Download App

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांपासून राज्य सरकार पळ काढतंय; अंबादास दानवेंची टीका

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका (Elections of local self -government organizations)  भाजप जाणीवपूर्वक घेत नाही, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) वारंवार आव्हान देतात की, दम असेल तर ताबडतोब निवडणुका घ्या. मात्र शिंदे-फडणवीस सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपासून पळ काढत आहे. राज्यातील जनमत हे सरकारच्या बाजूने मुळीच नाहीये, त्यामुळे निवडणूका सरकार घेत नाही, असं विधान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केलं आहे.

अंबादास दानवे अहमदनगरमध्ये आले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण यावरून पोस्टरबाजी रंगली असल्याचं सध्या दिसून येत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर खासदार सुप्रिया सुळे यांचं पोस्टर लावण्यात आलं होतं. यावरही दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, तो राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत विषय असून अद्याप निवडणुका लांब आहेत. कार्यकर्ते हे उत्साहाच्या भरात आपल्याला आवडणाऱ्या नेत्याचं नाव लावत असतात. कार्यकर्त्यांना एखाद्या नेत्यावर प्रेम असतं. त्याला वाटत असतं की, आपला हा नेता मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान व्हावा आणि कार्यकर्त्याने भावना व्यक्त करणं हे स्वाभाविक आहे. त्यात फार काही विशेष आहे असं मला वाटत नाही, असं दानवे म्हणाले.

खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत बोलताना दानवे म्हणाले की, जर राज्यसभेचे सदस्य – शिवसेनेचे नेते अशा पद्धतीने रितसर पत्र सरकारकडे पाठवत असतील, तर सरकारचं ही जबाबदारी की या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे. कारण संजय राऊत हे ज्याअर्थी जीव मारल्याची सुपारी दिली, असा दावा करतात, त्याअर्थी निश्चित त्यात काही तरी तथ्य असेल. तथ्य आहेच.

दानवे म्हणाले, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही अशी स्थिती आहे. राऊत यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांना धमक्या येत आहेत. चार दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सुद्धा माझा कोणीतरी पाठलाग करत आहे, माझ्या जीवाला धोका आहे, असं पत्र पोलिसांना दिलं आहे. नगरची परिस्थिती बघितली तर पाथर्डीला ज्या पद्धतीने एका व्यापाऱ्यावर हल्ला झाला, तो पाहता आता कायद्याचा धाक या महाराष्ट्रात आहे की नाही? असा प्रश्न पडतो. सध्या राज्यातीत या परिस्थितीला हे सरकार जबाबदार आहे. हे सरकार राज्यकारभार करण्यात नाही, तर फक्त राजकारण करण्यात व्यस्त आहे, अशी टीका यावेळी दानवे यांनी केली आहे.

Kolhapur : कणेरी मठावर पंचमहाभूत सोहळ्या दरम्यान 52 गायींच्या मृत्यूने खळबळ 

यावेळी बोलतांना दानवेंनी सांगितलं की, शिंदे-फडणवीस सरकार आणि भाजपकडून महाविकास आघाडी आणि संजय राऊत यांना कायम घेरण्याचा प्रयत्न होत असतो. संजय राऊत यांना तर भाजपने भाजपने आणि शिंदे गटाने वारंवार घेरण्याचा प्रयत्न केला. त्याचाच एक भाग म्हणून कोणतेही पुरावे नसतांना ईडीच्या माध्यमातून त्यांना अटक केली होती. तब्बल 100 दिवस त्यांना तुरुंगात राहावं लागलं होतं. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मनात संजय राऊतांविषयी पराकोटीचा विरोध आहे. संजय राऊत यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न या सरकारांकडून होत असतो. पण एक लक्षात ठेवा, संजय राऊत हे शिवसेनाप्रमुखांचे शिवसेनेचे कट्टर सैनिक आहेत. ते लढतील आणि तुम्हालाच जेरीस आणतील, असा टोलाही त्यांनी यावेळी भाजप आणि शिंदे गटाला लावला.

Tags

follow us