Download App

Sanjay Raut : ‘घटनाबाह्य सरकारची घटका भरलीच’; सरकारच्या ‘खेळी’वर राऊतांचा संताप

Sanjay Raut : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर (Maratha Reservation) राज्यातील वातावरण तापलं आहे. ठिकठिकाणी आंदोलने सुरुच आहेत. काही जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी पातळीवर जोरदार हालचाली सुरू करण्यात आली आहे. आज सरकारतर्फे सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. याच मुद्द्यावर ठाकरे गटाचे नेते प्रचंड संतापले असून सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. ठाकरे गटाला या बैठकीचे निमंत्रण दिलेले नाही त्यामुळे संजय राऊतांचा (Sanjay Raut) संताप झाला असून त्यांनी खरमरीत ट्विट करत सरकारवर हल्लाबोल केला आहे.

या सरकारचे करायचे काय? महाराष्ट्र पेटलाय तरी यांचे निर्लज्ज राजकारण सुरुच आहे. मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली. त्या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेला नाही. शिवसेनेचे 16 आमदार व 6 खासदार आहेत. सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. एक आमदार असलेल्यांना आमंत्रण. एकही आमदार नाही अशांना देखील बोलावले. पण, शिवसेना यांच्या डोळ्यांत खुपते. अंबादास दानवे यांना विरोधी पक्षनेते म्हणून बोलावले. ठीक. आम्हाला मानपान नको. पण, प्रश्न सोडवा. जरांगे पाटील यांचे प्राण वाचवा. घटनाबाह्य सरकारची घटका भरलीच आहे. हिशोबाचे वेळ जवळ येत आहे. जय महाराष्ट्र ! असे खरमरीत ट्विट राऊत यांनी केले आहे.

राज्य सरकारने ठाकरे गटातील अंबादास दानवे यांना बैठकीसाठी बोलावले आहे. पण, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना बोलावलेले नाही. त्यामुळे राऊतांचा संताप झाला आहे. यावरूनच त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

बैठकीसाठी ‘या’ नेत्यांना निमंत्रण 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. राज्यातील सर्वच पक्षातील नेत्यांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, ठाकरे गटाचे अंबादास दानवे, वंचितचे प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रित केलं आहे.

मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळला, ओबीसीही नाराज; राज्यातील प्रमुख पक्षांसाठी 2024 ची वाट बिकट?

निर्णय अमान्य, अर्धवट प्रमाणपत्र घेणार नाही 

राज्य सरकार उद्यापासून कुणबी दाखल्याची (Maratha Reservation) वाटप करणार आहे. पण सरकारच्या या भूमिकेला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विरोध केला आहे. सरकारने घेतलेला आजचा एकही निर्णय मान्य नाही. अर्धवट प्रमाणपत्र मराठा समाज घेणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी वाटू नयेत आणि वाटू दिले जाणार नाहीत, असा इशारा जरांगे पाटील यांनी काल सरकारला दिला होता. सरकारला आजपर्यंत वेळ देत आरक्षणावर ठोस निर्णय देण्याची मागणी त्यांनी केली. यानंतर मात्र आपण पाणी पिणे देखील सोडणार असल्याचे त्यांनी काल मंगळवारीच स्पष्ट केले होते.

Tags

follow us