Download App

वागळेंच्या हल्लेखोरांवर काय कारवाई केली? संजय राऊतांचा खडा सवाल

Image Credit: Letsupp

Sanjay Raut : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर काल पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्याच्या घटनेनंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची तोफ डागण्यात येत आहे. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुणे पोलिसांवरच ताशेरे ओढले आहेत.

LokSabha Election! उद्धव ठाकरेंची तोफ विखेंच्या बालेकिल्ल्यात धडाडणार…

संजय राऊत म्हणाले, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, विश्वभंर चौधरी, असीम सरोदे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. ज्यांनी हल्ला केला आहे, त्या गुंडांचं काय झालं? त्यांच्यावर काय कारवाई केली? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गुंडांचं समर्थन करत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

तसेच मागील चार दिवसांपूर्वी पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी एक मोठा शो केला आहे. पोलिस आयुक्तांनी पुण्यातील काही गुंडांची परेड काढली, या परेडमध्ये गुंडांना आता फोटो काढणं बद करा असं सांगितलं, तर आता काल तीन लोकांवर हल्ला झाला त्या गुंडांची परेड पोलिस आयुक्तांनी का काढली नाही? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त परेड काढण्याची नौटंकी काढताहेत. निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांची परेड कधी काढणार आहेत. अद्याप पुणे पोलिसांनी काय कारवाई केली आहे. भाजप कार्यकर्त्यांवर पोलिस कारवाई करीत नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

लगेच सरकार बरखास्त करा, काय पोरखेळ आहे का? अजितदादा विरोधकांवर कडाडले!

काल (9 फेब्रुवारी) निखील वागळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ‘निर्भय बनो’ सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याबाबत अक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा करत या सभेला जातानाच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आधी प्रभात रोडवरील इराणी कॅफेजवळ, मग गरवारे कॉलेजच्या पुढे त्यानंतर सेनादत्त पोलीस चौकीच्या सिग्नलवर आणि शेवटी दांडेकर पुलाजवळ वागळे यांच्या गाडीला लक्ष्य केले.

कार्यकर्त्यांनी दगड फेक करत हॅाकी स्टिक्स, रॉड्सने गाडी फोडली, काचा फोडल्या. या तिघांच्याही अंगावर अंडी टाकण्याचा, शाईफेक करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे, शिवसेनेचे आणि काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते अशा अनेकांनी वागळे, चौधरी आणि सरोदे यांच्या गाडी गाडीला कडे करुन संरक्षण दिले अन् ही मंडळी निर्भय बनोच्या सभास्थळी पोहचले. त्यानंतर प्रचंड गर्दीत सभा पार पडली.

यावेळी बोलताना निखिल वागळे यांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले. आज माझ्यावर झालेल्या हल्ल्याला केवळ पुणे पोलीस जबाबदार आहेत. त्यांना हल्ला होणार हे माहिती होते. मात्र त्यानंतरही त्यांनी सिनेमातील पोलिसांसारखी केवळ बघ्याची भूमिका घेतली. महाराष्ट्राचे पोलीस दल भाजपने विकत घेतले आहे, जे रश्मी शुक्लाला महासंचालक करतात, त्या पोलीस दलाला काहीही नैतिकता राहत नाही, असे आरोप वागळे यांनी केला होता. त्यावर आता पुणे पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे.

follow us

वेब स्टोरीज