प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी
Uddhav Thackeray’s Shiv Sena Maharashtra Daura : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (Shiv Sena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Udhhav Thackeray) गटाने राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली आहे. 2 मार्च रोजी ठाण्यातून या दौऱ्याचा प्रारंभ होणार आहे. या दौऱ्याची सुरुवात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करून होईल. हा दौरा ठाकरे गटासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. त्याद्वारे पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचे दर्शन घडवण्याचा आणि भाजप-शिंदे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मोठी बातमी : १९८४ च्या शीख विरोधी दंगलीप्रकरणी माजी काँग्रेस खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेप
सरकारविरोधात हल्लाबोल
ठाकरेंच्या शिवसेनेने गेल्या काही महिन्यांत अधिक आक्रमक भूमिका घेतली (Maharashtra Politics) आहे. राज्यातील अनेक प्रश्नांवर सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याची रणनिती या दौऱ्यात आखण्यात येणार आहे. मराठी अस्मिता, महागाई, कायदा-सुव्यवस्था, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न या मुद्द्यांवर सरकारवर टीकेची झोड उठवली जाणार आहे.
शिवसैनिकांमध्ये नवा जोश; संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न
गेल्या काही वर्षांत शिवसेना मोठ्या फूटीनंतर वेगवेगळ्या गटांमध्ये विभागली गेली. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाकडून राज्यभर दौरे काढून कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्थानिक पातळीवरील शिवसैनिकांना बळ देण्यासाठी आणि आगामी निवडणुकीत ताकदीनं उतरण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
दिल्ली विधानसभेत वादळी चर्चा; ‘आप’चा आंबेडकरांच्या फोटोवरून वाद, आतिशीसह अनेकजण निलंबित
विधानसभेत विरोधी भूमिका आणि बाहेर जनतेशी संवाद
विशेष म्हणजे, ३ मार्चपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असताना ठाकरे गटाने दौऱ्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सभागृहात नेते सरकारला घेरतील आणि मैदानात कार्यकर्ते जनतेशी थेट संवाद साधतील, अशी रणनीती आखण्यात आली आहे.
भाजप-शिंदे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न
या दौऱ्यातून भाजप आणि शिंदे गटाला स्पष्ट संदेश देण्याचा प्रयत्न होणार आहे. राज्यातील सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी जनतेत मोठी गर्दी उसळली होती. हा दौरा देखील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करेल, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांना आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या रणनीतीचा भाग म्हणून या दौऱ्याकडे पाहिले जात आहे. राजकीय वातावरण अधिक तापणार असल्याचं दिसतंय.