Download App

मेहकरच्या मैदानात रायमुलकरांना कडवं आव्हान; ठाकरे-तुपकर डाव पलटवणार?

मेहकर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे संजय रायमुलकर विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिद्धार्थ खरात यांच्यात लढत होणार?

14 फेब्रुवारी 1989 रोजी बुलढाण्यातील मेहकरमध्ये दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची एक सभा पार पडली. या सभेनंतर प्रतापराव गोविंदराव जाधव यांनी शिवसेनेचे (Shivsena) काम सुरु केले. 1990 च्या निवडणुकीत जाधव यांचा पराभव झाला. पण त्यांनी मतदारसंघात काम सुरु ठेवले. 1995 च्या निवडणुकीत प्रतापराव जाधव (Pratap Jadhav) यांनी विजय मिळविला आणि मेहकर मतदारसंघावर (Mehakar Assembly Constituency) भगवा फडकला तो आजपर्यंत फडकतच आहे. काँग्रेसला (Congress) नमवत शिवसेनेने आपले वर्चस्व तयार केले आहे.

यंदा मात्र या विधानसभा मतदारसंघातील लढत दोन्ही शिवसेनेतच होणार आहे. इथले विद्यमान आमदार संजय रायमुलकर एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्याचे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यापुढे आहे. तर मतदारसंघ आपल्याकडेच ठेवण्याचा रायमुलकर यांचा प्रयत्न असणार आहे. आता यात कोण यशस्वी होणार? आणि कोणाचे वर्चस्व दिसून येणार? काय घडतयं मेहकर विधानसभा मतदारसंघात? (Shiv Sena’s Sanjay Raimulkar vs Shiv Sena’s Uddhav Balasaheb Thackeray’s Siddharth Kharat will fight in Mehkar assembly constituency)

पाहुया लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या स्पेशल निवडणुकीत…

1990 पर्यंत मेहकर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आण्णासाहेब देशमुख, सीताराम लोढे, सुबोध सावजी, किसनराव सांगळे हे काँग्रेसच्या विचारांचे आमदार निवडून येत होते. पण 1989 मध्ये दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या झालेल्या एका सभेने या मतदारसंघाचे राजकारणच बदलले. याच सभेनंतर प्रतापराव जाधव यांनी शिवसेनेचे काम सुरु केले. तत्कालीन शिवसेना जिल्हा प्रमुख दिलीपराव रहाटे यांच्या खांद्याला खांदा लावून ते संघटना वाढवत होते. अशात दिलीप रहाटे यांचे अकाली निधन झाले आणि सेनेची धुरा जाधव यांच्या खांद्यावर आली.

मात्र पहिल्याच लढतीत प्रताप जाधव यांचा पराभव झाला. मात्र हिंमत न हारता जाधव यांनी जिद्दीने काम सुरू ठेवले. मेहकर अर्बन बँका निवडणुकीत ते विजयी झाले. 1992 मध्ये देऊळगाव माळी जिल्हा परिषद मतदारसंघातून विजय मिळविला. मेहकर बाजार समितीचे सभापती झाले. 1995 मध्ये जाधव यांनी मेहकरचे मैदान मारले. तिथपासून त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.

Ground Zero : बांगरांच्या आमदारकीवर नांगर फिरणार? ठाकरेंकडे चार तगडे पर्याय

1997 मध्ये युती सरकारमध्ये प्रताप जाधव क्रीडा राज्यमंत्री अन् 1998 मध्ये पाटबंधारे राज्यमंत्री झाले. नंतर 1999 आणि 2004 च्या विधानसभेत ते मेहकर मधून विजयी झाले. मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांवरही भगवा फडकतच होता. अशात 2009 मध्ये मेहकर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. पण बुलढाणा लोकसभा मतदारसंघ खुला झाला. यामुळे जाधव यांनी 2009 मध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढली आणि जिंकली देखील.

तर मेहकरचा बालेकिल्ला जाधव यांनी विश्वासू संजय रायमुलकर यांच्याकडे सोपविला. रायमुलकर यांनीही मागच्या तीन निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला आहे. अगदी 2014 मध्ये सर्वच पक्ष स्वतंत्र लढून देखील शिवसेनेचे मताधिक्य 40 हजारांच्या घरात होते. तर गत विधानसभा निवडणुकीत मेहकर मतदारसंघात संजय रायमुलकर यांनी काँग्रेसच्या अनंत वानखेडे यांचा 62 हजारांनी पराभव केला. या निवडणुकीत संजय रायमुलकर यांना 1 लाख 12 हजार 038 मते पडली होती. तर दुसऱ्या क्रमांकावरील अनंत वानखेडे यांना 49 हजार 836 मते मिळाली होती.

या मतदारसंघात यंदा चुरशीची लढत बघायला मिळेल, असे संकेत आहेत. सलग तीनवेळा निवडून आलेल्या रायमूलकरांना चौथ्यांदा मात्र चुरशीच्या लढतीला सामोरे जावे लागणार असल्याचे दिसून येते. कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मेहकरवर एकहाती वर्चस्व गाजवणाऱ्या प्रतापराव जाधव आणि संजय रायमुलकर यांना जोरदार धक्का बसला. प्रतापराव जाधव यांना केवळ 243 मतांची आघाडी मिळाली. तिथे अपक्ष रविकांत तुपकर यांनी जाधव यांना कडवी झुंज दिली. आता विधानसभेला रायमुलकर यांच्याविरुद्ध तीन उमेदवारांनी शड्डू ठोकला आहे.

सत्तारांची नजर चौथ्या विजयावर; पण दानवेंच्या डोक्यात वेगळंच प्लॅनिंग

यात पहिले नाव आहे सिद्धार्थ खरात यांचे. स्वेच्छानिवृत्ती घेत मंत्रालयीन सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी नुकताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे. खरात यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण, ग्रामविकास आणि गृह विभागांमध्ये सहसचिव म्हणून काम केले आहे. याशिवाय राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे. खरात यांचे जनमत किती आहे, याबाबत अद्याप अंदाज येत नसला तरीही जातीच्या चौकटीत त्यांची प्रतिमा फिट बसणारी आहे.

दुसरे चर्चेतील नाव आहे ते प्रकाश डोंगरे यांचे. प्रकाश डोंगरे 2014 पासून युवा सेनेचे सक्रिय काम करत आहेत. मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील रहिवासी आहेत. मुंबईत अग्निशामक दलात सेवा करत असताना महानगरपालिकेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांच्यासोबत त्यांची ओळख झाली. उठबस वाढली आणि ते गावाकडे येऊन शिवसेनेचे काम करु लागले. पक्षाचे मेळावे ,बैठका, मोर्चे, आंदोलन, उपोषण अशा विविध माध्यमातून ते सक्रिय आहेत.

मेहकरमधील तिसरे चर्चेतील नाव आहे ते भैय्यासाहेब पाटील यांचे.  भैय्यासाहेब पाटील गत 20 वर्षांपासून रुग्णसेवा करत आहेत. श्री गजानन महाराज रुग्णसेवा समितीच्या माध्यमातून मेहकर मतदारसंघात नागरिकांना सेवा देत आहेत. त्यांनी यंदा निवडणूक लढणारच असल्याची घोषणा केली आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी लोकसभा निवडणुकीला इथे कडवी झुंझ देत प्रताप जाधव आणि संजय रायमुलकर यांना घाम फोडला होता. त्यामुळे रविकांत तुपकर यांच्या भूमिकेकडेही सर्वांचेच लक्ष लागले आहे.

follow us