विधानसभेला मुनगंटीवारांना हलक्यात घेणं ‘काँग्रेसला’ जड जाऊ शकतं…

विधानसभेला मुनगंटीवारांना हलक्यात घेणं ‘काँग्रेसला’ जड जाऊ शकतं…

लोकसभेला दारुण पराभव झालेल्या सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांचा विधानसभेलाही पराभव होणार का? असा सवाल सध्या चंद्रपूरमध्ये विचारला जातो. याचे कारण बल्लारपूर मतदारसंघातून काँग्रेसकडून (Congress) निवडणूक लढण्यासाठी तयारी केलेले इच्छुक. आजच्या दिवसापर्यंत काँग्रेसकडे 22 इच्छुकांनी आपली नावे दिली आहेत. शिवाय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या पक्षांकडूनही इच्छुकांनी जोरदार तयारी सुरु आहे.

यंदा लोकसभेला स्वत: मुनगंटीवार उमेदवार होते. त्यानंतरही त्यांच्या बल्लारपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना 48 हजारांचे मताधिक्य आहे. त्यामुळे एकेकाळी उमेदवार शोधावा लागण्याऱ्या मतदारसंघात काँग्रेसचा आत्मविश्वास कमालीचा दुणावला आहे. त्याचाच हा परिणाम असल्याचे बोलले जाते. आता विधानसभेला काय होणार? लोकसभेची पुनरावृत्ती होणार की? मुनगंटीवार पुन्हा आमदार होणार? काय आहे बल्लारपूर मतदारसंघातील स्थिती? (Applications of 22 aspirants from Congress against BJP’s Sudhir Mungantiwar in Ballarpur Assembly Constituency?)

पाहुया लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये…

बल्लारपूर हा 2009 साली मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर नव्याने अस्तित्वात आलेला मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघाला फारसा मोठा इतिहास नाही. पण या मतदारसंघाच्या जन्मामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शोभाताई फडणवीस यांचे नेतृत्व अस्ताला गेले आणि सुधीर मुनगंटीवार यांचे नेतृत्व आणखी झळाळून निघाले. 1990 ते 2004 पर्यंत शोभाताई फडणवीस सावली मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत होत्या. पण 2009 च्या पुनर्रचनेत हा मतदारसंघाच गायब झाला. ब्रह्मपुरी आणि नव्याने तयार झालेल्या बल्लारपूर या दोन्ही मतदारसंघात ‘सावली’ मतदारसंघ विलीन करण्यात आला.

त्याचवेळी मुनगंटीवार 1995 पासून निवडून येत होते तो चंद्रपूर मतदारसंघही राखीव झाला. त्यामुळे शोभाताई फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार या दोन्ही नेत्यांची राजकीय अडचण झाली. त्यातून मोठा वादही उभा राहिला. चंद्रपूर मतदारसंघाचा काही भाग बल्लारपूरला जोडल्याने सुधीर मुनगंटीवार यांनी या मतदारसंघावर दावा केला. तर सावली मतदारसंघाचा बराच भाग या मतदारसंघात आल्याने शोभाताई फडणवीस यांनीही बल्लारपूरवर दावा केला. त्यावेळी नितीन गडकरी यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या बाजूने कौल दिला. तर शोभाताई यांना विधान परिषदेचा शब्द देण्यात आला.

औरंगाबाद पूर्व : MIM पुन्हा मदतीला येणार; ‘अतुल सावे’ तिसऱ्यांदा गुलाल उधळणार?

भाजप आणि मुनगंटीवार यांच्यासाठी बल्लारपूर एकहाती वर्चस्व असलेला मतदारसंघ आहे. मात्र काँग्रेसचाही जनाधार इथे मोठा आहे. 2009 मधील पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसच्या राहुल पुगलिया यांचा 24 हजार मतांनी पराभव करत मुनगंटीवार विजय झाले होते. 2014 साली 43 हजारांचे मताधिक्य घेत मुनगंटीवार इथले दुसऱ्यांदा आमदार झाले. या दोन्ही निवडणुकीत भाजप आणि मुनगंटीवार यांचे श्रेय होते. पण मुलचंदानी यांच्या सारख्या बल्लारपूरच्या बाहेर ओळख नसलेल्या उमेदवाराला काँग्रेसने ऐनवेळी उमेदवारी दिली होती. समोर मोदी लाट आणि मुनगंटीवार यांच्या सारखा मातब्बर उमेदवार असतांना देखील काँग्रेसला तब्बल 60 हजार मते मिळाली होती.

2019 च्या लोकसभेला तर काँग्रेसने महाराष्ट्रात जी एकमेव जागा जिंकली ती चंद्रपूरची होती. चंद्रपूरमध्ये लोकसभेला बाळू धानोरकर यांनी हंसराज अहिर यांचा पराभव केला. यात धानोरकर यांना चंद्रपूरमधील बल्लारपूरसह चारही विधानसभा मतदारसंघातूनही मताधिक्य होते. त्यामुळे विधानसभेला मुनगंटीवार पडणार का? असा सवाल विचारला जाऊ लागला होता. पण चार महिन्यातच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 34 हजारांच्या लीडने मुनगंटीवार आमदार झाले. मुनगंटीवार आणि अहिर यांच्यात सुप्त वाद आहे. त्याचाचा परिणाम या निवडणुकीत झाल्याचे बोलले गेले.

आताही लोकसभेला स्वतः मुनगंटीवार उमेदवार होते. पण बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना 48 हजार मतांची आघाडी आहे. त्यामुळे यंदाची मुनगंटीवार यांच्यासाठी निवडणूक अवघड असल्याचे बोलले जाते. प्रत्यक्षात मुनगंटीवार हे स्वत:च लोकसभेसाठी इच्छुक नव्हते. त्यामुळे त्यांनी लोकसभेला इथे किती ताकद लावली हा संशोधनाचाच विषय आहे. राज्याच्याच राजकारणात राहण्यासाठी त्यांनी केलेली धडपड उभ्या महाराष्ट्राने बघितली होती.

मात्र याच मताधिक्याच्या जोरावर काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला आहे. आता येथून उमेदवारीसाठी जिल्हा काँग्रेसमधील विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर हे दोन्ही गट आक्रमक झाले आहेत. या दोन्ही गटांकडून आपल्याच गटाला उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. सध्या पक्षाकडे 22 इच्छुकांची यादी असून त्यातून विधानसभेसाठी एकाची निवड करताना काँग्रेसची दमछाक होण्याची शक्यता आहे. या दोन्ही गटांत समन्वय घडवून आणण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून तिकीट वाटप करताना जिल्ह्यातील सहा मतदारसंघांचे समान वाटप केले जाण्याची शक्यता आहे.

Ground Zero : बीडमध्ये ‘क्षीरसागर बंधू’ भिडणार; मराठा मतांवर ज्योती मेटेंची नजर

वरोरा हा धानोरकर यांचा हक्काचा मतदारसंघ आहे. त्यामुळे तिथे प्रतिभा म्हणतील तोच उमेदवार देण्यात येईल. ब्रम्हपुरी आणि चिमूर या दोन मतदारसंघांवर वडेट्टीवारांचे वर्चस्व आहे. तिथेही त्यांच्याच मर्जीतील उमेदवार असतील. राजुरा हा सध्या काँग्रेसकडेच आहे. तिथून विद्यमान आमदार सुभाष धोटे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. अशावेळी चंद्रपूर आणि बल्लारपूर या दोन मतदारसंघांवर वाद होण्याची शक्यता आहे. या दोनपैकी एका मतदारसंघातून आपल्या समर्थकांना उमेदवारी मिळावी यासाठी दोन्ही गट प्रयत्नशील आहेत. यात बल्लारपूरसाठी वडेट्टीवार गटाकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत तर धानोरकर गटाकडून घनश्याम मुलचंदानी यांची नावे चर्चेत आहेत. मात्र मुलचंदानी यांनी 2014 मध्ये इथून निवडणूक लढली होती आणि त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे यंदा वडेट्टीवार यांच्याकडून संतोष रावत यांच्यासाठी आग्रह धरला जाण्याची शक्यता आहे.

बल्लारपूर मतदारसंघावर महाविकास आघाडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेही दावा केला आहे. जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे इच्छुक असून त्यांनी कामही सुरू केले आहे. बल्लारपूर मतदारसंघातून काँग्रेस सातत्याने पराभूत होत आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार) पक्षानेही कंबर कसली आहे. या पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी ही आपल्या पक्षाला जागा सोडावी, अशी मागणी केली आहे. तसेच जागा काँग्रेसला सोडल्यास जिल्हाध्यक्षासह सर्व पदाधिकारी राजीनामे देतील, असा इशारा दिला आहे. या सगळ्यात विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे यांच्या ‘निर्भय बनो’कडून पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोतरे यांचे नाव पुढे केले आहे. त्यामुळे मुनगंटीवार यांच्याविरोधात लढण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे, असेच म्हणावे लागेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube