नवी दिल्ली : आताच लोकसभा निवडणुका झाल्यास भाजप- शिंदे गटाचा लोकसभा निवडणुकीत धुव्वा उडणार. असा धक्कादायक अंदाज इंडिया टुडे आणि सी व्होटरच्या सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
या सी व्होटरच्या अंदाजाप्रमाणे भाजप आणि शिंदे सेनेला मिळून फार तर 14 जागा मिळतील. परंतु भाजप नेत्यांचा अंदाज त्यांना 48 पैकी 48 जागा मिळतील आणि बारामतीमध्येही पवार कुटुंबास अस्मान दाखवले जाईल.
दुसरीकडे मात्र आताच लोकसभा निवडणुका झाल्यास महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 34 जागा मिळतील, असा धक्कादायक अंदाज इंडिया टुडे आणि सी व्होटरच्या सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. असा हा सर्व्हे आहे.
यावर जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई आपल्या पोस्ट मध्ये या अंदाजामगील कारण सांगतात ते म्हणाले, ‘सी व्होटरच्या अंदाजाप्रमाणे, समजा भाजपा आघाडीला फटका बसलाच तर त्यामागील कारण काय असू शकेल ? फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्यात न आल्यामुळे शहरी मध्यमवर्गीय रागावले असतील का ? ते असो. महाविकासला जास्त जागा मिळत असल्यास, त्यात शिवसेनेचा वाटा अर्थातच जास्त असू शकतो. ‘बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारापासून उद्धव दूर गेले’, असा प्रचार करूनही उद्धवसेनेलाच अधिक यश मिळाले, तर ठाण्यातील समृद्ध गटातील ‘मोदींच्या माणसांचं’ काय होणार? या प्रश्नाचे उत्तर काळच देईल.’