नाशिक : वेरुळच्या जनार्धन स्वामी मठाचे मठाधिपती महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज (Swami Shantigiri Maharaj) यांनी नाशिक लोकसभा (Nashik Lok Sabha) मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या एकनाथ रंगमंदिरात जय बाबाजी भक्त परिवार मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. त्यासोबतच औरंगाबादसह आठ लोकसभा मतदारसंघांत उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र यामुळे आता विद्यमाना खासदार हेमंत गोडसे यांचे टेन्शन गेल्याचे बोलले जात आहे. (Swami Shantigiri Maharaj announced to contest independent election from Nashik Lok Sabha constituency.)
मागील काही दिवसांपासून शांतीगिरी महाराज शिवसेनेकडून नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविणार असल्याची चर्चा होती. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर होते त्यावेळी मोदी यांनी महाराजांची भेट घेतली होती. त्यांच्या भेटीचा फोटोही चांगलाच व्हायरल झाला होता. एकनाथ शिंदे यांना देखील आपण कडवे हिंदुत्ववादी आहोत हे दाखविण्यासाठी आणि विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याविषययीची कथित नाराजी टाळण्यासाठी शिंदे हेही महाराजांच्या उमेदवारीचा विचार करत असल्याचे सांगितले जात होते. मात्र शिवसेनेकडून कोणतीही हालचाल नसल्याने महाराज यांनी अखेर अपक्ष मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे.
नाशिकसह छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगावमध्ये स्वामी शांतीगिरी महाराज यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. त्यामुळेच ते नाशिक मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. शांतीगिरी महाराज यांनी या आधी 2009 मध्ये छत्रपती संभाजीनगरमधून अपक्ष म्हणून लोकसभेच्या मैदानात उडी घेतली होती.त्यावेळी त्यांनी दीड लाख मते घेत तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळविले होते. त्यांच्या उमेदवारीचा शिवसेनेचे तेव्हाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना मोठा फटका बसला होता. 2004 मध्ये एक लाख 32 हजारांचे मताधिक्य घेणाऱ्या खैरेचे त्यावेळी मताधिक्य अवघ्या 32 हजारांवर आले होते.
पण त्यानंतर महाराज काहीसे सक्रिय राजकारणापासून दूर राहिले. 2019 मध्येही महाराजांनी छत्रपती संभाजीनगरमधूनच लोकसभा निवडणुकीची तयारी केली होती. त्यावेळी त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी केल्याची चर्चा होती. पण युती झाल्यानंतर त्यांनी अपक्ष तयारीला सुरुवात केली. जिल्हाभरातील भक्तांशी चर्चाही केली. इतकंच नाही तर निवडणूक कार्यालयातून दोन उमेदवारी अर्ज सुद्धा घेतले होते. मात्र अखेरच्या क्षणी त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. त्यानंतर आता ते पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात परतले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील लाखलगाव हे शांतीगिरीजी महाराज यांचे मूळ गाव. पण वयाच्या पंधराव्या वर्षी महाराजांची दृष्टी गेली होती. त्यानंतर ते मठात राहण्यासाठी आले. तिथे आल्यानंतर त्यांची दृष्टी परतली. त्यामुळे ते गावी परतले. पण त्यांची पुन्हा दृष्टी गेली. त्यानंतर ते मठात परतले आणि तिथेच राहु लागले. याच मठात राहून महाराजांनी विज्ञान शाखेचे शिक्षण घेतले.1989 साली जनार्धन स्वामी यांच्या निधनानंतर शांतीगिरी महाराजांची उत्तराधिकारी म्हणून नेमणूक केली.
तेव्हापासूनच शांतीगिरीजी महाराजच या माठाचे मठाधिपती आहेत. आज जनार्धन स्वामी मठाची करोडो रुपयांची संपत्ती आहे. मठाचे देशात 115 आश्रम आणि सात गुरुकुल आहेत. आज घडीला मठाकडे शेकडो एकर जमीन आहे. फक्त वेरूळ मठातच तब्बल 200 एकर जमीन आहे. स्वतः महाराजांकडे एसयूव्ही, टाटा सफारी यांसारख्या महागड्या गाड्या आहेत.