मुंबई : नाशिकच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे या आपल्या अडीच महिन्याच्या बाळासोबत विधानभवनात दाखल झाल्या. त्यामुळे त्यांनी एकाचवेळी आई आणि लोकप्रतिनिधीची जबाबदारी निभावली आहे.
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू झाले. करोना काळानंतर आणि राज्यातील सत्तांतरानंतर नागपूरमध्ये होणारं हे पहिलेच अधिवेशन आहे. यावेळी नाशिकच्या आमदार सरोज अहिरे यांनी अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन विधानभवनाची पायरी चढली.
यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार सरोज अहिरे म्हणाल्या, ‘मी नुकतच आई झाले आहे. बाळ अडीच महिन्याचं आहे पण आई बरोबरच माझ्यावर एका मतदारसंघाची देखील जबाबदारी असल्याने मी अधिवेशनात दाखल झाले आहे. कारण मला माझ्या मतदारसंघाचे प्रश्न विधिमंडळात मांडायचे आहेत.’