Uddhav Thackeray gets emotional while reminiscing about Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात भावनिक वातावरण निर्माण झालं असताना, विधानसभेत अजित दादांच्या शोकप्रस्तावावर विविध नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या भावना विशेष लक्षवेधी ठरल्या. अलीकडच्या काळात अजित दादांवर 70 हजार कोटींच्या आरोपांचा मुद्दा गाजत होता. त्या पार्श्वभूमीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्यांनी आरोप केले, त्यांच्यासोबत आपण उभे आहोत, हेच वास्तव आहे. कोणाला किती बदनाम करायचं यालाही काही मर्यादा असतात. एवढी बदनामी करणे योग्य नाही.
त्यांनी ठामपणे सांगितले की, अजित दादा कधीही खचले नाहीत. एखादा माणूस खचलेल्या मनाचा असता तर कदाचित वेगळा मार्ग निवडला असता; पण हे राजकारण किंवा ही संस्कृती महाराष्ट्राची नाही, असे ते म्हणाले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, असे म्हणताना उद्धव ठाकरे भावूक झाल्याचे दिसून आले. महाराष्ट्राने एक उमदं नेतृत्व गमावलं आहे, असे सांगताना त्यांनी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि आर. आर. पाटील यांची आठवण करून दिली. महाराष्ट्र ज्यांच्याकडून अपेक्षा करतो ती माणसं अचानक निघून जातात, हे राज्याचं दुर्दैव आहे. अशी माणसं पुन्हा पुन्हा होत नाहीत; असे मित्र पुन्हा मिळत नाहीत, असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, अजित दादांनी कधीही स्वतःबद्दल हताशपणे बोलले नाही. माझ्यावर एवढे आरोप होत आहेत, आता काय करायचं? असं त्यांनी कधीही म्हटलं नाही. त्यांनी प्रत्येक आरोपाला आपल्या कामातून उत्तर दिलं. इतकंच नव्हे तर ज्यांनी आरोप केले, त्यांनीही पुढे त्यांना सहकारी म्हणून स्वीकारलं. अनेकदा आरोपांमुळे व्यक्ती बदनाम होते; पण दादांनी डगमगून न जाता आपल्या कर्तृत्वाने सर्वांना उत्तरे दिली.
Video : बोलणं कुठून सुरू करावं… दादांचा शोकप्रस्ताव मांडताना CM फडणवीस भावूक
सभागृहात आजपर्यंत नेहमी दिसणारे अजित दादा आज दिसत नाहीत, ही खंत सर्वांच्या मनात आहे, असे सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही अजित दादांच्या विचारांच्या विरोधात झाली होती. आपण कधी एकत्र येऊ, असं ध्यानीमनीही वाटलं नव्हतं, असे ते म्हणाले. त्यांनी दोन सकाळींचा उल्लेख केला, एक सकाळ महाराष्ट्राला त्यांच्या कृतीमुळे धक्का देणारी होती आणि दुसरी सकाळ अंतःकरणाला चटका देणारी ठरली.
बारामतीच्या आठवणी सांगताना ते म्हणाले, ते उत्साहाने तिथला कायापालट दाखवत होते. मात्र दुर्घटनेनंतर मध्यरात्री जेव्हा मी तिथे गेलो, तेव्हा ती बारामती पोरकी झाल्यासारखी वाटली. त्यांच्या कामाच्या शिस्तीचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. 11 वाजताची वेळ असेल तर गाडी दारात उभी असायची. टेबल, पेन, कागद काटकोनात ठेवलेले असायचे. हीच सवय बाळासाहेबांना देखील होती, असे त्यांनी नमूद केले.
अजित दादांसारखा भरोसेमंद, दिलदार आणि अभ्यासू सहकारी गमावल्याची खंत व्यक्त करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रशासकीय कामकाजात त्यांचा खंबीर पाठिंबा होता. विषयाचा सखोल अभ्यास करणारा सहकारी अभावानेच आढळतो. एका मोठ्या वृक्षाच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःची ओळख निर्माण करणं अवघड असतं, आणि ते दादांनी करून दाखवलं, असे ते म्हणाले.
लॉकडाऊनच्या काळात मंत्रालय बंद असलं तरी महाराष्ट्र बंद नव्हता, असे सांगताना त्यांनी नमूद केले की अर्थचक्र थांबण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र त्या कठीण काळातही अजित दादांनी समतोल राखत राज्यकारभार सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कार्यशैलीची आणि व्यक्तिमत्त्वाची आठवण काढत संपूर्ण सभागृहाने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
