Sharad Pawar in Baramati : बलाढ्य वाटणाऱ्या प्रतिस्पर्ध्याला खिजवायचे कसे आणि हरणारा सामना जिंकायचा कसा, हे ज्याला कळाले तोच मॅन ऑफ द मॅच ठरत असतो. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) सध्या मॅन ऑफ द मॅच हा किताब जिंकण्यासाठी तयारीला लागले आहेत. भाजपने पवारांचा पक्ष फोडला, घर फोडले एवढेच नाहीतर घरात राजकीय भांडणेही लावली. पवारांच्या खेळीला आम्ही उत्तर दिले, असे भाजपवाले म्हणतील. पण पवारांनी अजून हार मानलेली नाही. अजूनही त्यांच्यातील तिरकसपणा टिकून आहे. तसा तिरकसपणा ते योग्य वेळी दाखवत असल्यामुळेच ते हेडलाईनचा विषय होतात.
LokSabha Election : साताऱ्यात उलथापालथ!; …तर उदयनराजे राष्ट्रवादीत जाणार?
महारोजगार मेळाव्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महायुती सरकारच्या शक्तिप्रदर्शनाचाच कार्यक्रम बारामतीत ठेवला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खुद्द अजित पवार हे सरकारचे तीन प्रमुख नेते बारामतीत आले. या निमित्ताने बारामती लोकसभा मतदारसंघातून प्रचाराचे बिगूलच वाजविण्यात येणार होते. अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. त्यावर या मेळाव्यात शिक्कामोर्तब करण्याचे राजकीय गणित या तीन नेत्यांनी आखले होते. पण त्याला शरद पवारांनी सुरूंग लावला. यासाठी पवारांनी पहिली करामत केली ती या तीन नेत्यांना आपल्या घरी भोजनाचे निमंत्रण देण्याची.
मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच बारामतीत या निमित्ताने येणार होते. पवार हे अध्यक्ष असलेल्या बारामती विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणातच हा कार्यक्रम झाला. पवार या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. पवारांनी या संस्थेचा अध्यक्ष म्हणून शिंदे, फडणवीस आणि अजितदादा या तिघांना तेथे संस्थेच्या आवारात चहापानाचे निमंत्रण दिले. कार्यक्रम झाल्यानंतर गोविंदबाग या आपल्या निवासस्थानी भोजनासाठी येण्याचा आग्रह धरला. यासाठीचे पत्र सोशल मिडियात व्हायरल केले. या निमंत्रणवारूनच मग बातम्या झळकल्या. नंतर फडणवीस यांंनी व्यस्ततेमुळे निमंत्रण स्वीकारणे शक्य नसल्याचे सांगितले. पण पहिला स्विंग बाॅल हा पवारांनी टाकला, हे नक्की.
‘आधी बारामती उरकतो मग पुणे..’ अजितदादांच्या धाकट्या चिरंजीवांनी मनावर घेतलं…
हे नेते भोजनास येणे शक्य नव्हते. याची कल्पना पवार यांना होती. पण ही संस्था आपली आहे, हे या निमित्ताने त्यांनी दाखवून दिले. तसेच शिंदे, फडणवीस आणि अजितदादांनाही एकाच वेळी निमंत्रण दिले. अजितदादा तर त्यांच्या घरचेच. तरीही खास निमंत्रण देत त्यांनी अजितदादा ओशाळतील, या अपेक्षेनेच हे निमंत्रण धाडले हे नक्की. समजा हे नेते गेले असते तरी मोठी बातमी झाली असती. त्याचेही क्रेडिट मग पवारांनाच गेले असते. फडणवीस यांच्या हे लक्षात आले. माध्यमांमधून या निमंत्रणाच्या बातम्या रंगल्या. माध्यमांनी या कार्यक्रमाला जोरदार प्रसिद्धी दिली, अशी कबुलीही आपल्या भाषणात त्यांनी दिली. यावरूनच पवारांचे इप्सित साध्य झाल्याचे दिसून येते.
पवार हे राज्यसभेचे खासदार आहेत. शासकीय कार्यक्रमांत राजशिष्टाचारानुसार त्यांचे नाव टाकणे अपेक्षित असते. पण आपले नाव टाकू नये, अशा सूचना त्यांनी या आधीच प्रशासनाला दिलेल्या होत्या. बारामतीतील या महारोजगार मेळाव्याच्या पत्रिकेत सुरूवातीला पवारांचे नाव नव्हते. पण नंतर ते प्रशासनाला टाकावे लागले. मग पवारांनाही या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित राहणे सहज शक्य झाले.
अजितदादांसाठी पवारांची घालमेल; नजर खिळवून ठेवली तरी दादांनी…
मेळाव्यात पवार आणि फडणवीस हे एकमेकांच्या शेजारीच बसले होते. अजितदादांनी या मेळाव्याला मोठी गर्दी जमवली होती. ती गर्दी अनपेक्षितपणे पवारांनाही उपलब्ध झाली. उपस्थित मान्यवरांचा या कार्यक्रमात सत्कार झाला. मुख्यमंत्री किंवा अजित पवार यांच्या सत्काराच्या वेळी फारशा घोषणा झाल्या नाहीत. पण पवारांच्या भाषणाच्या वेळी टाळ्या आणि घोषणा झाल्या. त्याचा उपयोग मग पवारांच्या राष्ट्रवादीने केला. बारामती ही पवारांचीच अशी टॅगलाईन वापरून या संदर्भातील व्हिडीओ मग व्हायरल केला. या कार्यक्रमातील सत्काराचाा असा राजकीय वापर पवारांच्या राष्ट्रवादीने करून घेतला.
पवारांनी या कार्यक्रमात भाषण करण्याची संधीही साधली. राजकारण न आणता त्यांनी आपले भाषण केले. तरूणांना रोजगार देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचे आपण स्वागतच करू, असे सांगून कार्यक्रमाचा टोन सेट केला. त्यामुळे इतर नेत्यांनीही राजकीय फटकेबाजी टाळली. खरे तर, सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची संधी या निमित्ताने अजितदादांना साधायची होती. पण पवारांनी अशा करामती केल्या की, कार्यक्रमाचा फोकस त्यांच्यावरच राहिला.