तीन दिवसांपासून मुंबईत कोसळधारा कायम; हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कलसह अनेक भाग जल’मय

Rain in Mumbai : मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. काल रात्रभर अनेक ठिकाणी 60 ते 100 मिमी पावसाची नोंद झाली. (Mumbai) मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतल्या 15 दिवसांची पावसाची कसर पूर्ण झाली आहे. मुंबईतील हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल या ठिकाणी पाणी साचले आहे. तर मुंबई उपनगरात अंधेरी, विरार, वसई या भागात अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
त्याचबरोबर दुसरीकडे मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल विस्कळीत झाली आहे. सध्या मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. त्यातच आता हवामान विभागाने पुढील तीन तासांसाठी मुंबई आणि रायगडमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या शुक्रवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या धुमाकूळ सुरू आहे. आजही मुंबई शहर आणि उपनगरांत रात्रभर पावसाची रिपरिप सुरू आहे.
सध्या मुंबईत भर दिवसा अंधाराचे वातावरण पाहायला मिळत आहे. आज दिवसभर असंच वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच दुसरीकडे पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यभरात पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाचा मोठा इशारा, पुढील 3 तास धोक्याची
विदर्भातील अमरावती जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठा वाढला आहे. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणातील पाणीसाठा 52 टक्क्यांवरुन 58 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी असल्याचे पाहायला मिळत आहे.
तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्याला ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. या पावसाने अनेक भागांना जोरदार तडाखा दिला आहे. मुखेड तालुक्यात पाच ते सहा गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हसणाळा गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातल्यामुळे अनेक नागरिक अडकल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ ची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. माढा, मोहोळ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातून वाहणाऱ्या या नदीला पूर आल्यामुळे नदीकाठच्या शेती पिकांना धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. यामुळे नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.