मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि बंडखोर आमदारांना चोरमंडळ म्हटल्याप्रकरणी आलेली हक्कभंगाची कारवाई अद्याप प्रलंबित असतानाच शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात हक्कभंगाची आणखी एक नोटीस दिली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आणि हेतुआरोप केल्याबद्दल भाजप आमदार नितेश राणे यांनी ही नोटीस दिली आहे. राऊत यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याविरोधातही राणे यांनी हक्कभंगाची नोटीस दिली आहे. (Shiv Sena MP Sanjay Raut and MLA Ambadas Danve have been served a notice of infringement by Nitesh Rane)
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. त्यानंतर अध्यक्षांनी अद्यापपर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी निर्देश द्यावेत अशी मागणी करत शिवसेना (UBT) आमदार सुनील प्रभू यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर 18 सप्टेंबर रोजी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते.
मात्र अध्यक्ष हा निर्णय लवकर घेत नसल्याचे म्हणत संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर हेतुआरोप केले आणि संवैधानिक पदाचा अपमान केला असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. यामुळे हे प्रकरण लवकरात लवकर विशेषाधिकार समितीकडे द्यावे आणि त्यांना विनाविलंब त्यावर निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंतीही राणे यांनी विधानसभा अध्यक्षांना केली आहे.
संजय राऊत, राज्यसभा सदस्य, यांनी नजीकच्या काळात मा. विधानसभा अध्यक्ष यांच्या संदर्भात पुढील वक्तव्ये केली. १. “संविधान, कायदा व विधीमंडळाशी बेईमानी करुन वेळकाढूपणा चाललाय. घटनात्मक पदावर बसलेले विधानसभा अध्यक्ष घटनाबाह्य सरकारला चालवित आहेत काय?’ ” २. “आम्ही करु ते खरं अशी बादशाही विधानसभा अध्यक्ष करीत असतील तर ती बादशाही बुडाल्याशिवाया राहणार नाही.” ३. “ विधानसभा अध्यक्ष फुटले आहेत.”
श्री. अंबादास दानवे वि. प.स., विरोधीपक्ष नेता, विधान परिषद यांनी मा. विधानसभा अध्यक्षांच्या संदर्भात पुढील प्रमाणे वक्तव्य केले. “उशीरा न्याय देणे हा सुध्दा अन्याय असतो आणि तो अन्याय विधानसभा अध्यक्ष करीत आहेत. ” मा. अध्यक्ष, विधानसभा यांच्या समोर सद्या पक्षांतरबंदी विषयी एका प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. या प्रकरणामध्ये उपरोक्त दोन्ही व्यक्तिंचे राजकीय हितसंबंध आहेत.
या पार्श्वभुमीवर नमुद वक्तव्ये करुन त्यांनी मा. विधानसभा अध्यक्षांवर अनुचित दबाव व प्रभाव टाकण्याची कृती केली असून त्याद्वारे मा. विधानसभा अध्यक्षांच्या व पर्यायाने विधानसभेचा अधिक्षेप केला आहे. यांचे अशा प्रकारचे स्फोटक भाष्य केल्यामुळे अध्यक्षांवर एक प्रकारे दबाव टाकण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे, यामुळे लोकशाहीच्या हितासाठी या प्रवृत्तीला मुळासकट आळा घालण्यासाठी त्यांच्या बोलण्यावर तात्काळ बंदी आणणे अत्यंत गरजेचे आहे, त्या अनुसार कारवाई करावी अशी मागणी करतो. वर नमुद वस्तुस्थिती पहाता सर्वश्री संजय राऊत व अंबादास दानवे यांच्या विरुध्द योग्य ती कारवाई करण्यासाठी हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे तात्काळ सुपूर्द करावे व ह्यावर विनाविलंब निर्णय घ्यावा असे निर्देश देण्यात यावे. ही विनंती, असे राणे म्हणाले.