केरळमध्ये मोठी राजकीय उलथापालथ; तब्बल चार दशकांपासूनचा डाव्या विचारांचा बालेकिल्ला भेदण्यात भाजपला यश

भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने पहिल्यांदाच तिरुवनंतपुरम महापालिकेवर निर्णायक विजय मिळवला.

  • Written By: Published:
Untitled Design (105)

BJP secures historic victory in Thiruvananthapuram, Kerala : केरळच्या राजकारणात शनिवारी एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक बदल घडला. भारतीय जनता पार्टीच्या(BJP) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने म्हणजेच एनडीएने(NDA) पहिल्यांदाच तिरुवनंतपुरम(Thiruvananthapuram) महापालिकेवर निर्णायक विजय मिळवत सत्तास्थापनेच्या दिशेने मोठी झेप घेतली. या निकालासोबतच सीपीआयच्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडीचे तब्बल 45 वर्षांचे वर्चस्व संपुष्टात आले आहे.

101 वॉर्डांच्या या महापालिकेत एनडीएने 50 जागांवर विजय मिळवला, तर सत्ताधारी एलडीएफला केवळ 29 जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसच्या(Congress) नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही(Democracy) आघाडीला (यूडीएफ) 19 जागा मिळाल्या, तर उर्वरित दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले. गेल्या साडेचार दशकांपासून डाव्या पक्षांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या केरळच्या राजधानीत भाजपाला मिळालेला हा विजय राज्याच्या राजकारणात मोठा संकेत देणारा मानला जात आहे.

Video : पवारांसोबतच्या बैठकीनंतर शिंदेंनी शाहंना खिशात टाकलं; प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल भाजपासाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आकडेवारी पाहिली तर तिरुवनंतपुरममध्ये भाजपाची ताकद गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढताना दिसते. 2010 मध्ये भाजपाकडे केवळ 6 नगरसेवक होते. 2015 मध्ये ही संख्या थेट 35 वर पोहोचली. 2020मध्ये थोडी घसरण होत 34 जागा मिळाल्या असल्या, तरी भाजपाचं मुख्य विरोधी पक्ष ठरला होता. यंदा मात्र 50 जागा जिंकत भाजपाने स्पष्ट बहुमताच्या दिशेने निर्णायक वाटचाल केली आहे.

हा पराभव काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या मतदारसंघातच झाल्याने यूडीएफसाठी तो अधिक चिंतेचा विषय ठरला आहे. राजधानीत काँग्रेसची पकड सैल होत असल्याचे या निकालातून स्पष्ट होते. या विजयाचे श्रेय मोठ्या प्रमाणावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांच्या रणनीतीला दिले जात आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून ही त्यांची पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होती. प्रचारादरम्यान त्यांनी ‘विकसित तिरुवनंतपुरम’ या संकल्पनेवर भर दिला. भाजपाने स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करून राजधानीच्या विकासाचा सविस्तर आराखडा मांडला होता.

‘पार्थ पवार कुकूलं बाळ नाहीत, त्यांनी फ्रॉड केलाय’; अंजली दमानिया यांचा अजित पवार यांच्यावर संताप

तसेच विजय मिळाल्यास 45 दिवसांच्या आत पंतप्रधान नरेंद्र मोदी तिरुवनंतपुरमसाठी विशेष विकास योजना जाहीर करतील, असे आश्वासनही देण्यात आले होते. निवडणुकीपूर्वी भाजपाला काही अंतर्गत अडचणींचा सामना करावा लागला. एका विद्यमान नगरसेवकाच्या आत्महत्येची घटना आणि तिकीट न मिळाल्याने एका आरएसएस कार्यकर्त्याने केलेली आत्महत्या यामुळे पक्ष अडचणीत सापडला होता. मात्र संघटनात्मक पातळीवर पक्षाने वेळेत हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यात यश मिळवले.

प्रचारादरम्यान भाजपाने एलडीएफच्या कार्यकाळातील कथित भ्रष्टाचाराचे मुद्दे ठळकपणे पुढे आणले. मागील महापालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप करत ‘भ्रष्टाचारमुक्त कारभार’ देण्याचे आश्वासन देण्यात आले. हिंदुत्वाच्या मुद्द्यांसोबतच विकास, पारदर्शक प्रशासन आणि शहरी सुविधा यांवर भर देत भाजपाने शहरी मतदारांना आकर्षित करण्यात यश मिळवले.एकूणच, तिरुवनंतपुरम महापालिकेतील हा निकाल केवळ स्थानिक राजकारणापुरता मर्यादित न राहता केरळच्या आगामी राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम करणारा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

follow us