मुंबई : अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उद्या ८ जुलैला नाशिकच्या येवला इथून राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला नारळ फोडणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी माध्यमांना दिली. (Sharad Pawars state wide tour start from 8 july)
https://www.youtube.com/watch?v=T_PO8NAs7kE
अजित पवारांनी नऊ आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलचं तापलं आहे. अजित पवारांनी पक्षावर आणि चिन्हावरच दावा ठोकला. तर शरद पवारांनी काल दिल्लीत बैठक घेऊन सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचं निलंबन केलं. त्यानंतर लागलीच शरद पवार हे आता महाराष्ट्र दौरा करणार असल्याचं तपासे यांनी सांगितलं. ते म्हणाले की, राज्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला असून या वडीलरुपी नेत्याने महाराष्ट्राचा दौरा करावा हा आग्रह केला. त्यानुसार उद्या शनिवार दिनांक ८ जुलै रोजी नाशिक जिल्हयाचा दौरा जाहीर केला आहे. सकाळी ८ वाजता सिल्व्हर ओक या निवासस्थानावरुन शरद पवार निघतील. शरद पवार यांचे ठाणे, भिवंडी, पडगा, शहापूर, इगतपुरी यामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ठिकठिकाणी जोरदार स्वागत करणार असल्याचं तपासे यांनी सांगितलं.
‘ओरिजिनल गद्दारांना फोडणाऱ्यांनीच त्यांना किंमत दाखवली’; आदित्य ठाकरेंचा घणाघात!
राष्ट्रवादी काँग्रेस हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून त्याचे अध्यक्ष शरद पवार आहेत. पदावर नुसती नियुक्ती जाहीर करुन होत नसते तर त्यासाठी क्रियाशील सदस्यांची बैठक घ्यावी लागते. त्यामध्ये ठराव घ्यावा लागतो. त्यानंतरच प्रदेशाध्यक्ष पदाची निवड होते. प्रफुल्ल पटेल यांनी सुनील तटकरे यांची निवड केली, ती निवड त्यांनी स्वतः केली. ही निवड करण्यााठी क्रियाशील सदस्यांची बैठक झाली नसल्याचं तपासेंनी सांगितलं.
काल राष्ट्रवादी काँग्रेसची दिल्लीत वर्कींग कमिटीची बैठक झाली त्यामध्ये २४ प्रदेशाध्यक्षांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. तसा ठरावही झाला आहे. शिवाय, देशपातळीवर अनेक नेत्यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला आहे. स्वतः राहुल गांधी यांनी शरद पवार यांची भेट घेतली. आता बंगळुरूमध्ये होणार्या विरोधी पक्षांच्या बैठकीला पवार उपस्थित राहणार आहेत अशी माहितीही महेश तपासे यांनी दिली.
नियमबाह्य काय आहे हे जनतेला ठरवू द्यावं, त्यांनी सांगून काही होत नसते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आहेत. २४ राज्यामध्ये पक्षाचा विस्तार आहे. अनेक ठिकाणी निवडणूक लढवली आहे. महाराष्ट्रात काही आमदारांच्या सह्या घेऊन स्वतः ला राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करु शकत नाही. केरळमध्ये आमदार आहेत, तिथे सरकारमध्ये प्रतिनिधी आहेत. लक्षद्वीपमध्ये खासदार आहे. नागालँडमध्ये आमदार आहेत. या सर्वांनी शरद पवारच राष्ट्रीय अध्यक्ष अशी घोषणा केली व तसा ठरावही केला आहे असेही महेश तपासे म्हणाले.
दरम्यान, यावेळी तपासेंनी भाजपवरही निशाणा साधला. एकाच कुटुंबातील लोक एकत्र येत असतील तर आनंदच आहे. परंतु कुटुंब फोडण्याची परंपरा ही भाजपची आहे, हे सर्वांना चांगलेच माहीत आहे, असा टोला तपासे यांनी दोन ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवरून भाजपला लगावला.