सत्तारांची नजर चौथ्या विजयावर … पण दानवेंच्या डोक्यात वेगळंच प्लॅनिंग

  • Written By: Published:
सत्तारांची नजर चौथ्या विजयावर … पण दानवेंच्या डोक्यात वेगळंच प्लॅनिंग

2019 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला होता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून शिवसेनेचे (Shivsena) अब्दुल सत्तार (Abdul Sattar) 24 हजार मतांनी निवडून आले होते. पण तरीही सत्तारांच्या डोक्यात राग होता. हा राग होता जालन्याचे तत्कालिन खासदार रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांचा.  लोकसभा निवडणुकीत (lok Sabha Election) युतीधर्म म्हणून आपण जालना लोकसभा मतदार संघात रावसाहेब दानवे यांचा प्रचार केला. शिवाय आपल्या सिल्लोड मतदार संघातूनही मताधिक्य दिले. पण त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत दानवे यांनी आपल्याविरोधात काम केले असा दावा सत्तार यांचा होता.

हाच संताप त्यांच्या डोक्यात धुमसत होता. त्यातून सत्तार यांनी एक शपथ घेतली. जोपर्यंत रावसाहेब दानवे यांचा पराभव करणार नाही तोपर्यंत डोक्यावरची टोपी  काढणार नाही. यंदाच्या लोकसभेला दानवे यांचा पराभव झाला. सिल्लोड मतदारसंघातून 2019 मध्ये दानवे यांना 80 हजारांचे लीड होते. पण यंदा कल्याणराव काळे यांना 27 हजार मतांची आघाडी मिळाली. यात दानवे यांचा पराभव आपल्याच कार्यकर्त्यांनी केला असे म्हणत सत्तार यांनी आपली खदखद बाहेर काढली. यावरुन दानवे आणि सत्तार यांच्यात जोरदार जुंपली होती. त्यातून महायुतीमधील भाजप व शिंदे गटाचे नेत्यांमध्ये किती ‘गोडवा’ आहे हे दिसून आला होता.

आता याच पराभवाचा वचपा विधानसभेला काढण्यासाठी दानवेंनीही बाह्या सरसावल्या आहेत. त्यामुळे यंदा त्यांना भाजपची साथ मिळणार नसल्याचे बोलले जाते. त्यातूनच विधानसभेला सत्तार यांची वाट किती बिकट झाल्याची चर्चा आहे. पण सत्तार खरंच पराभूत होऊ शकतात का? की मुस्लिम व्होट बँकेचा आधार घेत सत्तार पुन्हा बाजी मारणार? (Who will contest against Shiv Sena’s Abdul Sattar in Sillod Assembly Constituency from BJP)

पाहुया लेट्सअप मराठीच्या ग्राउंड झिरो या स्पेशल सिरीजमधून…

सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघ हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सगळ्यात चर्चेत असणारा मतदारसंघ. परंतु लोकसभेला हा मतदारसंघ जालन्याला जोडलेला आहे. संपूर्ण सिल्लोड तालुका आणि सोयगाव तालुक्यातील सोयगाव महसूल मंडळ असा मतदारसंघ 2008 च्या पुर्नरचनेत अस्तित्वात आला. तसे या मतदारसंघावर काँग्रेस आणि भाजपचे आमदार राहिले आहेत. गेल्या विधानसभेला अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसची साथ सोडली आणि ते शिवसेनेत प्रवेश करत निवडूनही आले.

जुन्या सिल्लोड मतदारसंघाचा विचार केल्यास या मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा फडकत होता. बाबुराव जंगुळे, शिवराम मानकर यांनी सुरवातीलाच या मतदारसंघावर काँग्रेसची पकड मजबुत केली होती. पुढे जनता पक्षाच्या नामेदव गाडेकर यांनी 1978 मध्ये विजय मिळवत पहिल्यांदा काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का दिला. 1980 मध्ये औरंगाबादचे खासदार राहिलेल्या माणिकराव पालोदकर यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणला. माणिकराव पालोदकर हे सलग तीनवेळा येथून निवडून आले. ते वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात राज्य सहकार मंत्री होते.

सुहास बाबर यांना स्व‍कीयांचाच धोका… पडळकर-पाटलांची जोडीच करणार कार्यक्रम?

1995 मध्ये भाजपने किसनराव काळे यांनी मैदानात उतरविले. त्यांनी तीन टर्म आमदार राहिलेल्या पालोदकर यांना धक्का देत पहिल्यांदाच येथे कमळ फुलविले. 1999 मध्ये ही किसनराव काळे सलग दुसऱ्यांदा आमदार झाले. पालोदकर यांना पराभूत झाल्यानंतर काँग्रेसने दोनदा राज्यसभेवर पाठविले होते. 2004 ला भाजप आणि काँग्रेसने उमेदवार बदलेले. माणिकराव पालोदकर यांच्या बोटाला धरून राजकारण आलेल्या अब्दुल सत्तार यांना काँग्रेसने तिकीट दिले. तर भाजपने सांडू पाटील लोखंडे यांना मैदानात उतरविले होते. मराठवाड्यात सत्तार यांच्या रुपाने काँग्रेसला एक अल्पसंख्यांक चेहरा मिळाला होता. या दोघांमध्ये चुरसीची लढत झाली. त्यात सांडू पाटील हे अवघ्या 301 मतांने निवडून आले होते. पाटील यांना 54 हजार 290 मते मिळाली होती. तर अब्दुल सत्तार यांनी 53 हजार 989 मते घेतली. अवघ्या 301 मतांनी सत्तार पराभूत झाले.

पण हे खचले नाहीत. सिल्लोड नगरपालिकेच्या रुपाने त्यांचे राजकारण सुरूच होते. 2009 मध्ये पुन्हा काँग्रेसने अब्दुल सत्तार यांच्यावर विश्वास दाखवत तिकीट दिले. त्यात त्यांनी भाजपचे सुरेश बनकर यांना तब्बल 27 हजार मतांनी धूळ चारली. सत्तार यांना 98 हजार 131 मते होती. तर बनकर यांना 71 हजार 378 मते होती. तिथून सिल्लोड मतदारसंघावर सत्तार यांचे वर्चस्वच तयार झाले. सिल्लोडची नगरपालिका, पंचायत समिती, बाजार समिती सगळे सत्तार यांच्याच गटाकडे आले. त्यांनी मतदारसंघावर घट्ट पकड तयार केली. कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांची फळीच उभी केली. 2014 मध्ये ही अब्दुल सत्तार यांनी भाजपच्या सुरेश बनकर यांचा पुन्हा पराभव केला. सत्तारांना 96 हजार मते होती. तर बनकर यांना 82 हजार मते होती. तेव्हा शिवसेनेने सुनील मिरकरांना तिकीट दिले होते. त्यांना अवधी 15 हजार 909 मते मिळाली होती.

विधानसभेला मुनगंटीवारांना हलक्यात घेणं ‘काँग्रेसला’ जड जाऊ शकतं…

2019 मध्ये विधानसभेच्या तोंडावर राधाकृष्ण विखे यांनी भाजपची वाट धरली. विखेंशी सख्य असलेल्या सत्तार यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. ते उद्धव ठाकरेंकडे गेले आणि धनुष्यबाण हाती घेतला. सत्तार यांना शिवसेनेने विधानसभेचे तिकीट दिले. महायुतीचे उमेदवार असलेले सत्तार हे तब्बल एक लाख 23 हजार 383 मते घेत विजयी झाले. तर माजी मंत्री माणिकराव पालोदकर यांचा मुलगा प्रभाकर हे अपक्ष म्हणून मैदानात उतरले. त्यांना 99 हजार 02 मते घेतली होती. त्यावेळी प्रभाकर पोलादकर यांना रावसाहेब दानवे यांनी मदत केल्याची चर्चा होती. त्यातून सत्तार यांच्या डोक्यात दानवे यांच्याबद्दल राग बसला तो बसलाच. त्यातून त्यांनी टोपी न काढण्याची शपथ घेतली.

मागच्या पाच वर्षात राजकारणाने कुस बदलली. शिवसेना फुटल्यानंतर सत्तार हे एकनाथ शिंदेंबरोबर गेले. सत्तार यांना शिंदेंनी भरभरून दिले. मंत्रिपदासोबतच हिंगोलीचे पालकमंत्रीपद बहाल केले. संदिपान भुमरे हे खासदार झाल्यानंतर त्यांचे संभाजीनगरचे पालकमंत्रीपदही सत्तार यांच्याकडे आले. दुसऱ्या बाजूला यंदा दानवे यांना पराभूत करत ही शपथ सत्तार यांनी पूर्णही केली आहे. त्यामुळे महायुतीमधील दुफळी उघडकीस आली. आता विधानसभेला ‘ज्याचा आमदार त्याची जागा’ या सुत्रानुसार जागा वाटपात महायुतीमध्ये हा मतदारसंघात शिवसेनेला जाईल आणि सत्तार हेच उमेदवार असणार हे नक्की. पण दानवेही शांत बसतील असे नाही. त्यांनी सत्तार यांचा पराभव करण्यासाठी फिल्डिंग लावली असल्याची माहिती आहे.

महाविकास आघाडीकडून ठाकरे गट आणि काँग्रेस दोघांमध्ये जागीसाठी रस्सीखेच आहे. काँग्रेसकडून इच्छुकांची संख्याही जास्त असली तरी ताकदवार नेता नाही. परंतु लोकसभेला या मतदारसंघाने काँग्रेसच्या उमेदवाराला भरभरून मते दिले आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या जास्त आहे. तालुकाध्यक्ष भास्कर पाटील घायवट, जिल्हा उपाध्यक्ष कैसर आझाद हे तिकीट मागत आहेत. ठाकरे गटाकडून सुनील मिरकर हे तिकीट मागत आहे. ते भाजपचे माजी नगरसेवक आहेत. भाजपचे माजी आमदार सांडू पाटील लोखंडे यांना महाविकास आघाडीत घेऊन त्यांना उमेदवार दिला जाऊ शकतो.

याशिवाय दोन तगडे अपक्ष मैदानात उतरू शकतात. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकर पालोदकर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुरेश बनकर हे अपक्ष निवडणूक लढू शकतात. या दोघांपैकी एकाला अपक्ष रिंगणात उतरून दानवे त्यांना आशीर्वाद देऊ शकतात. या मतदारसंघात 60 हजारांहून मुस्लिम मतदार आहेत. त्यामुळे एमआयएमने उमेदवार उतरविल्यास येथील चित्र बदलू शकते. आता या सगळ्या राजकारणात दानवे यशस्वी होणार का? तिरंगी, चौरंगी लढत झाल्यास याचा सत्तार यांना फायदा होणार की तोटा होणार? की मतदारसंघावर असलेली घट्ट पकड, मुस्लीम समाजाचे एक गठ्ठा मतदान आणि कार्यकर्त्यांची फळी या आधारावर सत्तार सत्तार चौथ्यांदा आमदार होणार? या गोष्टी पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube