Shivsena Yogesh Kadam Statment On Clashes With Rane Family : कोकणातील दोन मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) आणि योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यातील भांडणं समोर आली आहेत. तसा राजकारणात कदम अन् राणे कुटुंबातील संघर्ष हा जुनाच आहे. कॅबिनेट मंत्री नितेश राणे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम मागील काही दिवसांपासून आमनेसामने आलेत. नितेश राणे यांनी थेट योगेश कदम (Shivsena) यांच्या मतदारसंघात सभा घेत कदमांनाच इशारा दिला होता. हा घाव जिव्हारी लागल्याने योगेश कदमांनी देखील राणेंना चांगलंच सुनावलं. आता राणे अन् कदम कुटुंबातील संघर्षावर योगेश कदम यांनी भाष्य केलंय.
कदम अन् राणे कुटुंबातील वाद हा पुढच्या पिढीत देखील पाहायला मिळतोय. सगळं काही अलबेल असल्याचं सांगितलं जातंय. यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलंय की, रामदासभाई अन् नारायण राणे यांच्यात त्यावेळी जो संघर्ष झाला, तो दोन पक्षांमध्ये असलेला (Maharashtra Politics) संघर्ष होता. राणे साहेब शिवसेना सोडून गेले होते. त्यावेळी माननीय बाळासाहेबांचे आदेश असायचे, त्यावेळी तो संघर्ष झाला. तो काळ वेगळा होता, संघर्ष वेगळा होता. परंतु त्या संघर्षाशी माझं अन् नितेश राणे यांचं नातं जोडू नये, असं आवाहन योगेश कदम यांनी केलंय.
योगेश कदम यांनी म्हटलंय की, तो काळ वेगळा होता. तो संघर्ष वेगळा होता. आज मी अन् नितेशजी आम्ही दोघेही मित्र आहोत. एखाद्या गोष्टीवर आमचा काही वाद-विवाद झाला असेल, परंतु तो काही कायमस्वरूपी बाळगुन आम्ही पुढे जाणार नाही. काही असेल तर आम्ही एकत्र बसवून मिटवू. आमच्या घरातील भांडणं तु्म्ही घरातच राहू द्या. नका विषय काढू, असं देखील माध्यमांना योगेश कदम यांनी मिश्कीलपणे म्हटलंय.
दापोलीमधी एका घटनेवरून नितेश राणे यांनी योगेश कदमांना चांगलंच धारेवर धरलंय. एफआयआरमध्ये नाव आलं नसेल, तर त्यांना कोण वाचवतंय? ते आमच्या फडणवीस साहेबांपेक्षा मोठे नाहीत, असं वक्तव्य राणेंनी केलं होतं. तर यावर नितेश राणे माझे मित्र आहेत. माझ्याच मतदारसंघामध्ये येऊन मला शहाणपणा शिकवू नका, असं प्रत्युत्तर योगेश कदम यांनी दिलं होतं.