Ground Zero : अजितदादांनी विडा उचललाय पण थोपटेंचा गड सर करणं सोपं नाही…
राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होती. महाराष्ट्रातील सगळ्यात हॉटसीट होती बारामती. बारामती मतदारसंघातील प्रत्येक कोपऱ्यात दोन्ही गटांकडून जोडण्या लावण्याचा कार्यक्रम सुरु होता. अशात शरद पवार (Sharad Pawar) यांनी भेट घेतली भोर-वेल्हा-मुळशीचे माजी आमदार, माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांची. तब्बल 40 वर्षांचा संघर्ष विसरुन पवार सप्रिया सुळेंसाठी (Supriya Sule) थोपटेंच्या घराची पायरी चढले.
पवारांपाठोपाठ सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनीही अनंतराव थोपटेंची भेट घेत सुनेत्रा पवार यांना मदत करण्यासाठी शब्द टाकला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही संग्राम थोपटे यांच्या राजगड साखर कारखान्याला राज्य शासनाकडून 80 कोटी रुपयांची कर्जहमी देत साखप पेरणी केली. किरण दगडे पाटील, रणजित शिवतरे, विक्रम खुटवड, विजयबापू शिवतारे, बाळासाहेब चांदेरे, कुलदीप कोंडे अशी नेत्यांची फळी असतानाही महायुतीला थोपटेंची मदत आवश्यक होती.
याच दोन उदाहरणांवरुन भोर-वेल्हा-मुळशी मतदारसंघाला थोपटेंनी कसा बालेकिल्ला बनवला आहे याचा अंदाज येऊ शकतो. पण निवडणूक संपली आणि सुप्रिया सुळे यांना बारामती विधानसभेनंतर दुसर्या क्रमांकाचे मताधिक्य याच भोर-वेल्हा-मुळशीने दिले. थोपटेंनी आघाडीधर्म पाळला. सुप्रिया सुळे बारामतीतून चौथ्यांदा खासदार झाल्या. आता विधानसभा निवडणुकीत थोपटे यांचा हाच अभेद्य बालेकिल्ला सर करण्याचे मोठे आव्हान महायुतीसमोर आहे. सुनेत्रा पवार यांचा पराभव अजित पवारांच्या जिव्हारी लागला आहे. तेही या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी शोधत आहेत. (Who will be the Mahayuti candidate against Sangram Thopte in Bhor-Velha-Mulshi Constituency?)
लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये पाहुया काय घडतंय भोर-वेल्हा-मुळशी या तीन तालुक्यांमध्ये…
भोर, वेल्हा आणि मुळशी या तीन तालुक्यांचा मिळून भोर विधानसभा मतदारसंघ तयार झालेला आहे. या मतदारसंघावर संपूर्णपणे थोपटे घराण्याचेच वर्चस्व राहिलेले आहे. 1972 मध्ये पहिल्यांदाचा ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत विजय मिळविला होता. त्यानंतर 1978 आणि 1999 चा अपवाद वगळता अनंतराव थोपटे तब्बल सहावेळ आमदार झाले. यातील 1978 मध्ये थोपटेंना अवघ्या 498 मतांनी पराभव पहावा लागला होता. अनंतराव थोपटे यांचा वारसा त्यांचा मुलगा संग्राम थोपटे यांनी पुढे चालवला. 2009, 2014 आणि 2019 असे तीनवेळा ते विजयी झाले आहेत.
मागील तीन निवडणुकांचा आढावा घेतल्यास 2009 मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर आमदार संग्राम थोपटे यांच्यापुढे मुळशी-हवेलीचे माजीआमदार शरद ढमाले यांचे आव्हान होते. शिवाय मानसिंग धुमाळ यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला. या तिरंगी लढतीत संग्राम थोपटे यांना 59 हजार 041, शरद ढमाले यांना 40 हजार 462 तर मानसिंग धुमाळ यांना 33 हजार मते मिळाली होती. आमदार थोपटे यांनी 18 हजार 580 मतांनी पहिल्यांदा विजय मिळविला होता.
Ground Zero : धंगेकरांच्या आमदारकीवर अरविंद शिंदेंचा डोळा; भाजपमध्येही तिघांची तयारी
2014 मध्ये कुलदीप कोंडे यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली. त्यामुळे शरद ढमाले यांनी शिवसेनेतून भाजपात प्रवेश केला आणि उमेदवारी घेतली. त्यात संग्राम थोपटे 78 हजार 602, शिवसेनेच्या कुलदीप कोंडे यांना 59,651 तर राष्ट्रवादीच्या विक्रम खुटवड यांनी 50 हजार 165 मते घेतली. तिरंगी लढतीत संग्राम थोपटे हे 18 हजार 951 मतांनी दुसर्यांदा आमदार झाले. 2019 मध्ये संग्राम थोपटे आणि कुलदीप कोंडे यांच्यातच दुरंगी लढत झाली. या अटीतटीच्या लढतीत आमदार थोपटे यांना एक लाख 8 हजार 925 मते तर कोंडे यांना 99 हजार 716 मते मिळाली. अत्यंत चुरशीच्या या लढतीत अवघ्या 9 हजार 206 मतांनी आमदार थोपटे यांनी विजय मिळवत हॅटि्ट्रक केली.
आता आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसला सुटून आमदार संग्राम थोपटे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. तर महायुतीमध्ये थोपटे यांच्याविरोधात एकच उमेदवार देण्याचा महायुतीचा प्रयत्न असणार आहे. महायुतीचा हा प्रयत्न यशस्वी झाल्यास आणि सरळ लढत झाल्यास अत्यंत चुरशीची होईल. पण महायुतीतील इच्छुकांची संख्या पाहता बंडखोरी होऊन तिरंगी-चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. यात विरोधकांची विभागलेली ताकद आणि एकसंध काँग्रेस यामुळे थोपटे यांना निवडणूक सोपी होऊ शकते.
महायुतीत भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेना,राष्ट्रवादी की भाजपला? हाच मोठा प्रश्न आहे. भाजपकडून किरण दगडे पाटील उमेदवारीच्या रेसमध्ये आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे, युवानेते आणि यापूर्वी थोपटेंविरोधात लढत दिलेले विक्रम खुटवड, भालचंद्र जगताप, चंद्रकात बाठे असे इच्छुक आहेत. शिवसेनेकडून बाळासाहेब चांदेरे आणि थोपटे यांचे पारंपारिक विरोधक कुलदीप कोंडे यांच्या नावाची चर्चा आहे.
शिवसेना पक्षात दोन गट झाल्यावर पहिल्यांदा बाळासाहेब चांदेरे यांनी एकनाथ शिंदेंच्या ताफ्यात जाणे पसंत केले होते. चांदेरे यांच्यासाठी हा प्लस पॉईंट ठरू शकतो. तर लोकसभा निवडणुकीवेळी पुण्यातील जाहीर सभेत कुलदीप कोंडे व्यासपीठावर एन्ट्री घेत शिवसेनेत प्रवेश केला होता. भारतीय जनता पक्षाकडून पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक किरण दगडे पाटील विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांनी यापूर्वीच काशी यात्रा आणि विविध शिबिरे आयोजित करून अप्रत्यक्ष निवडणुकीची तयारीच सुरू केली आहे.
Ground Zero : भाजप सुरेश भोळेंना रिप्लेस करणार? तीन ‘मराठा’ चेहरे चर्चेत
मगाशी म्हंटल्याप्रमाणे सुनेत्रा पवार यांचा पराभव अजित पवारांच्या जिव्हारी लागला आहे. तेही या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी शोधत आहेत. त्यामुळे या तिन्ही पक्षातील जो कोणी उमेदवार उभा राहिल त्याला अजित पवार यांचे समर्थन असणार हे निश्चित. थोपटे यांच्या ताब्यातील राजगड सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकार विकास परिषदेने मंजूर केलेले कर्ज ऐनवेळी अडवून अजित पवार यांनी आपल्या कुरापतीची चुणूक थोपटे यांना दाखवून दिली आहे. आता आगामी काळात अजितदादा सत्तेच्या माध्यमातून आणखी कसे, किती आणि काय काय डावपेच टाकतात, यावर इथली लढत रंगणार आहे.
शिवाय प्रत्येक निवडणुकीत थोपटे यांचे मताधिक्य कमी कमी होत आहे, ही त्यांच्यासाठी चिंतेची बाब आहे. मात्र या वेळी लोकसभेला त्यांनी याच मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना गतवेळीपेक्षा जवळपास चौपट मताधिक्य मिळवून दिले आहे. ही थोपटे यांना दिलासा देणारी बाब आहे. सोबतच शरद पवार आणि अनंतराव थोपटे यांचा मिटलेला संघर्ष हाही त्यांच्यासाठी यंदा जमेची बाजू ठरु शकते. सुप्रिया सुळे यांचाही या मतदारसंघात वावर वाढला असून त्या आता थोपटेंसाठी कशी गोळाबेरीज करतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.