Download App

‘गुलाबी’ वादळाचे काटे कोणाला टोचणार? मराठवाड्यातच ‘एंट्री’ का?

  • Written By: Last Updated:

अशोक परुडे, प्रतिनिधी

तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे (BRS) अध्यक्ष के. चंद्रशेखर राव (KCR) यांचे गुलाबी वादळ आता महाराष्ट्राच्या राजकारणात शिरकाव करतेय. त्यासाठी केसीआर यांनी मराठवाड्याची निवड केली आहे. गेल्या तीन महिन्यात येथे केसीआर यांच्यात तीन जंगी सभा झाल्या आहेत. हे वादळ नांदेडमार्गे मराठवाड्यात घुसले आहे. नांदेडला सभा झाल्यानंतर, लोहा-कंदार येथे सभा झाली. तर काल छत्रपती संभाजीनगरला विराट सभा झाली. ज्या जंबिदा मैदानावर सभा झाली. त्या मैदानावर शिवसेना, भाजपच्या विराट सभा होतात. त्याच मैदानावर केसीआर यांची जंगी सभा झाली.

‘पक्ष बदलणाऱ्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये’; औटींचा विखेंवर हल्लाबोल

सभा असलेल्या ठिकाणी जोरदार वातावरण निर्मिती केली जाते. केसीआर यांचे होर्डिंग, गुलाबी झेंडे लावले जातात. गुलाबी रंगाच्या कपड्याने मंच सजविण्यात येतो. त्यावर अब की बार किसान सरकार अशी अक्षरे लिहिण्यात येतात. तसेच मंचावर महात्मा बसवेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महात्मा जोतिबा फुले, अहिल्यादेवी होळकर यांचे फोटोही लावण्यात येतात. तिन्ही सभेत केसीआर यांनी थेट महाराष्ट्र आणि तेलंगणातील शेतकऱ्यांची तुलना केली आहे.

केसीआर यांनी मराठवाड्यावर का लक्ष केंद्रीत केले आहे हा प्रश्न उपस्थित होतो. याबाबत छत्रपती संभाजीनगरमधील पुण्यनगरची जेष्ठ पत्रकार शेषराव पठाडे म्हणाले, मराठवाड्यावर अनेक पक्षांनी पूर्वीपासूनच लक्ष केंद्रीत केले आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनीही मुंबईनंतर मराठवाड्यावर लक्ष केंद्रीत केले होते. त्यात ठाकरे यांना यश आले होते. आजही शिंदे गट आणि ठाकरे गट यांची ताकद मराठवाड्यात आहे. दुष्काळ, पाण्याचा प्रश्न या भागात इतर भागापेक्षा मोठा आहे. केसीआर यांनी लोकभावनेचा प्रश्न हाती घेतला आहे. त्यामुळे त्यांना प्रतिसाद मिळत आहे.

Ajit Pawar : अजितदादांचा बारामतीकरांना शब्द; मी शेवटपर्यंत….

मराठवाड्यामध्ये ४६ मतदारसंघ आणि आठ खासदारकीच्या जागा आहेत. मतदारांची संख्याही १ कोटी ४५ लाख इतकी आहे. त्यात मुस्लीम, दलितांची संख्याही मराठवाड्यात जास्त आहे, तो वर्ग आकर्षित करून राजकीय फायदा केसीआर यांना उठवायचा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करण्यासाठी मराठवाड्याची भूमी केसीआर यांना सुपीक वाटत असल्याचे पठाडे यांनी सांगितले.

केसीआर यांच्यामुळे आगामी मराठवाड्यातील राजकारण कसे राहील, याबाबत राजकीय अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद माने म्हणाले, तीन महिन्यात केसीआर यांच्या तीन सभा मराठवाड्यात झाल्या आहेत. त्यात लोह्याचे माजी आमदार शंकरअण्णा धोंगडे, अण्णासाहेब माने, हर्षवर्धन जाधव, कदीर मौलाना हे बीआरएसमध्ये गेले आहेत. या लोकांची काहींना काही ताकद आहे, याचा फायदा केसीआर हे उठवतील. शेतकरी संघटनेचे काही कार्यकर्ते त्यांच्याबरोबर जात आहेत.

मूळात केसीआर यांचा पक्ष हा धर्मनिरपेक्ष आहे. त्यामुळे मुस्लीम व दलित मते आकर्षित केले जातील. मराठवाड्यात तेलूगू भाषिकांची संख्या जास्त आहे. केसीआर यांना आपल्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळावयचा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ते पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत.

केसीआर यांचा फटका हा काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना तिन्ही पक्षाला म्हणजेच महाविकास आघाडीला बसू शकतो. तसाच तो वंचित आणि एमआयएमलाही बसेल, असे मत ही माने यांनी व्यक्त केले.

मागील विधानसभा, लोकसभा निवडणुकीत वंचित व एमआयएमला मराठवाड्यात भरघोस मते मिळाली होती. त्याचा फटका काँग्रेस-राष्ट्रवादीला बसल्याचे आपण पाहिलेच आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत एमआयएमचा प्रवेश झाला. इम्तियाज जलील हे खासदार झाले. त्यामुळे वंचित आघाडीवर भाजपची ‘बी टीम’ म्हणूनच आरोप होऊ लागले आहेत. केसीआर यांच्या पक्षाने ताकद लावली तर अशीच परिस्थिती पुन्हा महाविकास आघाडीतील पक्षांची होऊ शकते.

आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिकेत बीआरएस आपली ताकद अजमावून बघेल, असे माने यांचे म्हणणे आहेत. भविष्यात ते तेलूगू भाषिकांना आकर्षित करण्यासाठी सोलापूरात जाऊ शकतात, असे माने सांगतात.

या सर्वांवरून भविष्यात केसीआर हे काँग्रेस-राष्ट्रवादी, एमआयएम, वंचितची व्होट बँक पळविणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे केसीआर यांच्याविरोधात हे कसे राजकीय गणिते खेळते हे भविष्यात समजणार आहे.

Tags

follow us