Download App

सुजय विखे यांचे तिकिट भाजप कापणार, याचीच चर्चा जास्त होतेय!

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

अहमदनगर दक्षिण या लोकसभा मतदारसंघा भाजपचा उमेदवार कोण असणार, याची खरे तर एवढी चर्चा व्हायचं कारण नव्हतं. पण या मतदारसंघात भाजप नवीन चेहरा शोधत आहे. विद्यमान खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना भाजप पुन्हा उमेदवारी देणार नाही. ऐन वेळी नवीन चेहरा भाजपकडून उभा राहणार आहे. माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांनीही दंड थोपटले आहेत. त्यामुळे सुजय विखे हे टेन्शनमध्ये आले आहेत.  त्यांचे वडिल महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishn Vikhe Patil) आणि सुजय यांच्या दिल्लीच्या चकरा वाढल्या आहेत. अशाच गप्पा नगरच्या राजकारणात रंगत आहेत.

राधाकृष्ण विखे हे राज्यात भाजपच्या पहिल्या फळीतील नेते आहेत. त्यांना भाजपने महसूलसारखे मंत्रीपद दिले आहे. महाविकास आघाडी सरकार घालविण्यात आणि एकनाथ शिंदेंच्या आमदारांना योग्य ती मदत विखे यांनी केली. सुजय विखे यांची ही पहिलीच खासदारकी आहे. त्यांचाही मतदारसंघात दांडगा संपर्क आहे. तरीही विखेंचे तिकिट धोक्यात, आहे. त्यामुळेच ते गॅसवर आहेत, अशी टीका त्यांचे विरोधक करत आहेत. काॅंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात असोत रोहित पवार हे विरोधी नेतेही विखेंच्या दिल्ली वाऱ्यांकडे लक्ष वेधत आहेत.  कांदा निर्यातबंदी हटवावी, या मागणीसाठी विखे पिता-पुत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले. ही निर्यातबंदी उठली नाहीच. विखे यांच्या या भेटीमागे हे कारण नव्हते तर आपल्या मुलाची उमेदवारी त्यांना निश्चित करायची होती. पण ती अद्याप झालेली नाही, असे राजकीय वार विखेंवर होत आहेत.

तर ही चर्चा होण्याचे कारण काय याचा शोध आपण घेऊया

कारण क्रमांक १- भाजपचे धक्कातंत्र

भाजपमध्ये नरेंद्र मोदी, अमित शहा या दोन नेत्यांची उमेदवारी वगळता इतर कोणालाही आपल्याला तिकिट मिळेल, याचा भरोसा नाही.मोदी आणि शहा यांच्या धोरणानुसार भाजपची ताकद प्रचंड वाढली आहे. आपण कोणताही प्रयोग कोणत्याही राज्यात आणि मतदारसंघात करू शकतो. त्यासाठी विशिष्ट घराण्यावर किंवा जातीवर अवलंबून राहण्याची गरज नाही. राजस्थान, मध्य प्रदेश अशा राज्यांत मुख्यमंत्री निवडताना भाजपने अनेक बड्या नेत्यांना धक्के दिले. असेच धक्कातंत्र लोकसभा निवडणुकीतही देण्याचा त्यांचा विचार असू शकतो. त्यामुळे अशा धक्क्यांत विखे कुटुंब असू शकते.

कारण क्रमांक २ एका कुटुंबात किती पदे? 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घराणेशाहीचा तिटकारा आहे. आपल्या भाषणांत ते वारंवार याविषयी बोलत असतात. आता एका कुटुंबात एकच पद असे धोरण भाजपच्या नेत्यांच्या मनात आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मंत्रीपद आहेच. मग त्यांच्याच मुलाकडे पुन्हा खासदारकी मग भाजप देणार नाही, असा तर्क यावर मांडण्यात येत आहे. घराणेशाहीला अटकाव करणाऱ्या धोरणाचा मग सुजय विखे यांना धक्का बसू शकतो. त्यामुळेच त्यांचे तिकिट कापले जाईल, असेही सांगितले जात आहे. अमित शहा यांनी त्यांच्या उमेदवारीला अद्याप ग्रीन सिग्नल दिला नसल्याचेही सांगण्यात येते.

कारण क्रमांक ३ राम शिंदे इतके आक्रमक का झालेत?

राम शिंदे हे विखेंचे पक्षांतर्गत विरोधक म्हणून आक्रमकपणे बाजू मांडत आहेत. विधानसभा निवजणुकीत विखे यांच्यामुळेच आपला पराभव झाला होता, असे जाहीरपणे शिंदे सांगत होते. तेच शिंदे आता पुन्हा आपण लोकसभेसाठी इच्छुक आहोत, हे जाहीरपणे सांगत आहेत.  विखेंच्या विरोधात ते थेट पंगा घेत आहेत. शिंदे यांच्या या आक्रमक भूमिकेला राज्यातील बड्या नेत्यांची फूस आहे का, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत नेहमीच राहते. त्यामुळे त्यांना प्रत्येक पक्षात विरोधक असतातच. या स्पर्धेतूनही सुजय यांच्या उमेदवारीला काट मारले जाण्याची  शक्यता व्यक्त केली जाते.

 

कारण क्रमांक ४ सुजय विखेंविषयी नाराजी?

सुजय विखे हे परंपरागत पद्धतीने राजकारण करणारे नेते नाहीत. दशक्रिया विधी, लग्न समारंभ उपस्थिती या बाबी ते टाळतात. त्यांच्या म्हणण्यानुसार मला लोकांनी विकासकामे करायला निवडून दिले आहे. त्यामुळे अशा समारंभात किती वेळ द्यावा यालाही मर्यादा आहेत. त्यापेक्षा मी कामे करतो, असा त्यांचा मुद्दा आहे. ते फोनवरही उपलब्ध नसल्याची तक्रार त्यांच्याबाबत वारंवार होते. मात्र मी फोनच उचलत बसलो तर कामे कधी करणार, असा सुजय विखेंचा प्रतिसवाल असतो. पण बहुतांश मतदारांना काम नाही झाले तरी खासदाराने किंवा आमदाराने आपल्याला तातडीने उपलब्ध असले पाहिजे, असे वाटते. विखेंचे स्थानिक राजकारणातही फार लक्ष असते. त्यामुळेही नाराजी निर्माण होते. त्याचा परिणाम सुजय यांना बसणार, असे त्यांचे विरोधक म्हणत असतात.

या प्रमुख तीन कारणांमुळे सुजय विखे हे पुन्हा खासदार होणार नाहीत, अशी टीका त्यांचे विरोधक करतात.

आता सुजय विखे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याचे कारणे काय असू शकतील, याचा शोध घेऊ.

 

कारण क्रमांक १- विखेंइतका प्रबळ उमेदवार नाही..

भाजपमध्ये नगर दक्षिण या मतदारसंघासाठी सुजय विखेंशिवाय दुसरा प्रबळ उमेदवार नाही. राम शिंदे यांनी दंड थोपटले असले तरी त्यांनाही आपली ताकद माहिती आहे. याला पुन्हा जातीय समीकरणांचीही जोड आहे. विखेंचे प्रत्येक मतदारसंघात स्वतःचे नेटवर्क आहे. याशिवाय त्यांची आर्थिक ताकदही प्रचंड आहे. त्यामुळे सध्या तरी सुजय यांच्याशिवाय भाजपला दुसरा सक्षम उमेदवार या घडीला नाही.

कारण क्रमांक २ मोदी-शहांशी थेट संपर्क

विखे कुटुंब भाजपमध्ये पाच वर्षांपूर्वी आले असले तरी त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी थेट संपर्क आहे. राज्यातील बहुतांश भाजप नेते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने किंवा त्यांच्या मान्यतेनंतर मोदी-शहांना भेटतात. तसे विखे यांच्याबाबतीत नाही. अमित शहांना वारंवार भेटणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांत विखे हे पहिल्या क्रमांकावर असतील. त्यामळेच विखे हे आपल्या उमेदवारीबाबत खात्री बाळगून आहेत. शिस्त म्हणून ते पक्षातील इतर इच्छुकांवर सध्या टीका करत नसावेत.

कारण क्रमांक ३ बहुतांश आमदारांशी विखेंनी जुळवून घेतलयं

या मतदारसंघातील भाजप आमदारांशी विखे यांनी जुळवून घेतले आहे. भाजपचे बबनराव पाचपुते, राष्ट्रवादीचे संग्राम जगताप हे सध्या त्यांच्या बाजूने भक्कमपे उभे आहेत. भाजपच्या मोनिका राजळे या त्यांच्याविरोधात काम करणार नाहीत. याशिवाय माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्याशी विधानसभा निवडणुकीनंतर बिनसलेले संबंध आता सुधारले आहेत. राम शिंदे वगळता इतर कोणताही बडा भाजप नेता विखेंच्या विरोधात नाही. ही त्यांच्यासाठी मोठी बाब आहे.

कारण क्रमांक ४ विखे फॅक्टर हा काम करतोच

नगर जिल्ह्यात विखे फॅक्टरचा प्रभाव कोणी नाकारू शकत नाही. ते कोणत्याही पक्षात असो त्यांचा पराभव करणे ही अवघड गोष्ट ठरून बसते. प्रत्येक तालुक्यात त्यांचे हक्काचे कार्यकर्ते आणि हक्काची मते आहेत. त्यांना वगळून नगर जिल्ह्याचे राजकारण कोणत्याही पक्षाला शक्य नाही. सुजय विखे यांची खासदार म्हणून ही दुसरीच टर्म आहे. त्यामुळे त्यांचे तिकिट कापले जाईलच, असे काही सांगता येत नाही. त्यामुळेही सुजय हे पुन्हा लोकसभेच्या रिंगणात असण्याची शक्यता ही सर्वाधिक आहे.  राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून आमदार निलेश लंके हे विखेंच्या विरोधात असतील, अशी आताची स्थिती आहे. ही लढत कशी होईल हे आगामी काळात स्पष्ट होईल.

 

follow us

वेब स्टोरीज