प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) :
“केंद्रात मोदी-राज्यात शिंदे” ही जाहिरात चांगलीच चर्चेची ठरली. काल (13 जून) राज्यातील वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर शिवसेनेच्या चिन्हासह ही जाहिरात प्रकाशित झाली. यात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना 26.1 टक्के तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना 23.2 टक्के जनतेने कौल दिल्याचं दिल्याचं दर्शवण्यात आलं होतं. त्यामुळे या जाहिरातीने सर्वांचच लक्ष वेधून होतं. (Shivsena leaders meet bjp leaders on advertisement controversy)
मात्र ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपमध्ये एक प्रकारचा नाराजीचा सूर दिसून आला. या घडामोडींनंतर फडणवीस यांनी कालचा ठरलेला कोल्हापूर दौरा सुद्धा रद्द केला होता. त्यानंतर आजचेही काही दौरे फडणवीस यांनी रद्द केले असल्याची माहिती मिळत आहे. या सगळ्या वादात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह ठाकरे गटानेही देवेंद्र फडणवीसांना सॉफ्ट कॉर्नर शिंदे गटावर जोरदार टीका केली.
दरम्यान, भाजपची ही नाराजी दूर करण्यासाठी सध्या शिवसेना नेत्यांची ऊर फुटेपर्यंत धावाधाव अन् दमछाक सुरु आहे. ही जाहिरात आपण दिली नसून त्रयस्थ व्यक्तीने किंवा हितचिंतकाने दिली असल्याचं मंत्री शंभूराजे देसाई यांनी स्पष्ट केलं. मात्र त्यानंतर जाहिरातीतील चूक लक्षात येताच आज लगेच मुख्यमंत्री शिंदे यांनी माघार घेत दुसरी जाहिरात दिली. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही फोटो आहे. यातून शिंदे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला असल्याचं बोललं जात आहे.
याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी शिवसेना नेते आणि भाजपाच्या नेत्यांच्या भेटीगाठीही रंगल्या आहेत. काल सकाळपासून भाजपाच्या नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न काल रात्रीपर्यंत सुरु होता. काल कॅबिनेट बैठकीपूर्वी शंभुराज देसाई, यांनी उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत सविस्तर माहिती दिली. उदय सामंत तसेच दीपक केसरकर यांनी माध्यमांमध्ये बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.
दुपारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी शंभुराज देसाई यांनी संवाद साधून याबाबत स्पष्टीकरण दिले. शंभुराज देसाईंनी रात्री उशीरा भाजपचे नेते गिरीश महाजन यांचीही भेट घेतली. ही जाहिरात कशी आली? तिच्याशी शिवसेनेचा कसा संबंध नाही हे समजावून सांगितले. याशिवाय केंद्रातून मोठ्या नेत्याचा फोन येईल आणि नवी जाहिराती उद्या प्रसिद्ध होईल असं भाकित एका भाजप नेत्याने केले होते.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या सकाळी कशा जाहिरात दिली जाईल ही रणनीती काल दुपारीच ठरवण्यात आली. हा सर्व मजकुर गिरीश महाजन यांच्या दाखवण्यात आला आणि त्यानंतर या नवी जाहिरात आजच्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धही झाली. दरम्यान शंभुराज देसाई हे आज दुपारी चंद्रशखर बावनकुळे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे यानंतर या वादावर पडदा पडेल अशी शक्यता आहे. पण दुभंगलेली मन सावरणार का? हा प्रश्न आहे.