Download App

महायुती भक्कम! काँग्रेसची आठ मतं फुटल्याने ‘मविआ’ला तडे; जयंत पाटीलही पराभूत

जयंत पाटील यांना काँग्रेसचीही अतिरिक्त मते मिळतील अशी शक्यता होती. आता मात्र काँग्रेसची आठ मतं फुटल्याचं सांगितलं जात आहे.

Vidhan Parishad Election News : राज्याचं लक्ष लागून असलेल्या विधानपरिषदेतील अकरा जागांच्या निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. या निवडणुकीत महायुतीने विजयाचा गुलाल उधळत सर्व 9 उमेदवार निवडून आणले. महाविकास आघाडीचेही दोन उमेदवार विजयी झाले. मात्र, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिलेले शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा पराभव झाला. जयंत पाटील यांना फक्त बारा मते मिळाली. जयंत पाटील यांना काँग्रेसचीही अतिरिक्त मते मिळतील अशी शक्यता होती. आता मात्र काँग्रेसची आठ मतं फुटल्याचं सांगितलं जात आहे. या फुटीमुळेच जयंत पाटील यांचा पराभव झाल्याचा निष्कर्ष आता काढला जात आहे.

MLC Election : मातोश्रीपासून विधानभवनापर्यंत ठाकरेंचे राईट हॅन्ड नार्वेकरांनी बाजी मारली

उमेदवारांना निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. मागील निवडणुकीचा अनुभव असल्याने काँग्रेस, ठाकरे गट सतर्क झाले होते. तर दुसरीकडे महायुतीनेही तगडे प्लॅनिंग केले होते. महाविकास आघाडीने एक जास्तीचा उमेदवार दिल्याने निवडणुकीत चुरस वाढली होती. या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जास्तीच्या मतांची गरज राहणार होती. त्यामुळे क्रॉस व्होटिंग होण्याचीही भीती होती. यासाठी खबरदारी म्हणून भाजप, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटाने आमदारांना पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवले होते. मतदानाच्या दिवशी म्हणजे आज या आमदारांनी हॉटेलातून थेट सभागृह गाठले.

लोकसभा निवडणुकीत झटका बसल्यानंतर महायुतीतले नेते सावध झाले होते. या निवडणुकीनंतर विधानपरिषदेचीच मोठी निवडणूक होती. या निवडणुकीत यश मिळवून पराभवाची थोडी का होईना कसर भरुन काढायची असा निश्चय महायुतीने केला होता. तर दुसरीकडे महायुतीत फाटाफूट करुन तिसराही उमेदवार निवडून आणायचा मविआचा प्लॅन होता. मात्र या निवडणुकीत महायुती भक्कम राहिली. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना महायुतीचा एकही आमदार फोडता आला नाही. उलट महाविकास आघाडीलाच तडे गेले. काँग्रेसची जवळपास आठ मतं फुटल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

राजकीय वनवास संपला! अखेर पंकजा मुंडे बनल्या आमदार; विधानपरिषदेत मारली बाजी

काँग्रेसचं विमान जमिनीवर

लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाल्याने काँग्रेस नेते अतिआत्मविश्वासात वावरत होते. राज्यात काँग्रेसच्या जागा वाढल्या होत्या. याचा परिणाम विधानपरिषदेच्या निवडणुकीतही दिसेल असे सांगितले जात होते. मात्र तसे काहीच घडले नाही. मते फुटल्याने काँग्रेस नेते चिडल्याचे दिसत आहे. तसेही काँग्रेस आमदार कैलास गौरंट्याल यांनी कालच प्रसारमाध्यमांना आमच्यातील तीन ते चार आमदार डाऊटफूल आहेत असे सांगत शंका व्यक्त केली होतीच.

या निवडणुकीच्या आदल्या दिवशी काँग्रेसने आमदारांची बैठक घेतली होती. या बैठकीला आमदार झिशान सिद्दीकी यांना बोलावण्यातच आलं नव्हतं. या प्रकाराचा खुलासा त्यांनी स्वतःच माध्यमांसमोर केला होता. तरी देखील पक्ष श्रेष्ठी जो आदेश देतील त्यानुसार कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. परंतु, निवडणुकीच्या निकालानंतर काहीतरी वेगळेच घडल्याचे दिसत आहे. झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यामुळे काँग्रेसमध्ये राहून आमदार झिशान सिद्दीकी यांची मोठी अडचण झाली आहे.

कोणती मतं फुटली, काँग्रेस काय कारवाई करणार ?

या निवडणुकीत काँग्रेसची आठ मतं फुटल्याचं सांगितलं जात आहे. मात्र हे कोण आमदार आहेत याची माहिती मात्र समोर आलेली नाहीत. काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यावरून मात्र त्यांना कोणते आमदार फुटले याचा अंदाज आल्याचं दिसत आहे. आता या फुटीर आमदारांवर काँग्रेस काय कारवाई करणार, या प्रकारामुळे महाविकास आघाडीतील विश्वास कमी होणार का, या प्रश्नांची उत्तर काय असतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

जयंत पाटील पराभूत झाले तरी कसे?

या निवडणुकीत ठाकरे गटाचे मिलींद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील यांच्यात चुरस पाहण्यास मिळाली. दुसऱ्या क्रमांकाच्या फेरीत मात्र नार्वेकरांनी बाजी मारली. त्यामुळे जयंत पाटील यांचा पराभव झाला. काँग्रेसची मतं फुटल्याने त्यांचा पराभव झाला. जयंत पाटील यांना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. काँग्रेस,शेकाप आणि माकप यांच्या मदतीने वियजी होऊ असा विश्वास त्यांना वाटत होता.

प्रत्यक्षात मात्र ही रणनीती फेल ठरली. काँग्रेसने मदत केलीच नाही असा थेट आरोप जयंत पाटील यांनी निकालानंतर केला. मला माझी हक्काची बारा मते मिळाली असे सांगत त्यांनी तडक अलीबागची वाट धरली. जयंत पाटील यांनी काँग्रेसची मते मिळालीच नाहीत शिवाय शरद पवार गट, माकपा किंवा शेतकरी कामगार पक्षाची मतं फुटल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

follow us