राऊत यांनी राज्य सरकारवरही निशाणा साधला. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत, स्वतःला चौकीदार म्हणवणारे नेते शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्यास हातभार लावत आहेत का? असा सवाल उपस्थित केला. राहुल नार्वेकर यांनी मात्र आपण तेथे भांडण सोडवण्यासाठी गेलो होतो, अशी भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. परंतु, भांडण सोडवायला तुम्हाला कोणी बोलावले होते? असा प्रतिप्रश्न राऊतांनी उपस्थित केला आहे.

सध्या हा व्हिडीओ आणि त्यावरून झालेले आरोप-प्रत्यारोप यामुळे कोकणातील जमीन व्यवहारांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाची अधिकृत चौकशी होते का आणि संबंधित आरोपांबाबत नेमके तथ्य काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version