Ground Zero : बीडमध्ये ‘क्षीरसागर बंधू’ भिडणार; मराठा मतांवर ज्योती मेटेंची नजर
राजकारणात काका-पुतण्याचे वाद नवे नाहीत. शरद पवार-अजित पवार, बाळासाहेब ठाकरे-राज ठाकरे, गोपीनाथ मुंडे-धनंजय मुंडे अशी बरीच उदाहरण सांगता येतील. यापैकीच बीडच्या (Beed) राजकारणातील आणखी एक जोडी म्हणजे माजी आमदार जयदत्त क्षीरसागर (Jaidatta Kshirsagar)- आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar). तसे क्षीरसागर घराणे आजही राहते एकत्रच. पण 2019 च्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि तत्कालिन आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्यात खटका उडाला. त्यामुळे विधानसभेचे तिकीट संदीप यांना मिळाले. मग जयदत्त यांनी शिवसेनेकडून तिकीट मिळवले.
या लढतीत संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव केला. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीतही संदीप यांनी राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांच्यासाठी जीवाचे रान केले होते. त्यामुळेच पंकजा मुंडे यांनाही विधानसभा मतदारसंघात धक्का बसला होता. याच पार्श्वभूमीवर पाहुया यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बीडचे चित्र कसे असणार? जयदत्त क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर अशीच पुन्हा काका-पुतण्याची लढत होणार की संदीप क्षीरसागर विरुद्ध डॉ. योगेश क्षीरसागर असे दोन चुलतभाऊ रिंगणात उतरणार? (in Beed Assembly Constituency there will be a fight between NCP Sharad Chandra Pawar party of Sandeep Kshirsagar against NCP Dr. Yogesh Kshirsagar)
पाहुया लेट्सअप मराठीच्या ग्राउंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीजमधून…
आज घडीला क्षीरसागर यांची तिसरी पिढी राजकारणात आहेत. केशरकाकू क्षीरसागर यांचा बीडमध्ये मोठा राजकीय दबदबा होता. इंदिरा गांधी यांच्याशी त्यांचे अत्यंत निकटचे संबंध होते. या केशरकाकूंना जयदत्त, रवींद्र, डॉ. भारतभूषण आणि डॉ. विठ्ठल अशी चार मुले. त्यातील डॉ. विठ्ठल वगळता इतर तिघे आणि त्यांची मुले राजकारणात आहे. पंचायत समिती, साखर कारखाना, बाजार समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, आमदारकी असे सगळे कारभार एक हाती याच कुटुंबाकडे आहे.
मात्र बीड विधानसभा मतदारसंघात तसा एका पक्षाचा आमदार कधीच राहिलेला नाही. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाचे आमदार इथे होऊन गेलेले आहे. सुरेश नवले यांच्यासारखे दिग्गज नेते शिवसेनेच्या धनुष्यबाणावर इथले आमदार राहिलेले आहेत. मात्र 2009 पासून या मतदारसंघात क्षीरसागर कुटुंबाचे प्राबल्य सुरु झाले.
2009 मध्ये बीडमधून राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर आमदार झाले. क्षीरसागर यांना एक लाख नऊ हजार 163 मते मिळाली होती. तर तत्कालिन आमदार असलेल्या शिवसेनेच्या सुनील धांडे यांना केवळ 33 हजार मते मिळाली होती. आरपीआयच्या आठवले गटाकडून रिंगणात उतरलेले सय्यद सलीम अली यांनी 32 हजार मते घेतली होती. 2014 ची निवडणूक जयदत्त क्षीरसागर यांना जड गेली होती. सर्व पक्ष स्वतंत्र लढल्याने भाजपने विनायक मेटे यांना मैदानात उतरविले होते. क्षीरसागर हे 77 हजार 134 मते घेऊन विजयी झाले होते. तर मेटे यांनी 71 हजार मते घेत त्यांना घाम फोडला होता. त्यावेळी शिवसेनेच्या अनिल जगताप यांना 30 हजार मते मिळाली होती.
Ground Zero : अजितदादांनी विडा उचललाय पण थोपटेंचा गड सर करणं सोपं नाही…
अशात 2019 मध्ये राजकारणामुळे कुटुंबात फूट पडली. विधान परिषदेचे तत्कानिल विरोधी पक्ष नेते असलेल्या धनंजय मुंडे यांच्याकडे बीडची सारी सुत्रे एकवटली होती. त्यावेळी मुंडे आणि जयदत्त क्षीरसागर यांच्यात खटके उडाले. त्यात पुतण्या संदीप क्षीरसागर यांना राष्ट्रवादीकडून तिकीट मिळाले. जयदत्त क्षीरसागर यांनी तिकीट मिळविण्यासाठी शिवसेनेची वाट धरली. सेनेकडेही मोठा उमेदवार नसल्याने त्यांना पायघड्या घातल्या. पुतण्या आणि काकांमध्ये राजकीय संघर्ष झाला. त्यावेळी भाऊ डॉ. भारतभूषण आणि त्यांचे मुले हे जयदत्त क्षीरसागर यांच्याबरोबर होते. पण अटीतटीच्या लढतीत पुतण्या संदीप यांनी बाजी मारली. संदीप क्षीरसागर यांना 99 हजार 934 मते मिळाली होती. तर जयदत्त क्षीरसागर यांना 97 हजार 950 मते मिळाली होती. 1984 मतांनी पुतण्याने काकांना धक्का दिला होता.
राष्ट्रवादीला काँग्रेसला 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्याने चांगली साथ दिली होती. मुंडे कुटुंबियांनी भाजपचा बालेकिल्ला बनवलेल्या बीड जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे चार आमदार निवडून आले होते. तर भाजपला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. पण राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर धनंजय मुंडेंसह तीन आमदार अजित पवारांबरोबर गेले. तर संदीप क्षीरसागर यांनी शरद पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक फटका पंकजा मुंडे यांना बीड विधानसभा मतदारसंघातून बसला. या मतदारसंघात बजरंग सोनवणे यांना तब्बल 61 हजार 681 मतांचे मताधिक्य मिळाले. सोनवणे यांना 1 लाख 39 हजार 264 मते मिळाली. तर पंकजा मुंडे यांना 77 हजार 583 मते मिळाली आहेत. या विजयात संदीप क्षीरसागर हे किंगमेकर ठरल्याचे बोलले जात आहे.
आताच्या निवडणुकीसाठी ज्याचा पक्ष, त्याचा आमदार हे सूत्र जागा वाटपात युती आणि आघाडीमध्ये आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जाईल. तर महायुतीमध्ये ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जाऊ शकते. या मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि दोन्ही शिवसेनेचे आता फारशी ताकद उरलेली नाही. या मतदारसंघात क्षीरसागर कुटुंबच राजकीय पक्ष आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आमदार संदीप क्षीरसागर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
तर संदीप क्षीरसागर यांचे एक चुलत बंधू आणि माजी नगरसेवक डॉ. योगेश भारतभूषण क्षीरसागर हेही निवडणुकीचे तयारी करत आहेत. नगराध्यक्ष राहिलेल्या भारतभूषण यांचे ते सुपुत्र आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मंत्री धनंजय मुंडे हेही योगेश क्षीरसागर यांच्या तिकीटासाठी प्रयत्न करत आहेत. तर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे सध्या कोणत्याच पक्षात नाही. निवडणुकीबाबत त्यांनी भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. ते रिंगणात उभे राहिल्यास दोन पुतण्यांविरुद्ध त्यांची लढाई असणार आहे.
Ground Zero : कोल्हापूर ‘उत्तर’च कोडं : बंटी पाटील, क्षीरसागर यांच्या डोक्याला ताप
या मतदारसंघात सर्वात महत्वाचा फॅक्टर ठरणार आहे तो मराठा विरुद्ध ओबीसी वातावरणाचा. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला येथून मोठा पाठिंबा होता. तसेच क्षीरसागर यांचा बंगलाही जाळल्याचे प्रकरण घडले होते. त्यामुळे आंदोलनाची धग बीड शहरात दिसली होती. क्षीरसागर हे ओबीसी आहेत. याचमुळे मराठा मतांना आपल्याकडे खेचण्यासाठी स्वर्गीय विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे याही विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्या शिवसंग्राम संघटनेसाठी पाच जागा मागत आहेत. त्यात बीडचीही जागा आहे. जागा न मिळाल्यास मेटे ही अपक्ष रिंगणात उतरू शकतात. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत होऊ शकते. यात जातीय फॅक्टरने साथ दिल्यास मेटे या क्षीरसागर यांना जड जाऊ शकतात. या मतदारसंघात मुस्लिम, दलित मतदारांची संख्या मोठी आहे. या बीड शहरामध्ये तीस हजारांहून अधिक मुस्लिम मतदार आहे. तो मतदारही निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे परळीनंतर जिल्ह्यातील सगळ्यात हॉटस्पॉट असा मतदारसंघ म्हणून बीडकडे पाहिले जाते.