Download App

Shirur Loksabha : आढळरावांकडे पाच तगडे आमदार… कोल्हेंचे काय होणार?

  • Written By: Last Updated:

Shirur Lok Sabha Constituency लोकसभेच्या शिरूर मतदारसंघात नेता विरुद्ध अभिनेता अशी लढत महाराष्ट्राला माहिती झाली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil)  विरुद्ध शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यातील सामना आता रंगतदार परिस्थितीत आला आहे. आढळराव यांनी ठरलेल्या रणनीतीनुसार शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला. ज्या घड्याळाविरुद्ध त्यांनी वीस वर्षे लढा दिला त्याच चिन्हावर ते आता रिंगणात आहेत. टायमिंग साधण्याचे कौशल्य अभिनयात आणि राजकारणातही आवश्यक असते. आढळरावांचे आतापर्यंतचे राजकीय टायमिंग अचूक ठरले आहे. त्यानुसारच शरद पवार यांचा अभेद्य गड असलेल्या पुणे जिल्ह्यात ते हिमतीने सलग तीन निवडणुकांत विजयी झाले. याला अपवाद ठऱला २०१९ च्या निवडणुकीचा. देशात तेव्हा जोरदार मोदी लाट असतानाही आढळराव हे साठ हजारांच्या फरकाने अमोल कोल्हेंकडून पराभूत झाले. जिव्हारी लागलेल्या या पराभवाची परतफेड करण्यासाठीच त्यांनी आता राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. (Lok Sabha Election 2024)

अजित पवारांना कशामुळे विश्वास?

कागदावरचे चित्र पाहिले तर आढळराव यांच्यासाठी अनुकूल परिस्थितीच दिसत आहे. या मतदारसंघातील पाच आमदार त्यांच्यासोबत आहेत. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसे अशा चार पक्षांची ताकद पाठीशी असल्यावर भीती कशाची? अशीच त्यांची भावना असेल. याशिवाय त्यांच्यासोबत असलेले पाचही आमदार तगडे आहेत. या आमदारांचा बूथ लेवलपर्यंत संपर्क आहे. इतकी अनुकूल परिस्थिती आढळराव यांना या आधी कोणत्याच निवडणुकीत नव्हती. या साऱ्या जोरावरच उपमुख्यमंत्री अजित पवार हे अमोल कोल्हेंना पराभूत करण्याचा विश्वास व्यक् करतात.

महायुतीच्या मंत्र्यांना वाढीव काम, तगड्या प्रचारासाठी समिती गठीत

आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील, जुन्नरचे अतुल बेनके, खेडचे दिलीप मोहिते, हडपसरचे चेतन तुपे हे राष्ट्रवादीचे चार आमदार आढळरावांच्या प्रचारात आहेत. याशिवाय भोसरीतून भाजपचे महेश लांडगे यांचीही त्यांना साथ आहे. फक्त शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोक पवार हे शरद पवार गटात असल्याने ते कोल्हे यांच्या प्रचारात आहेत. याशिवाय जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, हडपसपचे माजी आमदार योगेश टिळेकर हे तीन माजी आमदारही आढळराव यांच्यासाठी जिवाचे रान करत आहेत. त्यामुळे सारे बडे नेते हे महायुतीसोबतच असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे कोल्हे यांच्यासोबत शिरूरचे  अशोक पवार हेच विद्यमान आमदार सोबत आहेत. हडपसरमधील काॅंग्रेसचे बाळासाहेब शिवरकर आणि शिवसेनेचे महादेव बाबर हे दोन माजी आमदारही कोल्हेंसाठी मदतीला उतरले आहेत.

आंबेगाव मतदारसंघ ठरणार बूस्टर

यातील सगळ्यात महत्वाचे नाव म्हणजे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील. आढळराव आणि वळसे पाटील हे दोघेही आंबेगाव या विधानसभा मतदारसंघातील आहेत. आढळराव यांना विरोध करण्याची मुख्य जबाबदारी या आधी वळसे पाटील यांच्यावरच असायची. तेच रणनीती ठरवायचे. तेच आढळरावांच्या विरोधात उमेदवार शोधायचे. त्यासाठीचा आर्थिक वाटा देखील उचलायचे. वळसे पाटील यांच्या डावपेचाला लोकसभा निवडणुकीत आढळराव पुरून उरायचे. २००९ आणि २०१४ या दोन्ही निवडणुकांत आढळराव यांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून सुमारे साठ हजारांचे मताधिक्य घेतले. फक्त अमोल कोल्हे यांच्यासोबत झालेल्या निवडणुकीत आढळराव हे वीस हजाराने आंबेगावमधून पिछाडीवर राहिले. लोकसभेतील प्रत्येक पराभवाचे उट्टे वळसे पाटील सहा महिन्यानंतरच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काढायचे. विधानसभा निवडणुकीत स्वतः वळसे पाटील हे उमेदवार असतात. आढळराव यांच्या पाठिंब्यावर नशीब अजमावत असलेल्या चार शिवसेना उमेदवारांचा त्यांनी तोडीस तोड पराभव केला. खुद्द आढळराव यांच्या पत्नी कल्पना यांचा २००९ च्या विधानसभा निवडणुकीत तीस हजार मतांनी वळसे पाटलांनी पराभूत केले. त्यामुळे वळसे पाटील यांची ताकद किती आहे, याची कल्पना येते.

हे इतके सविस्तर सांगण्याचे कारण म्हणजे आंबेगाव मतदारसंघ हा आढळरावांसाठी महत्वाचा ठरणार आहे. येथे शिवसेनेचा प्रमुख चेहरा आढळराव हेच होते. तेच आता राष्ट्रवादीत गेले आहेत. येथे राष्ट्रवादीची ताकद ही वळसे पाटील यांच्याभोवतीच केंद्रीत झाली आहे. त्यामुळे या दोघांचे एकत्र येणे, एकाच पक्षात असणे यासारखे सुख आढळरावंना नाही. आंबेगावातील हीच समीकरणे कोल्हेंसाठी अडचणीची ठरू शकतात.

जुन्नरमध्ये कोल्हेंसोबत बडे नेते नाहीत…

जुन्नरमधून आढळराव यांना गेल्या निवडणुकीत तब्बल ४० हजार मतांनी पिछाडीवर राहावे लागले होते. जुन्नर हा अमोल कोल्हे यांचा घरचा मतदारसंघ. त्यांच्या प्रचारात तेव्हा अतुल बेनके यांची महत्वाची भूमिका होती. आता तेच कोल्हे यांच्याविरोधात असल्याने आढळराव यांचे मोठे टेन्शन गेले आहे. शिवसेनेची येथे मोठी ताकद आहे. येथील शिवसेनेचे नेतृत्व शरद सोनवणे यांच्याकडे आहे. याशिवाय २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सुमारे साठ हजार मते घेणाऱ्या आशा बुचके यादेखील भाजपमध्ये आहेत. घरचा मतदारसंघ असल्याने कोल्हे यांना येथून मोठे मताधिक्य मिळण्याची अपेक्षा आहे. पण त्यांच्यामागे स्थानिक बड्या नेत्यांचे पाठबळ नाही. ही उणीव भरून काढणे हे त्यांच्यापुढचे आव्हान आहे.

नकली शिवसेना, राष्ट्रवादी महाराष्ट्राचे भले करतील का? अमित शाहांचा ठाकरे, पवारांवर हल्लाबोल

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील आमदार दिलीप मोहिते यांची सुरवातीला आढळराव यांच्याविषयी नाराजी होती. त्यांच्या विरोधामुळेच आढळराव यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश लांबणीवर पडला होता. आता आढळरावांच्या तेथील प्रचाराची सारी सूत्रे मोहिते यांच्याच हातात आहेत. याशिवाय शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार सुरेश गोरे यांना मानणारे कार्यकर्तेही आढळरावांच्या सध्या तरी साथीला उतरले आहेत. पण मोहिते यांच्याविरोधात निवडणूल लढविलेले भाजपचे नेते अतुल देशमुख यांन पक्षाचा त्याग केला. ते आता शरद पवार यांच्या गटात गेले आहेत. त्याचा मोठा लाभ कोल्हे यांना होऊ शकतो. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अतुल देशमुख यांनी अपक्ष निवडणूक लढवत सुमारे साठ हजार मते घेतली होती. देशमुख यांची कोल्हेंना मदत आढळरावांसाठी डोकेदुखी ठरू शकते.

दोन शहरी मतदारसंघ महायुतीसोबत जाणार का?

भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी भोसरी हा भाजपचा बालेकिल्ला बनवला आहे. य शहरी मतदारसंघाने आढळराव हे शिवसेनेत असताना सातत्याने तीनही लोकसभा निवडणुकीत मताधिक्य दिले. अमोल कोल्हे हे २०१९ च्या निवडणुकीत सुमारे ३५ हजाराने येथून पिछाडीवर होते. येथील भाजपची ताकद आढळरावांकडे आहे. याशिवाय राष्ट्रवादीचीही येथे तोडीस तोड तयारी असल्याने हा मतदारसंघ आढळरावांसाठी सध्या सोयीचा आहे. हडपसर हा दुसरा पूर्ण शहरी मतदारसंघाने या आधी आढळरावांना साथ दिली. पण येथे कोल्हे यांना मानणारा वर्गही मोठा आहे. माळी समाजाचे येथे मोठे मतदान आहे. त्यामुळे समाज कोल्हे यांच्या पाठीशी राहू शकतो. या मतदासंघात आढळराव यांच्यासाठी प्रतिकूल परिस्थिती दिसून येत आहे.

संपूर्ण लोकसभा मतदारसंघात कोल्हे यांच्यासाठी आमदार  म्हणून अशोक पवार  हेच शिरूर विधानसभा मतदारसंघात एकाकीपणे लढत आहेत. त्यामुळे पवार यांची साथ कोल्हे यांच्यासाठी महत्वपूर्ण आहे. त्यामुळे येथून मताधिक्य घेण्याचे कोल्हे यांचे नियोजन आहे.

दोन्ही उमेदवारांची प्रतिमा चर्चेत

कोल्हे हे अकार्यक्षम खासदार म्हणून आढळराव टीका करतात तर दुसरीकडे आढळराव आतापर्यंत अपयशी ठरलेले खासदार म्हणून कोल्हे त्यांना उत्तर देतात. मोदी सरकारची कामगिरी, राज्य सरकारचे प्रगतिपुस्तक आदी राष्ट्रीय आणि राज्याचे मुद्दे या मतदारसंघात चर्चेत आहेतच. पण या दोन उमेदवारांचे व्यक्तिमत्वही मतदारांसाठी महत्वाचे ठरणार आहे. सदासर्वकाळ उपलब्ध असणारा खासदार म्हणून आढळराव म्हणून आपली ओळख सांगत आहेत. तर विकासासाठी काम करणारा म्हणून अमोल कोल्हे बाजू मांडत आहेत. त्यामुळे या पैकी कोणाची प्रतिमा मतदारांच्या पसंतीस उतरणार याची उत्सुकता आहे. पण कागदावरची समीकरणे आढळरावांना सुखावणारी आहेत. पण निवडणुकीत कागदावरील समीकरणे नेहमीच यशस्वी होतात का, याचे उत्तर ४ जूनला मिळेल.

 

 

 

follow us